ते ४५ दिवस !

ते ४५ दिवस !

पुढचा क्षण कसा असेल, आपण टाकणार असलेले पाऊल कुठे नेणार आहे, हे आपणाला त्याक्षणी कळतच नसते. आपण विश्‍वासाने वावरत असतो, कारण आपल्याला पुढचे काहीच कळत नसते. 

स्वित्झर्लंडच्या बर्फाच्छादित गुहेपाशी मी माझ्या पतींबरोबर उभी होते. गुहेतील रहस्य खुणावत होते; पण पुढच्या क्षणाचे गुपित आम्हाला माहीत नव्हते. तो क्षण आणि त्यानंतरचे पंचेचाळीस दिवस आमच्यासाठी परीक्षा पाहणारे होते. 

युरोपियन देशाचे निसर्गवैभव उपभोगून आम्ही स्वित्झर्लंडमधील माऊंट टिटिलीयसला गेलो. तेथील प्रसिद्ध ‘स्नो केव्ह’चे आम्हाला आकर्षण वाटत होते. स्वित्झर्लंडचे सृष्टिसौंदर्य मनाला भुरळ घालणारे असेच असल्याने माझ्याही मनात विचार डोकावला, की या नंदनवनात राहणारे लोक खरेच भाग्यवान आहेत. एका आनंदातच त्या गुहेत शिरत होतो. तेवढ्यात गुळगुळीत अशा बर्फावरून विलासचा पाय अचानक घसरला आणि ते खाली पडले. किरकोळ लागले आहे असे वाटले. ते पुन्हा चालू लागले, पण गुहेतील रेलिंगला धरतानाच पुन्हा खाली पडले. त्यानंतरही दोन तास फिरलो. मात्र, परतीच्या प्रवासात त्यांना अस्वस्थ वाटू लागले. थोड्याच वेळात उलटी होऊन त्यांची शुद्ध हरपली. त्या वेळी माझ्या पायाखालची जमीन सरकली. सिटी हॉस्पिटलमध्ये जाऊन ब्रेन स्कॅन केले.   मेंदूत रक्तस्राव झाला होता. त्यामुळे डॉक्‍टरांनी त्यांना हेलिकॉप्टरने स्वित्झर्लंडची राजधानी बर्न येथे इनसेल हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल केले. 

श्री स्वामी समर्थांवर भरवसा ठेवून आमचे स्नेही वैद्य यांच्या बरोबर मी बर्नमधील इनसेल हॉस्पिटलमध्ये पोचले. मी तेथे पोचण्यापूर्वीच त्यांची मेंदूवरील शस्रक्रिया पूर्ण करून अतिदक्षता विभागात ठेवले होते. या कोणत्याच गोष्टींसाठी माझ्या परवानगीची वाट पाहिली गेली नव्हती. उपचारांना प्राधान्य देण्यात आले होते. या घटनेची माहिती भारतातील नातेवाईक, मित्रांना दिली व लगेच मदतीचा हात पुढे आले. माझ्या बहिणीच्या जावेची मैत्रीण कीर्ती गद्रे ही झुरीच येथे आहे. तिने व्हॉटस्‌ॲपवर एक पोस्ट टाकली आणि या अनोळखी देशात मी एकटीने काय करायचे, या विचारात हॉस्पिटलमध्ये बसले असताना चार तरुण विद्यार्थी तेथे आले. ते पीएच.डी.साठी त्या देशात आले होते. त्या चौघांपैकी संपदा हिने तिच्या खोलीवर माझी राहण्याची व्यवस्था केली. तिच्या खोलीपासून रुग्णालय साधारण चार किलोमीटरवर होते. तीन दिवस मी पायी प्रवास करूनच रुग्णालयात पोचत होते. 

या परिस्थितीत जेवणही सुचत नव्हते आणि कॅंटीनमधून काही खरेदी करावे तर भाषेचा अडसर येत होता. त्यामुळे उपवास घडे. हे जेव्हा संपदाला कळले तेव्हा तिने लवकर उठून पोळी - भाजीचा डबा द्यायला सुरवात केली. मला रोज हॉस्पिटलपर्यंत सोडणे संपदाला शक्‍य नव्हते. तिने मला बस क्रमांक, मार्ग यांची माहिती दिली. मग मी रोजच बसने प्रवास सुरू केला. या प्रवासातही बस क्रमांक, बस मार्ग चुकत नाही ना, इच्छित थांब्याऐवजी मागे-पुढे उतरत नाही ना, अशी भीती कायमच असायची. आजपर्यंतचा सगळा प्रवास मी जोडीदाराबरोबर केला; परंतु हा प्रवास मात्र मला जोडीदाराशिवाय जोडीदाराकरिता करावा लागत होता. अशातच आणखी परीक्षा सुरू झाली. जवळचे पैसे संपत आले होते. 

विलास यांच्या शरीराची थोडी जरी हालचाल झाली तरी क्षणभरासाठी का होईना खूप बरे वाटायचे; परंतु लगेच हा भास तर नसेल ना, असे वाटायचे. एवढेच कमी होते म्हणून की काय विलास यांच्या तब्येतीतही विशेष सुधारणा दिसत नव्हती. म्हणून मेंदूवर दुसरी शस्रक्रिया करण्यात आली. नेहमीप्रमाणे मी सकाळी रुग्णालयात गेले तेव्हा विलास जागेवर नव्हते. भाषेचा प्रश्‍न नेहमीसारखाच पुढे उभा. त्यामुळे प्रत्येक मजल्यावरील खोलीत शोध घेत मी फिरत होते; पण ते मात्र सापडत नव्हते. शस्त्रक्रियेनंतर त्यांना वेगळ्या रुममध्ये हलविण्यात आले होते. मग मला सापडणार कसे? त्याचवेळी फेसबुकवरील माहिती वाचून श्री. पांगारे हे गृहस्थ भेटण्यास आले होते. माझा भारतीय पेहराव पाहून व माझी सैरभैर मनःस्थिती लक्षात घेऊन त्यांनी माझी चौकशी केली व धीर दिला. त्यांनी त्या दिवशी रजा काढून मला खूपच मदत केली. या शस्त्रक्रियेनंतर विलासांच्या तब्येतीत लक्षणीय सुधारणा झाली. 

याच सुमारास माझी भाचेसून ऋचा साने-नानजकर लंडनहून मदतीस आली. त्यामुळे मला खूप आधार मिळाला. आता प्रश्‍न होता हॉस्पिटल बिलाचा; परंतु ट्रॅव्हल इन्शुरन्स असल्याने फार तोशीस पडली नाही. या गडबडीत विलास यांच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांचा मला विसर पडला होता; पण तेथील डॉक्‍टरांनी ते दागिने माझ्या हाती सुपूर्त केले. सुश्रुतेबाबत सांगायचे तर माझ्या मिस्टरांची दाढीदेखील तेथील नर्स आनंदाने करायची.  
त्या नवख्या भूमीवरचा हा अनुभव घेऊन पुन्हा मातृभूमीवर पाय ठेवले तेव्हा अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com