मृत्यूच्या छायेत जगताना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 जून 2016

"मृत्यूला आंजारलं-गोंजारलं, की तो आपल्या मानगुटीवर बसतो. मी त्याला टाचेखाली दाबून ठेवलं!‘ तो प्रसन्न हसला. त्याचं जीवनावर अतिशय प्रेम आहे. म्हणूनच कदाचित मृत्यू त्याच्याजवळ यायला घाबरत असावा!

"मृत्यूला आंजारलं-गोंजारलं, की तो आपल्या मानगुटीवर बसतो. मी त्याला टाचेखाली दाबून ठेवलं!‘ तो प्रसन्न हसला. त्याचं जीवनावर अतिशय प्रेम आहे. म्हणूनच कदाचित मृत्यू त्याच्याजवळ यायला घाबरत असावा!

एका संध्याकाळी ऍनेस्थेटिस्ट मित्राला फोन करून सांगितलं, "उद्या ऍपेंडिक्‍सचं एक ऑपरेशन आहे. साडेदहा वाजता ये.‘ तो म्हणाला, "मी प्रॅक्‍टिस सोडलीय.‘ "काय?‘ मी विचारलं. दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी गेलो. तो सोफ्यावर टेकून बसला होता. मला धक्काच बसला त्याला बघून. दाढी वाढलेली, कृश शरीर, गालफडं आत गेलेली, अस्ताव्यस्त केस, मलूल चेहरा. डोळे मात्र टपोरे आणि तेजस्वी. "ये, बैस.‘ तो म्हणाला, "मला ब्लड कॅन्सर झालाय. क्रॉनिक मायलॉइड ल्युकेमिया.‘ माझ्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. काही बोलणं सुचेना. त्याचा हात आपुलकीनं हातात घेतला. म्हटलं, "तू आज परकं केलंस मला, यार.‘

"2006 मध्ये शंका आली होती. लगेच कॅन्सर स्पेशालिस्टला भेटलो. निदान झालं. "या व्याधीतला रुग्ण दहा-बारा वर्षे जगू शकतो. कसं जगायचं हे तू ठरव‘, असं डॉक्‍टरनं सांगितलं. त्या रात्री मी विचार केला. प्राक्तन स्वीकारायचं. "मीच का? मलाच का?‘ असले प्रश्‍न विचारायचे नाहीत. रोज मरत मरत जगण्यापेक्षा आनंदानं जगत जगत मरावं, असं ठरवलं. मुख्य म्हणजे ही बाब कुणालाही समजू द्यायची नाही, हेही ठरवलं. प्रत्यक्ष बायकोलाही नाही! मग स्वतःला प्रॅक्‍टिसमध्ये बुडवून घेतलं. भरपूर कामामुळे आजाराचा विचारच मनात येत नव्हता. तपासण्या, औषधं सुरूच होती. पण बायकोला 2010 मध्ये संशय आलाच. माझं वजन कमी होऊ लागलं. चेहरा फिकट आणि पांढरट दिसू लागला. शेवटी तिला वस्तुस्थिती सांगितली. ती कोसळलीच! मुलांपासून 2014 पर्यंत लपवू शकलो. शेवटी त्यांनाही सांगितलं. 2006 मध्येच मी घरात हे सांगितलं असतं, तर त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असता. तरुण मुलं, त्यांचे संसार यांवर माझ्या आजाराचं सावट पडलं असतं. कमीत कमी आठ वर्षं तरी मी त्या सगळ्यांना आनंदानं जगू देऊ शकलो, याचं मला समाधान आहे.

मृत्यूची छाया फार गडद असते. ती सुखाची किरणं आत येऊ देत नाही. ती छाया मी माझ्या कुटुंबावर पडू दिली नाही. मुलं आता मोठी झाली आहेत. बायकोही सावरली आहे. आपण मृत्यूला आंजारलं-गोंजारलं, की तो आपल्या मानगुटीवर बसतो. मी त्याला टाचेखाली दाबून ठेवलं!‘ तो प्रसन्न हसला.
हा मित्र खूप वाचन करतो. सगळी भावगीतं त्याला पाठ आहेत. आठवड्यातून एक-दोनदा त्याला रक्त द्यावं लागतं. रक्त देत असताना तो अस्वस्थ होतो. श्‍वास घ्यायला त्रास होतो. पायावर सूज आली आहे. हे असूनसुद्धा जेव्हा बरं वाटतं तेव्हा तो गातो, कविता म्हणून दाखवतो. वाचलेल्या पुस्तकांवर चर्चा करतो. आपल्या आजूबाजूला अनेक माणसं असतात. त्यांना छोट्या-छोट्या दुखण्यांची भीती वाटत असते. हा गृहस्थ गेली दहा वर्षं मृत्यूला उशाशी घेऊन झोपतो. परवा तो कॅन्सर स्पेशालिस्टला भेटला. त्यानं त्याला जेमतेम चार-पाच महिने जगू शकशील, असं सांगितलं. ब्लड कॅन्सरमुळे शरीरात रक्त तयार होत नाही; ते बाहेरून द्यावं लागतं. आजवर सुमारे पस्तीस बाटल्या रक्त दिलं गेलं आहे. जास्त प्रमाणात रक्त दिले तर त्याचेही विपरीत परिणाम होतात. तो ते सर्व भोगतोय. पण कुठल्याही प्रकारची तक्रार, चिडचिड नाही.

माझ्या मते, अतिशय उच्चकोटीचा सकारात्मक दृष्टिकोनच त्याला जगण्याचं बळ देत असावा. त्याचं जीवनावर अतिशय प्रेम आहे. म्हणूनच कदाचित मृत्यू त्याच्याजवळ यायला घाबरत असावा. मध्यंतरी "पराधीन आहे, जगती पुत्र मानवाचा‘ हे गाणं ऐकताना तो गंभीर झाला. काहीच बोलला नाही. कदाचित, "मरण कल्पनेशी थांबे, तर्क जाण त्याचा‘, हे त्याला पटलं असावं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktpeeth, dr laxmikant khond