मैत्र सायकलचे

निरुपमा भावे
सोमवार, 22 जानेवारी 2018

सत्तरावा वाढदिवस सायकलवरून कन्याकुमारीला जाऊन साजरा करायचा, ही कल्पना कशी वाटते? सायकलप्रेमी समूहाने ठरवले आणि आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस सायकल सफर करून साजरा केला.
- निरुपमा भावे

सत्तरावा वाढदिवस सायकलवरून कन्याकुमारीला जाऊन साजरा करायचा, ही कल्पना कशी वाटते? सायकलप्रेमी समूहाने ठरवले आणि आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस सायकल सफर करून साजरा केला.

माझ्या सायकलप्रेमी गटाने माझा सत्तरावा वाढदिवस पुणे- कन्याकुमारी असा सायकल ट्रेक करून कन्याकुमारीला साजरा करायचा असे ठरवले आणि तसे केलेही. पुण्यात सायकलिंग करताना एक गंमतशीर पण उत्साह वाढविणारा अनुभव मला नेहमीच येतो. मी जेव्हा-जेव्हा सायकल घेऊन कुठे-कुठे जात असते, तेव्हा साधारण तिशी-चाळिशीतील तरुण बाईक थांबवून माझ्याशी बोलतात. मोबाईलवर छबी टिपतात व आमच्या आईला आम्ही आता तुमच्याबद्दल सांगतो, म्हणजे तीही सायकल चालवायला लागेल असे म्हणतात, तेव्हा खरेच मन भरून येते. मी स्वतः सायकलशी मैत्र केले त्याचीही एक गंमतच. एकदा माझ्या पतीचे मित्र एस. बी. जोशी सायकलवरूनच आमच्याकडे आले. बोलण्याच्या ओघात समजले, की साठीतही ते वाडिया महाविद्यालयापासून औंधपर्यंत सायकलनेच ये-जा करायचे. झाले, माझ्या जिद्दी स्वभावाने उचल खाल्ली आणि पन्नाशीत असताना ठरवले, की आपली तब्येत आहे, अशीच उत्तम ठेवायची असेल, तर सायकलच आपले वाहन! आणि माझा सायकलचा प्रवास सुरू झाला.

पहिल्यांदा छोटी-छोटी अंतरं, साधारण पाच किलोमीटरपर्यंत, अशी सुरवात केली. एक दिवस वाचनात आले, की ‘पुणे सायकल प्रतिष्ठान’चे सदस्य दर महिन्याच्या पहिल्या रविवारी पुण्यातल्या वेगवेगळ्या भागांत सायकल रॅली काढून घोषणा देऊन सायकल चालविण्यासाठी नागरिकांना उद्युक्त करतात. मग एका रविवारी मी त्यांच्या ग्रुपमध्ये सामील झाले. पहिल्याच वर्षी बाघा बॉर्डर ते आग्रा असा ट्रेक त्यांच्याबरोबर केला. त्यानंतर पुढे भुवनेश्‍वर ते कोलकता, गोवा ते कोचीन, राजस्थान, मध्य प्रदेश, सौराष्ट्र व चेन्नई ते कन्याकुमारी असे सहा ट्रेक केले. सायकल प्रवासातला महत्त्वाचा ट्रेक मनाली ते खार्दुंगला. या ट्रेकला माझा खरा कस लागला. याची पूर्वतयारी म्हणून मी एकेका दिवसात पुणे- पाचगणी व परत, ताम्हिणी घाट व परत असा सराव केला होता. या सर्व प्रवासात सायकलचा दर्जाही वाढवत नेला. आज माझ्याकडे उत्तम सायकल आहे. 

दहा वर्षांपूर्वी माझा लेख वाचून एका महिलेने माझ्याशी संपर्क साधला. ती साधारण दहा किलोमीटर सायकल चालवत होती, ती आता माझ्यापासून प्रेरणा घेऊन मध्य प्रदेशात रोज शंभर- सव्वाशे किलोमीटर प्रवास सायकलने करू लागली. आणखीही आठ-दहा महिला सायकलने मोठे अंतर कापू लागल्या आहेत. डोंबिवलीच्या माझ्या बहिणीचा मुलगा असाच प्रेरित होऊन सायकलिंग करायला लागला आहे. तो कामावरही आता सायकलनेच जातो.

एवढेच नाही, तर त्याने डोंबिवलीत सायकल प्रेमींचा एक ग्रुपही केला आहे. त्याच्याच मित्राच्या बायकोनेही स्वतः सायकलिंग सुरू केले व एक छोटा ग्रुपही तयार केला आहे.

या सर्व प्रवासात तीन वर्षांपूर्वी अचानक माझ्या मेंदूला ‘व्हायरल इन्फेक्‍शन’ होऊन मॅनिंगोलायटिसने मी खूप आजारी होते. चार दिवस कमरेखालचा भाग काहीच काम करत नव्हता. रोज पन्नास हजार रुपयांचे एक याप्रमाणे पाच इंजेक्‍शन्स घेतली, त्यामुळे अर्धांगवायू होण्यापासून बचावले. शरीर कमजोर झाले होते. पुन्हा नीट उभी राहणार का, सायकल चालवता येईल का, असे प्रश्‍न बाकीच्यांना पडले होते. माझी अजून सायकल चालवण्याची जिद्द होती.

मी जिद्द हरणारी नाही. डॉक्‍टरांच्या मते या आजारातून बरे व्हायला एक-दोन वर्षे लागतील असे होते; पण मी फिजिओथेरपिस्टने दिलेले व्यायाम चिकाटी व सातत्याने केले आणि एका महिन्यात बरी झाले. मी जिंकले. महिन्यानंतर पुन्हा थोडी सायकल चालवू लागले. दोन महिन्यांनी बोपदेव घाट सायकलने पार केला. माझे हे सायकलप्रेम, माझी चिकाटी मैत्रिणींना माहिती होती.

आमच्या ट्रेकिंग ग्रुपमधल्या आम्ही सर्वजणी सायकलिंग करून आपापला वाढदिवस साजरा करतो. माझा सत्तरावा वाढदिवस पुणे- कन्याकुमारी सायकलिंग करून साजरा करू असे एकीने सुचविले. माझ्या सायकलप्रेमाचा हा गौरव होता. मग आम्ही सहा महिने तयारी केली. तेरा जणी जमलो. सर्व नियोजन पूर्ण झाले. सर्वांच्या मनात (मी सोडून) ट्रेकच्या सुरवातीला धाकधूक होती; पण प्रत्यक्ष ट्रेक सुरू झाल्यावर सर्वांना उत्साह आला. रोज शंभर- सव्वाशे किलोमीटर सायकल चालवली. सुरवातीला, ‘जेवणानंतर अजून तीस किलोमीटर मारायचे’ असे म्हणत होतो. नंतर, हेच वाक्‍य बदलून ‘फक्त तीसच मारायचेत’ असा विनोद होऊ लागला. प्रवास फार मजेत झाला. सायकलीवरून फिरण्याचा एक वेगळा आनंद आम्ही सगळ्याजणी घेत होतो.

अखेर, सत्तराव्या वाढदिवसाला आम्ही कन्याकुमारीला होतो. माझे पती श्रीकृष्ण भावे स्वतःची सांधेदुखी, गुडघेदुखी विसरून कन्याकुमारीला माझ्या वाढदिवसाला आले आणि एकमेकांना केक भरवून माझा सत्तरावा वाढदिवस साजरा झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktpeeth article nirupama bhave