कष्टाचं झाड

नयना डुंबरे-पाचारणे
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

बीज अंकुरले आणि कष्टाचे झाड रुजल्याचे समाधानाचे फूल लेकराच्या चेहऱ्यावर फुलले.

बीज अंकुरले आणि कष्टाचे झाड रुजल्याचे समाधानाचे फूल लेकराच्या चेहऱ्यावर फुलले.

माझ्या छोट्या मुलाच्या ऐकण्यात "कष्टाचं झाड' हा शब्द आला. त्याला समजेल अशा सोप्या भाषेत कष्टाच्या झाडाची व्याख्या सांगितली. त्यातून त्याला एवढेच समजले, की स्वतः झाड लावायचे आणि त्याला रोज पाणी घालून जगवायचे. मग तो रिकाम्या कुंडीसाठी माझ्यामागे लागला. आज देईन, उद्या देईन करीत मी वेळ काढत राहिले. तर एके दिवशी त्यानेच एका कुंडीतले फुलझाड उपटून फेकून दिले. कुंडीतली सगळी माती खालीवर हलवली आणि मग विचार सुरू झाला, कोणते झाड लावावे? बिल्डिंगमध्ये सगळया मित्रांना त्याने सांगून ठेवले होते आणि एके दिवशी त्याच्या एका मित्राने त्याला कापसाची बी आणून दिली. या झाडापासून कपडे तयार होतात असे त्याच्या आज्जीने सांगितलेय हेही त्या मित्राने सांगितले. लगेच ते बी कुंडीत लावले गेले. रोज पाणी घालायला सुरवात झाली. रोज सकाळी अंथरुणातून उठला, की पहिला तो त्या कुंडीजवळ जायचा. झाड उगवले, की नाही ते पाहायचा आणि मला विचारायचा, ""आई, अजून कसे नाही उगवले झाड?'' ""अरे बाळा, त्याला वेळ लागतो.'' ""किती दिवस लागतात?'' ""दहा-पंधरा दिवस लागतील,'' मी अंदाजे सांगायची. मग तो दिवस मोजत बसायचा.

...आणि एक दिवस मातीच्या वर एक अंकुर फुटलेला त्याने पाहिला आणि पळत पळत माझ्याकडे आला. ""आई, आई... माझे कष्टाचे झाड उगवलेय..'' आणि माझे पिठाने हात भरलेले असतानाही त्याने मला ओढत गॅलरीत आणले. आणि दाखवले, तर खरोखरच एक कोवळा कोंब मातीतून वर आला होता. मलाही आनंद झाला. त्याचे कौतुक वाटले. त्याने त्याच्या सगळ्या मित्रांची पलटनच जमा झाली. झाड उगवल्याने त्याचा आत्मविश्‍वास वाढला. हळूहळू त्या फुटलेल्या कोंबाचे मोठे झाड झाले आणि आता दोन दिवसांपूर्वी त्या झाडाला एक छोटेसे फूलही आले आणि माझ्या लेकराच्या तोंडावर "कष्टाचं झाड' वाढवल्याचे समाधान!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nayana dumbre pacharne write article in muktapeeth