टोमॅटो कसे आहेत?

सुधीर करंदीकर
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

व्यवहार रोजचाच. विंदा करंदीकरांच्या शब्दांत सांगायचे, तर ‘तेंच ते आणि तेंच ते.’ कंटाळवाणे रहाटगाडगे. पण एखादा थोड्या वेगळ्या नजरेने याकडे पाहतो आणि आसपासचे जगच गमतीदार होऊन जाते.
 

मुलीकडे जाताना भाजी न्यायची होती, म्हणून पत्नी भाजीच्या दुकानात गेली. मी तिथेच उभा होतो. तेवढ्यात एक मॅडम दुकानात आल्या.

मॅडम - अरे, टोमॅटो कसे आहेत? 

दुकानदार मुलगा : मॅडम, टमाटे एकदम मस्त आहेत. आज न्याल तर पुन्हा नक्की याल.  

व्यवहार रोजचाच. विंदा करंदीकरांच्या शब्दांत सांगायचे, तर ‘तेंच ते आणि तेंच ते.’ कंटाळवाणे रहाटगाडगे. पण एखादा थोड्या वेगळ्या नजरेने याकडे पाहतो आणि आसपासचे जगच गमतीदार होऊन जाते.
 

मुलीकडे जाताना भाजी न्यायची होती, म्हणून पत्नी भाजीच्या दुकानात गेली. मी तिथेच उभा होतो. तेवढ्यात एक मॅडम दुकानात आल्या.

मॅडम - अरे, टोमॅटो कसे आहेत? 

दुकानदार मुलगा : मॅडम, टमाटे एकदम मस्त आहेत. आज न्याल तर पुन्हा नक्की याल.  

अरे कसे म्हणजे तसे कसे नाही. कसे आहेत?
मॅडम लाल आहेत आणि हिरवे पण आहेत. घरी गेल्यावर लगीच सार किंवा कोशिंबीर करायची असेल तर पूर्ण पिकलेले लाल घेऊन जा. भाजी करायची असेल तर हिरवे टमाटे न्या. थोडे कमी पिकलेले पण आहेत. एकदम लहान आहेत आणि मोठे पण आहेत. कुठले देऊ?

अरे कसे आहेत म्हणजे कसे दिले? 
मॅडम, अजून दिले कुठे? आताच तर दुकान उघडले आहे. आताच एका मॅडमना भेंडी दिली, एकाला पालक दिला. टमाटोची बोहोनी तुम्हीच करा.

किती देऊ?
अरे, पण देणार कसे, ते सांग ना. 
मॅडम वजन करूनच देणार. तुमच्याकडे पिशवी असेल तर त्यात देईन.

नाहीतर कॅरीबॅगचा एक रुपया पडेल. बोला किती देऊ ?
अरे भाव सांगशील का नाही! भाव केल्याशिवाय कसे घेणार?
मॅडम, इथे भाव होत नाही. एकदम फिक्‍स्ड रेट, असे म्हणून त्याने बाजूच्या मोठ्या फलकाकडे बोट दाखवले. त्यावर लिहिले होते, इथे भाव होणार नाही, वाजवी भावात उत्तम माल इथे मिळेल. खाली भाज्यांची नावे व त्यांचा किलोचा भाव लिहिलेला होता. मॅडमनी फलक बघितला आणि म्हणाल्या,

अरे आधीच बोर्ड दाखवायचा नाही का? 
तुम्ही टमाटोचा रेट विचारलाच कुठे?

हा सगळा संवाद होईपर्यंत पत्नीची भाजी घेऊन झाली होती. आम्ही आणि त्या मॅडम एकदमच दुकानातून बाहेर पडलो.  

चार दिवसांनंतर (तेच ठिकाण, साधारण तीच वेळ) 
एक मॅडम दुकानात आल्या, अरे, टोमॅटो कसे आहेत? मला वाटले, की मुलगा आता भाव लिहिलेल्या फलकाकडे बोट दाखवेल. पण दुकानदार मुलगा व मॅडम यांची पुढची डायलॉगबाजी साधारण परवासारखीच झाली. मॅडम स्मित हास्य करत टोमॅटो घेऊन बाहेर पडल्या. मी मुलाला विचारले, टोमॅटो कसे आहेत विचारल्यावर तुम्ही थेट भाव सांगायला पाहिजे ना! अशी लांबण का लावता. एखादे गिऱ्हाईक चिडेल ना!

काका, अगदी खरे आहे तुमचे म्हणणे. पण काय आहे, आमचा धंदा एकदम रुक्ष आहे. भाव सांगायचा, भाजी द्यायची आणि पैसे घ्यायचे. थोडे गमतीशीर बोलायला किंवा ऐकायला मिळाले तर तेवढीच मजा येते. दिवस छान जातो. येणाऱ्या प्रत्येक गिऱ्हाईकाची बोलण्याची पद्धत वेगळी असते. गिऱ्हाईकाच्या चेहऱ्याकडे बघून मला समजते, की फिरकी घ्यावी का किंवा नाही. काही गिऱ्हाईके पण माझी फिरकी घेतात. मजा येते. दुकानात उभी असलेली बाकीची मंडळीही काही वेळा चर्चेत भाग घेतात. लोकांच्या आणि माझ्या चेहऱ्यावर हास्य येते. 

बरोबर आहे तुमचे. मलाही ऐकताना मजाच आली. 
काका, आनंद, मजा ही वाटली की वाढते. खरंय ना! पण मुळात त्याकरिता मजा निर्माण व्हायला पाहिजे ना! तुम्हाला मजा आली. तुम्ही चार लोकांना सांगणार, एखादा लिहिणारा असेल तर तो व्हॉट्‌सॲपवर टाकणार आणि ते आणखी काही जण वाचणार. ही आनंदसाखळी असते, काका. 
त्याने दुकानातला एक सुंदर पिकलेला मोठा पेरू माझ्या हातात दिला आणि म्हणाला, काका, हा पेरू तुमच्यासाठी. फळांच्या चवीच्या प्रसारासाठी. तुम्ही दुकानात नेहमी भाजी घेता, पण कधी सिझनल फळे माझ्याकडून घेतली नाहीत. आता पुढच्या वेळेला भाजी पण घ्याल आणि फळे पण. व्यवसायाचा प्रसार म्हणा हवं तर याला. 
तो छानसा हसला. मी नकळत म्हणालो,
वाह, क्‍या बात है!

Web Title: muktpeeth article sudhir karandikar