संधीचं सोनं

Subhash-Kale
Subhash-Kale

शिक्षकाच्या नात्याने त्या मुलाला एक संधी दिली आणि त्यामुळे आता तो एस.टी.मध्ये कंडक्‍टर म्हणून रुजू झाला होता.

घराच्या पडवीत बसलो असताना एका अनोळखी तरुणाने अचानक येऊन माझे पाय धरले अन्‌ तो रडू लागला. मला काही कळेना. मी त्याच्या पाठीवर हात फिरवून त्याला शांत केलें. तो सांगू लागला, ‘मी शेजारच्या गावातला. वडील प्राथमिक शिक्षक. पाच वर्षांपूर्वी माझ्याच गावातील हायस्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिकत होतो. वडिलांनी दुसरे लग्न केले. आई कोलमडून पडली. बहीण कावरीबावरी झाली. अस्वस्थ होऊन मी घर सोडले.

पलीकडच्या गावी तमाशाचा तंबू दिसला. मॅनेजरला भेटलो. त्या रात्रीपासून तमाशामध्ये भरती झालो. पाच वर्षे गेली. मला उपरती झाली. तमाशा हे काही आपले जीवन नाही. अशाने आपल्या जीवनाचा तमाशा झाल्याशिवाय राहणार नाही. तमाशा सोडला. पुढे काय? भविष्य घडवायचे असेल तर त्यासाठी शिक्षण हवे. जी शाळा सोडली होती, त्या शाळेत परत गेलो; पण शाळेने प्रवेश नाकारला. सुन्न अवस्थेत बसलेलो असताना एका जुन्या मित्राने आपल्याला भेटायला सांगितले. सर, मोठ्या आशेने मी तुमच्याकडे आलो आहे. मला तुमच्या शाळेत प्रवेश मिळवून द्या.’ तो पुन्हा रडायला लागला. त्याला शांत केले. दुसऱ्या दिवशी मुख्याध्यापकांना सगळी परिस्थिती समजावून सांगितली. ‘याला माझा पाल्य समजा. याच्याकडून कुठलीही आगळीक घडली तर मला जबाबदार धरा; पण याला एक संधी द्या,’ असे सांगितले. त्यांनी थोड्याशा नाखुशीनेच माझी विनंती मान्य केली.

तो नियमित शाळेत यायला लागला. अगोदरच हुशार होता. परिस्थितीच्या चटक्‍यामुळे त्याला शिक्षणाचे महत्त्व पटलेले होते. त्यामुळे त्याने जोमाने अभ्यास करून थोड्याच दिवसात आपल्या अभ्यासाने सगळ्या शिक्षकांची मने जिंकली. दहावीच्या परीक्षेत शाळेच्या दोन्ही तुकड्यांमध्ये तो सर्व विद्यार्थ्यांमध्ये प्रथम आला. आजही शाळेच्या दर्शनी भागात असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीतील फलकावर त्याचे नाव झळकत आहे. निकाल लागल्यानंतर थोड्याच दिवसात एस. टी.मध्ये त्याची कंडक्‍टर म्हणून निवड झाली. जर त्याला झिडकारून लावले असते तर... तर काय झाले असते!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com