मनमोही श्रावण

माधुरी र. साठे
सोमवार, 24 जुलै 2017

पाऊससरींचा पडदा आता विरळ होत जाईल. ऊन-पावसाच्या खेळात इंद्रधनूवरून अलगद उतरेल श्रावणधून. हिरव्या गालिचावरून वाट जाईल रानापावेतो. ऐकू येतील ओढाळ सूर.

आबालवृद्धांना सर्वांत आवडणारा महिना म्हणजे श्रावण महिना. विशेषत: नवीन लग्न झालेल्या बायकांचा हा सर्वात आवडता. हा महिनाच सुंदर असतो. या महिन्याला निसर्गानेही आपली साथ दिलेली असते.

पाऊससरींचा पडदा आता विरळ होत जाईल. ऊन-पावसाच्या खेळात इंद्रधनूवरून अलगद उतरेल श्रावणधून. हिरव्या गालिचावरून वाट जाईल रानापावेतो. ऐकू येतील ओढाळ सूर.

आबालवृद्धांना सर्वांत आवडणारा महिना म्हणजे श्रावण महिना. विशेषत: नवीन लग्न झालेल्या बायकांचा हा सर्वात आवडता. हा महिनाच सुंदर असतो. या महिन्याला निसर्गानेही आपली साथ दिलेली असते.

रिमझिमणारा पाऊस, हिरव्या पाचूचा शालू नेसलेली धरणीमाता, डोंगरकड्यांतून वाहणारे नितळ पाण्याचे धबधबे, सुगंधी फुले, त्यांवर बागडणारी फुलपाखरे याने निसर्ग नटलेला असतो. या महिन्यात तेरड्याची रंगीबेरंगी फुले भरपूर येतात; तसेच ऊनपावसाच्या लपंडावात, मनमोहक इंद्रधनुष्य, आकाशी सप्तरंगाची उधळण करते. हा महिनाच तसा सात्त्विक. अनेक सण, व्रतवैकल्यांनी हा महिना भरलेला असतो. घर धुऊन-पुसून स्वच्छ केले जाते. या महिन्यात सोमवारी, शनिवारी उपवास केले जातात.

देवांसाठी फुले, हार, नारळ तसेच नैवेद्य दाखवायला आणि उपवास सोडायला, केळीची पाने आणली जातात. घरात देवापुढे निरांजन तेवत असते आणि उदबत्त्यांचा व सुवासिक फुलांचा सुगंध दरवळत असतो. दारापुढे नक्षीदार रांगोळी काढली जाते. सणांना दाराला तोरण लावले जाते. आंब्याची डहाळी लावली जाते, त्यामुळे श्रावणात घर प्रसन्न वाटते.

या महिन्यात खाद्यपदार्थांची रेलचेल असते. उपवासासाठी भगर, शेंगदाण्याची आमटी, बटाट्याची भाजी, खमंग काकडी, शेंगदाण्याचा लाडू, साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडे, साबुदाण्याची गोड, तिखट पेज, रताळाचे थालीपीठ, फराळी मिसळ अनेक प्रकार केले जातात. आता तर काय उपवासाचा ढोकळा पण मिळतो. काही जण फक्त फळे किंवा थोडेसे खाऊन उपवास करतात. श्रावणातल्या सोमवारी व शनिवारी उपवास साधारणत: संध्याकाळी सोडायची प्रथा आहे. उपवास सोडायला जेवणात विशेषत: वालाचे बिरडे, मुगाची आमटी, वालाची खिचडी, त्याबरोबर पोह्याचा पापड, कैरीचे लोणचे, अळूवडी, गोड म्हणून शेवयांची खीर, काकडीचे तवसे असे वेगवेगळे पदार्थ केले जातात. श्रावणात येणाऱ्या भाज्या तर खूप मस्त असतात.

फोडशी किंवा कुळू, अळू, दिंडे, टाकळा, कर्टुली, शेवळे वगैरे अनेक प्रकारच्या भाज्या श्रावणात येतात. वाल वगैरे टाकून या भाज्या चांगल्या लागतात व या आपल्या प्रकृतीसाठीही उत्त्म असतात. 

