लाइफ इज गेम

लाइफ इज गेम

आयुष्यात नियोजन हे खूप महत्त्वाचे आहे. नियोजन पैशांचे असो अगर वेळेचे, किंवा कशाचेही असो; नियोजन हे महत्त्वाचे आहे. भविष्यात अडचणी येणार हे गृहीत धरून नियोजन करणे गरजेचे आहे. 
 

प्रत्येकाच्या जीवनात चढ-उतार येत असतात. काहींचे म्हणणे असे, की आपल्याला नशिबाची साथ नाही, कितीही कष्ट केले तरी यश येत नाही. काहींचे म्हणणे असे, की हा करणीचा प्रकार आहे. शेजारी किंवा भावकी, नातेवाईक यांना आमचे चांगले झालेले पहावत नाही. पण नशिबाला किंवा इतरांना दोष देण्यात अर्थ नाही. आपले नियोजन कशा पद्धतीचे आहे हेदेखील महत्त्वाचे आहे. 

पैशांचे असो अगर वेळेचे, किंवा अन्य कशाचेही असो. नियोजन महत्त्वाचे आहे. गेल्या महिन्यात एक मित्र भेटला. चांगल्या नोकरीला आहे. पगार भरपूर. चौकोनी कुटुंब. आई-वडील वेगळे. त्याचे म्हणणे असे, की कितीही कमावले तरी पैसा शिल्लक रहात नाही. त्याला अनेक व्यसने, पत्नीचाही खर्च भरपूर, मुलांचे अनेक प्रकारचे लाड, मग पैसा कसा शिल्लक रहायचा? त्याचे म्हणणे असे, की आपल्याला लहानपणी काही मिळाले नाही म्हणून मुलांना सर्व पुरवायचे. पण प्रत्येक गोष्टीला कुठेतरी मर्यादा असतात. स्वतःची व्यसने बंद केली, मुलांचे लाड मर्यादित केले, तर बचत का होणार नाही? मी त्याला म्हणालो, ‘‘तुझ्या सवयी किंवा व्यसने जोपर्यंत बंद होत नाहीत, घरच्यांचे लाड जोपर्यंत मर्यादेत येत नाहीत, तोपर्यंत असेच चालत राहणार. खेळामध्ये जसा एखादा वाईट खेळला तर तो लवकर बाद होतो, तसेच तुझे आहे.’’

मागे असाच एक मित्र भेटला. तो सांगत होता, ‘‘आम्ही दोघे पती-पत्नी काम करतो, व्यवस्थित पैसे बाजूला टाकतो, बॅंक बॅलन्स बऱ्यापैकी आहे. कुठलेही व्यसन नाही. आपल्याला सरकारी किंवा चांगल्या पगाराची नोकरी नाही; पण आहे त्यात समाधानी आहे. कष्टाचे चार पैसे केव्हाही टिकतात, ही मोठ्यांची शिकवण लक्षात ठेवली. उद्या मुलांचे शिक्षण, लग्नं आपल्यालाच करावी लागणार. वयस्कर आई-वडील जवळ आहेत, त्यांचे आशीर्वाद हेच खरे भांडवल. तुम्ही म्हणता तसे आर्थिक नियोजन असेल, तर काहीच कमी पडत नाही.’’ असे हे विरुद्ध टोकांचे दोन मित्र. दोघांचे विचार वेगळे.

काही लोक बराच पैसा कमावतात; पण मागे रक्तदाब, मधुमेहासारखा आजार लावून घेतात. समोर एखाद्याने मिठाई किंवा चहा दिला तर त्याला नको म्हणावे लागते. एखाद्याला दारू चालते; पण चहा चालत नाही. चोवीस तासांत जर शरीराला एक तास दिला, तरीही माणूस आजारपणापासून दूर राहू शकतो. डॉक्‍टरने सांगितल्यानंतरच कित्येक जण फिरावयास किंवा व्यायामास सुरवात करतात; पण अगोदर केले तर बिघडते का? माणसाच्या आयुष्यात चढ-उतार हे येतातच.अर्धा-पाऊण तास चालणे, जॉगिंग करणे, पोहणे, सायकल चालवणे किंवा सूर्यनमस्कार या गोष्टी प्राथमिक स्वरूपाच्या आहेत. यांतील काही गोष्टी केल्या तरी शरीर व्यवस्थित राहू शकते. शरीर एखाद्या मशिनसारखे आहे, त्याला देखील वंगणपाण्याची गरज आहे. माणूस कितीही पैसेवाला असला तरी त्याने शरीराची काळजी घेणे महत्त्वाचे. 

जीवनामध्ये एखाद्या खेळाप्रमाणेच कधी एका संघाची बाजू चांगली तर कधी वाईट येऊ शकते, किंवा वैयक्तिक खेळातही खेळाडूंची तीच अवस्था होते.

तरुणपणी पैसा पुरवायचा, भविष्याचा विचार करायचा नाही आणि पैसा नसला की दुसऱ्याजवळ हात पसरायचा. मग मोठेपणाच्या गोष्टी सांगायच्या. माझ्याकडे पैसा होता तर लोक किंवा मित्र यायचे. आता दुसऱ्याला सांगून काही होणार आहे का?

स्वामी विवेकानंदांनी एके ठिकाणी म्हटले आहे, ‘स्ट्रेथ इज लाइफ, विकनेस इज डेथ’. माणसाकडे ताकद असेल तर तो व्यवस्थित जगू शकतो. पण, त्याच्यात अशक्तपणा असेल तर तो मेल्याहून मेल्यासारखा असतो, त्यामुळे माणसाचे कोणत्याही बाबतीत नियोजन महत्त्वाचे आहे. अपेक्षा अशी असावी, जी ध्येयापर्यंत नेईल.

नुकताच लेह-लडाखला जाण्याचा योग आला. तेथे तर सहा महिने बर्फ असतो. पर्यटकांवरच त्यांचे बरेचसे जीवन अवलंबून असते. तेथील लोकांच्या गरजा कमी असतात; पण ती जगतातच ना? आपल्याकडे ज्याच्याकडे पैसे आहेत तो चैन करतो; पण त्याचे पाहून इतरांनाही वाटते, आपल्याकडेही त्याच्यासारखी वस्तू असावी. मग ती कर्ज काढूनही घेतली जाते किंवा केली जाते. मग कर्ज फेडायला पळापळ होते. मग बॅंकेची जप्ती येते किंवा कर्जात डुबले जाते. तेच जर त्याने विचार करून कर्ज काढले तर त्याच्यावर ही वेळ येत नाही. म्हणून कोणत्याही गोष्टीत नियोजन हे महत्त्वाचे आहे. तर, पैशाचे अथवा वेळेचे नियोजन केले तर माणूस आनंददायी जीवन सहज जगू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com