आगळीवेगळी श्रीमंती

प्रतिभा बर्वे
सोमवार, 18 जून 2018

समाजात वावरताना आपण कित्येकदा कद्रूपणाने वागतो. खरे तर मनाची श्रीमंती असल्यास माणूस समाधानी राहतो, हे आपणही जाणतो. त्या श्रीमंतीचा अनुभव अनपेक्षितपणे आला की आपणच खजिल होतो. 

समाजात वावरताना आपण कित्येकदा कद्रूपणाने वागतो. खरे तर मनाची श्रीमंती असल्यास माणूस समाधानी राहतो, हे आपणही जाणतो. त्या श्रीमंतीचा अनुभव अनपेक्षितपणे आला की आपणच खजिल होतो. 

लहान असताना आईने एक गाणे शिकवले होते.
 छोटे घरकुल, छोटे घरकुल, 
पहा कशी कोपऱ्यात मांडली चूल, 
तांदूळ होते सात, 
पण पहा कसा केला आहे 
पातेलीभर भात, 
चिमूटभर पीठ, 
पण पहा कशा केल्या आहेत 
भाकऱ्या या नीट, 
पान घेतलं, पिठलं वाढीलं, 
खरं सांगा, तोंडाला पाणी सुटलं?
 खरंच आता मोठ्ठं झाल्यावर नातवाला गाणी म्हणून दाखवताना सहज ते आठवलं. लहानपणी त्याचा अर्थ फारसा नाहीच उमगला; मात्र आता विचार करायला लागल्यावर वाटतं खरंच, केवढी ही विचारांची श्रीमंती. ‘सात तांदूळ आणि पातेलीभर भात’ खरंच अजबच आहे सारं. अगदी थोडक्‍यात गरिबीत, पण किती हे थाटामाटाचे विचार. अशीच विचारांची श्रीमंती मला अनेक वेळा दिसली. अगदी मन सुन्न करून गेली. समाजात वावरताना आपण कित्येकदा कद्रूपणाने वागतो. खरे तर मनाची श्रीमंती असल्यास माणूस समाधानी राहतो, हे आपणही जाणतो. त्या श्रीमंतीचा अनुभव आपल्याला अनपेक्षितपणे आला, की आपणच खजिल होतो. 

मला भरतकाम, पेंटिंगची आवड. काही तरी वेगळे करायचे म्हणून पत्त्यातले इस्पीकचे राजा-राणी, जसेच्या तसे खूप मोठे करून साडीवर छापून घेतले. नेहमीच्या साडीहून ही साडी एकदम वेगळी वाटू लागली. मैत्रिणींसंगे पत्ते खेळतानाची आठवण यायची ती साडी नेसताना. आताही मैत्रिणीकडे जायचे म्हणून तीच साडी नेसून रिक्षाने चालले होते. मधल्या सिग्नलला रिक्षा थांबली. हातात गुलाबाचे गुच्छ घेऊन एक मुलगा रिक्षापाशी आला. ‘बाई फुले घेता?’ मी हातानेच ‘नको’ म्हटले. पण, तो दुसऱ्या गिऱ्हाईकाकडे न जाता धावतच कोपऱ्यावर गेला आणि एक लहान मुलगी आणि दोन मुलांना घेऊन पळत पळत पुन्हा माझ्या रिक्षापाशी आला. त्या मुलाने माझ्या साडीवरच्या त्या पत्त्यांकडे बघून ‘खूप छान आहे’ अशी हातानेच खूण केली. बरोबर बोलावून आणलेल्या मुलांना पण ते चित्र दाखवले. ती सारी मुले रिक्षापाशी थांबून, त्यांचा ‘व्यवसाय’ थांबवून चित्र न्याहाळत होती. कदाचित, त्यांना पत्यातल्या राजा-राणीची गंमत वाटत असेल. त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहताना मला वाटले, खरंच आपल्या पेंटिंगचे सार्थक झाले. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव अजून मी विसरू शकत नाही. केवढी ही मनाची श्रीमंती! मी फुले घेतली नाहीत, त्याचा राग तर नाहीच नाही!

माझे वडील रोज हरिहरेश्‍वराच्या देवळात जात. तेथे एका अपंग म्हाताऱ्या माणसाला रोज पोळी देत. काही दिवसांनी वडील वारले. देवळापाशी जवळच माझी एक मैत्रीण राहत होती, ती वडिलांशी खूप वेळा बोलायची, हे त्या म्हाताऱ्या माणसाने पाहिले होते. माझे वडील कोण? हे त्याला माहीत नव्हते, माझी मैत्रिण कोण? हे त्याला माहीत नव्हते. फक्त आपल्याला पोळी देणाऱ्या व्यक्तीशी ती मुलगी बोलते एवढेच त्याने टिपले होते. वडील वारल्यावर काही दिवसांनी मैत्रीण तेथून जात असताना त्या म्हाताऱ्याने तिला विचारले, ‘‘काय हो बाई, ते म्हातारे काका आजकाल दिसत नाहीत. ते मला पोळी द्यायचे हो.’’ 

त्यावर ती त्यांना म्हणाली, ‘‘अहो एवढंच ना, 
मी तुम्हाला आत जाऊन पोळी आणून देते. ते देवाघरी गेले..’’ 
त्यावर तो म्हातारा डोळ्यांत पाणी आणून तिला म्हणाला, ‘‘नको, आज नको पोळी मला. ते देवाघरी गेले ना, आज मी उपास करणार. उद्या द्या मला पोळी.’’ काय म्हणायचे यावर.

एकदा मी एका बाईकडून दहा रुपयांचे गजरे घेतले. वीस रुपयांची नोट तिला दिली. ती सुटे पैसे शोधत असताना ‘चहा चहा’ करत एक छोटा मुलगा हातात चहाचा स्टॅंड घेऊन आला. ‘‘ए आज्जे, चहा’. त्यावर ती काकुळतीने म्हणाली, ‘‘अरे, आज नको बाबा, सुट्टे पैसे नाहीत माझ्याजवळ. ’’ तर हसत-हसत म्हणाला, ‘‘ए आज्जे, इतकंच ना! घे चहा, आज मी माझ्या आज्जीला चहा पाजला, असे समजेन.’’ चहाचा पेला तेथे ठेवून झरकन तो पुढे गेला. काय म्हणायचे याला! केवढी ही मनाची श्रीमंती! सुट्या पैशांसाठी थांबलेली मी मात्र खजिल झाले. मान खाली घालून पुढे निघून गेले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktpeeth article pratibha barve