सृजनाविष्काराची दुपार!

प्रसाद इनामदार
शनिवार, 7 जानेवारी 2017

कलादालनात 40-50 तरुण दाटीवाटीने बसले होते. सर्वांची नजर कलादालनाच्या मध्यभागी खिळलेली. बाहेरील वातावरणाचा कसलाही स्पर्श तेथे नव्हता. बासरीच्या हळुवार सुरावटींखेरीज तेथे फक्त शांततेचे अस्तित्व होते. कलादालनामध्ये "कलामंदिर'च्या काही तरुण कलाकारांच्या कलाकृती मांडलेल्या होत्या. त्याही त्या वातावरणाशी अगदी एकरूप झालेल्या; मात्र तरीही प्रत्येकीचं स्वतंत्र अस्तित्व अधोरेखित करत होत्या. साखर खाणाऱ्या मुंग्यांच्या शिल्पाजवळ बसलेले तरुण अगदी सावरून बसलेले, जणू त्या मुंग्या येऊन डसतील की काय असंच वाटावं.

नव्याने येणाराही त्या वातावरणाला "आकर्षित' होऊन त्यातीलच एक बनून जात होता. मनात बोललो तरी गलका होईल की काय असे वाटावे, अशी एक भारलेली दुपार. एरवी दुपार आळसावलेली असते; मात्र त्या कलादालनात सुरू असलेल्या सृजनाविष्कारामुळे ती दुपार प्रसन्न बनली होती. मध्यभागी फक्त त्या कलाकाराची हालचाल सुरू होती; पण त्याची हालचाल त्या शांत मैफलीची जान होती. त्याची बोटं समोर मांडलेल्या मातीच्या गोळ्याला जिवंत करण्यात तल्लीन झाली होती. त्याच्या बोटांची लयबद्ध हालचाल नजर हटू देत नव्हती. समोर बसलेली मुलगी जशीच्या तशी साकारण्यासाठी तो तरुण कलाकार आपले कसब आजमावत होता. शिकलेल्या संचिताला मातीच्या गोळ्यामधून मांडू पाहत होता. डोळे तिच्यावर खिळलेले, बोटे मातीच्या गोळ्याला आकार देण्यात एकरूप आणि चेहऱ्यावर नवनिर्मितीचा आनंद विलसू लागला होता. असे म्हणतात, कलाकार जादूगार असतात. त्याचा प्रत्यय समोर होता. त्याच्या बोटांची जादूगरी शिल्प घडवण्यात हरवली होती. पाहता पाहता मातीचा निर्जीव गोळा आकारास येऊ लागला. सहायकांकडून एक-एक गोळा घेत तो कलाकार शिल्पामध्ये प्राण भरण्यात एकजीव झालेला. तो भोवताल विसरलेला. आपल्यामुळे भोवती एक छानशी मैफल सजली आहे, हे त्याच्या गावीही नव्हते. तो त्याच्याही नकळत मैफलीत रंग भरत होता आणि पाहणारे त्याचा आस्वाद घेण्यात रंगून गेले होते. मातीच्या गोळ्याने आधी काहीसा आकार धारण केला, नंतर त्यावर बारकाव्यांसह मुलीची प्रतिकृती उमटू लागली. खूप वेळ बसून कंटाळलेल्या त्या मुलीच्या चेहऱ्यावरही हास्य विलसू लागले. नेमका हाच क्षण त्या कलाकाराने पकडला आणि बनवलेल्या शिल्पाच्या चेहऱ्यावर भावरेषा उमटवल्या.

शिल्प पूर्णत्वाला जाऊ लागेल तसे उपस्थितांच्या डोळ्यांच्या बाहुल्याही समाधानाने विस्फारल्या. कलाकाराने अखेरचा हात फिरवला. त्या शिल्पापासून तो दूर उभा राहिला आणि एकवार मुलीकडे आणि एकवार शिल्पाकडे बारकाईने पाहिले. काही कसूर राहिली नसल्याची खात्री पटल्यावर स्वतःशीच समाधानाने हसला आणि उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. कोणी त्या कलाकाराचे मातीभरले हात हातात घेऊन त्याचे अभिनंदन केले, कोणी त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. कोणी त्याच्यासोबत छायाचित्रे काढून घेतली, कोण ते शिल्प पाहण्यात गढून गेले. रंगलेली मैफल अगदी समेला पोचली. नवसृजनाच्या आनंदाचा शिडकावा करत एक दुपार प्रफुल्लित करत राहिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prasad inamdar's muktapeeth article