नवीन लग्न झालेल्या स्त्रिया पहिली पाच वर्षे श्रावणी सोमवारी अनुक्रमे तांदूळ, तीळ, मूग, जव, सातू, ही धान्ये श्री शंकरावर वाहतात. श्रावणात आठवड्यातल्या प्रत्येक दिवशी काही जण त्या-त्या दिवसाची कहाणी मनोभावे वाचतात, आरत्या म्हणतात. श्रावणातले सण म्हणजे आनंदाची पर्वणीच. श्रावणी मंगळवारी, मंगळागौर साजरी करायला नववधूचे नातेवाईक, मैत्रिणी अगत्याने हजर असतात. श्री शंकर देवाची पत्नी गौरी देवीची पूजा, म्हणजे मंगळागौरीची पूजा. श्रावण महिन्यात पाने, फुले भरपूर असल्यामुळे, मंगळागौरीला पाच प्रकारची पत्री, तेरड्याची किंवा इतर रंगीबेरंगी फुले वाहून, मंगळागौरीची आरती म्हणून पूजा केली जाते. पतीच्या दीर्घायुष्यासाठी, अखंड सौभाग्यासाठी, घरादाराच्या सुखासाठी ही पूजा केली जाते. मंगळागौरीची रात्र महिला, फुगड्या, झिम्मा, पिंगा, कोंबडा, लाट्या, सूप नाचविणे, आघाडा वगैरे खेळ खेळून, गाणी म्हणून जागवितात. लहान, मोठ्या सर्व महिला यात सहभागी होतात. नवविवाहितेच्या सासरी व माहेरी दोन्ही ठिकाणी मंगळागौर उत्साहात साजरी केली जाते. विशेष म्हणजे रात्री सर्वांसाठी मटकीची उसळ व थालीपीठांचा फर्मास बेत असतो. श्रावणी शुक्रवारी देवीला घरी चणे व गुळाचा नैवेद्य दाखविला जातो. शाळांमध्ये लहान मुलींना नटून थटून जायला मिळते, वर तिखट चटणी घातलेले चणे प्रसाद म्हणून मिळतात.

नागपंचमीला नागाला दूध, चणे, शेंगदाणे, लाह्यांचा नैवेद्य दाखविला जातो. नारळी पौर्णिमेला घरोघरी तुपावर लवंगा भाजून, त्यावर केलेला खरपूस नारळीभात करतात. कोळी बांधव समुद्राला नारळ वाहून, गाणी म्हणून नारळी पौर्णिमा धुमधडाक्‍यात साजरी करतात. याच दिवशी राखी पौर्णिमेला बहिणींनी भावांना, आपले रक्षण करण्यासाठी राखी बांधायची प्रथा आहे. गोकुळाष्टमीला कृष्णाला दहीपोह्याचा नैवेद्य दाखविला जातो. हल्ली गोकुळाष्टमी हंडीचे खूप मोठे थर लावून साजरी केली जाते. राजकीय पक्षही यात मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात. हंडीला हार, फळे बांधलेली असतात. तसेच जे हंडी फोडतात त्यांना मोठे बक्षीस दिले जाते. आता बऱ्याचशा स्त्रिया नोकरी करीत असल्या तरी श्रावणातले सण, त्या वेळात वेळ काढून साजरे करतात. आवडीने हाताला मेंदी लावतात. ऑफिसला नवीन साड्या नेसून, नटूनथटून जातात. डब्यात त्या सणाला गोडाधोडाचे पदार्थ आणून, त्याचे ट्रेनमधल्या मैत्रिणींमध्ये व ऑफिसमध्ये वाटपही करतात. त्यामुळे खेळीमेळीचे वातावरण तयार होते आणि ऑफिसमधील रुक्ष वातावरणात सणाचा उत्साह वाटायला लागतो. ऊन-पावसाच्या खेळात इंद्रधनूवरून अलगद उतरेल श्रावणधून. हिरव्या गालिचावरून वाट जाईल रानापावेतो. ऐकू येतील ओढाळ सूर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktpeeth article madhuri sathe