हेच खरे नातेवाईक!

अशोक गर्दे
मंगळवार, 24 जुलै 2018

प्रथमदर्शनी जे दिसते, त्यामुळे गैरसमजही होऊ शकतात. नंतर गैरसमज दूर होऊन विश्‍वास वाढतो.

प्रथमदर्शनी जे दिसते, त्यामुळे गैरसमजही होऊ शकतात. नंतर गैरसमज दूर होऊन विश्‍वास वाढतो.

‘आमच्या मित्राला अपघात झाला आहे. त्याला आम्ही अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेत आहोत. रात्री दहा वाजेपर्यंत पोहोचू,’ आमच्या मुलाचा आणंदहून फोन. ‘इर्मा’ (इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट, आणंद) मधून व्यवस्थापनाची पदवी घेऊन उत्तीर्ण झालेला त्याचा वर्गमित्र मोपेडवरून जात असताना कारचा धक्का लागून पडला. डोक्‍यावर आपटला. तमिळनाडूमधील एका छोट्या गावातील साध्या कुटुंबातील हा एकुलता एक, स्वतःच्या हुशारीने उच्च शिक्षण घेतलेला. त्याचे आई-वडील विमानाने अहमदाबादला पोहोचले होते. आईला फक्त तमिळ समजत होती, वडील इंग्रजी बोलू शकत होते. इर्मातील मुलगे आणि मुली एकमेकांशी मोकळेपणे बोलत आहेत, त्यांचे ते तोकडे कपडे बघितल्याबरोबर आईचे मन प्रथमदर्शनीच गढूळ झाले होते. पण, नंतर त्यांनी  बघितले की ही मुले-मुली त्यांच्या बेशुद्ध पडलेल्या मुलाची खूप काळजी घेत आहेत. त्यातील ती ‘बॉण्ड’ मुलगी सगळ्यांना सूचना देत काम करून घेते आहे. ही मुले आपलीही काळजी घेत आहेत. मित्रासाठी त्यांची धावपळ सुरू आहे.  त्या मुलावर शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्‍टर, सर्जन, परिचारिका आणि सहाय्यकवर्ग या सर्वांनी मध्यरात्री येऊन प्रयत्नांची पराकाष्टा केली, पण त्यांना यश आले नाही.

वडील म्हणाले, ‘‘अंत्यसंस्कार येथेच होऊ द्यात. गावी नातेवाईक म्हणून जायचे, पण आमच्या मुलाचे हे मित्र व मैत्रिणी हेच खरे नातेवाईक! त्यांनी जितके प्रेमाने केलेले आहे तितके नातेवाईक तरी करतात का?’’ आईची प्रतिक्रिया: ‘‘ गावातले लोक दूषण देऊ नयेत म्हणून गावातच सर्व व्हावे.’’ आईच्या इच्छेनुसार इर्माच्या मंडळींनी शव विमानाने व नंतर शव-वाहिनीने गावापर्यंत पोहोचविले.

वडील म्हणाले, ‘‘आमचा एकुलता एक मुलगा गेला, आता तुम्हीच आमची मुले. तुमची लग्ने ठरतील तेव्हा कळवा. आम्ही अवश्‍य आमच्या या मुुलांच्या लग्नाला येऊ.’’आणि खरोखरच त्या उभयतांनी पुढील दोन वर्षांत दोन लग्नांना हजर राहून आशीर्वाद दिले.

या घटनेतून झालेल्या सहृदयतेचे आणि माणुसकीचे दर्शन उत्तुंग व अविस्मरणीय आहे.

Web Title: muktpeeth article ashok gadre