मुफ़्त हुवे बदनाम

अशोक नाईक
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

पोलिस त्यांच्या कामासाठी यायचे. मात्र शेजाऱ्यांना ते माझीच चौकशी करायला येत असावेत, असे वाटू लागले होते.

पोलिस त्यांच्या कामासाठी यायचे. मात्र शेजाऱ्यांना ते माझीच चौकशी करायला येत असावेत, असे वाटू लागले होते.

बेळगावच्या जिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झालो होतो. रुग्णालयाजवळच्या एका इमारतीत राहत होतो. आम्हाला पोस्टमार्टेम करावे लागत असे. एखाद्या केसबद्दल चर्चा करण्याकरिता पोलिस अधिकारी माझ्या घरी येत. साधारण अर्धा तास चर्चा, चहापाणी झाले की अधिकारी निरोप घेत. मी फाटकापर्यंत जाऊन त्याना निरोप देत असे. वारंवार माझ्याकडे येणारी पोलिस जीप व त्यांचा लवाजमा पाहून माझी काहीतरी भानगड आहे म्हणून चौकशीसाठी ही मंडळी येत असावीत, अशा संशयाने शेजाऱ्यांत कुजबूज चालू झाली. ती माझ्या बायकोच्या कानावर आली. हे म्हणजे, मुक्त हुवे बदनाम. पुढच्या खेपेस नेहमीप्रमाणे एक पोलिस अधिकारी केसबद्दल चर्चा करण्याकरिता घरी आले. चर्चा झाली. चहा झाला.

अधिकारी निघाले तेव्हा मी त्यांना थांबवून म्हणालो, ‘एस्क्‍युज मी इन्स्पेक्‍टर साहेब. मला एक गोष्ट सांगायची आहे,’ अशी सुरवात करून पोलिस अधिकाऱ्यांच्या भेटीमुळे शेजाऱ्यांचा गैरसमज होत असल्याची कल्पना दिली. ‘‘ओह, सॉरी’’ अधिकारी म्हणाले, ‘‘तुम्ही आम्हाला इतकी महत्त्वाची मदत करत आहात, पण आमच्यामुळे तुम्हाला निष्कारण मनःस्ताप सोसावा लागतो आहे. याची कल्पना नव्हती. यापुढे तुम्हाला असा त्रास आमच्याकडून होणार नाही, याची मी व्यवस्था करतो. खात्री बाळगा.’’

त्यांनी बाहेर उभ्या असलेल्या हवालदाराला आत बोलावले व काही सूचना दिल्या. साहेब निघाले. नेहमीप्रमाणे मीही त्यांना निरोप द्यायला घराच्या फाटकापाशी गेलो. तेथे त्यांनी मला कडक सॅल्यूट ठोकून माझ्याशी शेकहॅंड केले व ‘थॅंक्‍यू डॉक्‍टरसाहेब’ असे मोठ्याने म्हणाले. फाटकाजवळच्या दोन्ही हवालदारांनीही सलाम केला. जीपचा ड्रायव्हर खात्री उतरला. मला सलाम करून नंतर साहेबांसाठी जीपचा दरवाजा उघडला. नंतर साहेबांची जीप निघाली. यापुढे या घटनेची पुनरावृत्ती इतर अधिकाऱ्यांनी माझ्या घराला भेट दिल्यावर झाली. शेजारपाजाऱ्यांमधला डॉक्‍टरसाहेबांची काहीतरी भानगड आहे हा प्रवाद नाहीसा झाला व डॉक्‍टरसाहेबांची पोलिस खात्यात बरीच वट आहे असा साक्षात्कार झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muktpeeth Article Ashok Naik

टॅग्स