फुटबॉलचे दिवस

श्रीराम गोखले
मंगळवार, 31 जुलै 2018

माणूस आठवणीत रमणारा प्राणी आहे म्हणतात. फुटबॉलचे सामने पाहताना मीही माझ्या शाळा-महाविद्यालयीन दिवसांच्या आठवणींत रमलो.

माणूस आठवणीत रमणारा प्राणी आहे म्हणतात. फुटबॉलचे सामने पाहताना मीही माझ्या शाळा-महाविद्यालयीन दिवसांच्या आठवणींत रमलो.

रमणबाग शाळा आणि फुटबॉल यांचे नाते अतूट होते. रामभाऊ लेले हे क्रीडाप्रेमी शिक्षक क्रिकेट, फुटबॉल व हॉकीने शाळेचे वातावरण भारून टाकीत असत. ते स्वतः उत्तम कोच तर होतेच, पण विद्यार्थ्यांना प्रेरित कसे करायचे, पुढे कसे आणायचे, सांघिक कौशल्य असे सर्व कळकळीने शिकवीत असत. आंतरशालेय स्पर्धांत सेंट व्हिन्सेंट व ऑर्नेला या कॅम्पमधील शाळा आमच्या प्रतिस्पर्धी असत. ती मुले तगडी असली तरी आमचे सामने चुरशीचे होत. लेले सर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी फळा भरून वर्णन लिहीत, ते वाचायला गर्दी होत असे. आता मी दूरचित्रवाणीवर ‘वर्ल्डकप’ बघत होतो, पण सरांनी केलेले ते वर्णन जास्त रोमांचक वाटायचे.

आठवीत मी टिळक रोड शाळेत गेलो. शालेय संघातून सुरवातीला बचावफळीत खेळत असे, पण पुढे ‘सेंटर हाफ’ ही माझी आवडती जागा झाली. फुटबॉलमुळे व्यायामाची सवय लागली. मला उंचीचा फायदा होत असे. चष्मा घालून खेळणारे मी व माझा भाऊ श्रीनिवास एवढेच होतो. अर्थात त्यामुळे आमची आक्रमकता कमी नव्हती. अभियांत्रिकीला जाईपर्यंत शालेय कारकिर्दीत बूट महाग म्हणून आम्ही अनवाणीच खेळायचो. अभियांत्रिकीला पुण्याबाहेरची बरीच मुले आल्याने मजा येई. केनी डिसुझा, अल्फान्झो ही संघामधली मुले आठवतात. मी आता कर्णधार होतो. पुढे आंतरविद्यापीठ स्पर्धेतही खेळलो. मध्यरेषेजवळून मी केलेला ‘फील्ड गोल’ अजूनही लोक आठवतात. प्रकाश साठे, गिरीश केळकर, कमलाकर अत्रे असे आम्ही सर्व एस. पी. कॉलेजच्या मैदानावर संध्याकाळी जमू लागलो. तेथे फ्रेंडस इलेव्हन क्‍लब तयार झाला. फुटबॉलच्या कौशल्याचा वापर करून मला हर्डल्सची रेस उत्तम जमू लागली. रनिंग व हर्डल्स हे माझे आवडते ‘इव्हेंटस’ बनले. आता निवृत्तीच्या काळात स्मरणरंजन भावतेच. जुने मित्र भेटतात, तेव्हा ‘तुम्ही गोखले म्हणजे ते फुटबॉलवाले का’ असे विचारतात तेव्हा छान वाटते!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muktpeeth Article Shriram Gokhale