जिव्हाळा

सोमवार, 5 ऑगस्ट 2019

अनिच्छेनेच शाळेत रुजू झाले होते. तेथे जाईस्तोवर केवळ अडचणीच दिसत होत्या. रुजू झाले अन् कामे दिसू लागली.

अनिच्छेनेच शाळेत रुजू झाले होते. तेथे जाईस्तोवर केवळ अडचणीच दिसत होत्या. रुजू झाले अन् कामे दिसू लागली.

बदल्या होणारच. माझी बदली टेमघर पुनर्वसन (कोंढापुरी) येथे झाली. शाळेची टोलेजंग इमारत, वर्गाच्या भिंती काळ्याकुट्ट. कारण, शाळेमध्ये काही कुटुंबे राहात होती. शालेय रेकॉर्ड नाही. मुलांचा पट फक्त चार. प्रत्येक वर्गात एक एक विद्यार्थी. शाळा बंद पडणार म्हणून आधीच्या शिक्षकांनी दाखले देऊन टाकले होते. जवळजवळ वीस-बावीस दिवसांनंतर अनिच्छेनेच मी त्या शाळेत रुजू झाले. रुजू झाल्यावर ग्रामस्थांनी आजूबाजूच्या शाळेतील मुले माझ्या शाळेत आणून टाकली. मुले हुशार झाली. पट वाढू लागला.

स्वातंत्र्यदिनी लोकसहभागातून चारशे रुपये मिळाले. मी वर्गासाठी फळे करून घेतले. शब्द पताका लावल्या. तरंगचित्रे लावली. दोन वर्गांपुरता व बाहेर रंग दिला. आता चाराची सतरा मुले झाली होती. शाळेमध्येच कुटुंबे राहत असल्याने मला त्यांनी खूप जीव लावला. नाना नानी, हे तर आमचे आई-वडीलच. नंतर नानांनी शाळेसमोरच घर बांधले. आता अजून एक बाई आल्या; पण त्या आजारी पडल्या आणि रजेवर गेल्या. तेव्हा तर माझी परीक्षाच होती. चार वर्ग, बैठका, शिष्यवृत्ती परीक्षा अशा सर्व गोष्टी सांभाळत मी शाळेची प्रगती सुरू ठेवली. सरपंच स्वप्नीलभैया गायकवाड यांच्या मदतीने वर्गाच्या बाहेर भिंतीला रंग देऊन त्यावर अभ्यासक्रम लिहून घेतला. नेत्यांची चित्रे काढून घेतली. शाळेभोवती तारेचे कुंपण, आकर्षक प्रवेशद्वार, कमान, पाण्याची टाकी, संगणक व दूरचित्रवाणी संच, डीव्हीडी, विद्यार्थ्यांसाठी बेंच, ओळखपत्र, ई-लर्निंग सॉफ्टवेअर अशी कामे पुढे करवून घेतली. या सर्व सुधारणा ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी केल्या. हे सर्व करताना शाळा शंभर टक्के प्रगती, शंभर टक्के चावडीवाचन, शंभर टक्के शिष्यवृत्ती व प्रज्ञाशोध निकाल. हे सर्व करताना मला माझे सहकारी, अंगणवाडी स्टाफ, पालकवर्ग, ग्रामस्थ, ग्रामपंचायत यांचे सहकार्य लाभले आणि त्यामुळेच मला शिरूर पंचायत समितीचा ‘आदर्श शिक्षिका’ पुरस्कार मिळाला. इतक्या वर्षांनंतरही मी माझी टेमघरची शाळा व तेथील चाळीस कुटुंबांना कधीही विसरू शकत नाही. त्यांचा जिव्हाळा माझ्या मनात घर करून राहिला आहे.