सनबर्डच्या पिलांची गोष्ट

प्रा. माधुरी घाणेकर
शुक्रवार, 25 मे 2018

पिलांना आईपर्यंत नेण्याची माझी जबाबदारी होती. आई आणि पिलांची भेट झाल्यावर मला झालेला आनंद शब्दातीत आहे.

पिलांना आईपर्यंत नेण्याची माझी जबाबदारी होती. आई आणि पिलांची भेट झाल्यावर मला झालेला आनंद शब्दातीत आहे.

आमच्या घराभोवती भरपूर झाडी असल्यामुळे नेहमीच खूप तऱ्हेचे पक्षी घराजवळ बागडत असतात. 4-5 वर्षांपूर्वीच्या मार्च महिन्यातील गोष्ट. मी बाल्कनीतल्या कुंड्यांना पाणी घालत होते. मला समोरच्या झाडावर पर्पल सनबर्ड नर व मादी दिसले.
मला प्रथम वाटले, ते कुठल्यातरी फुलांच्या शोधात आले आहेत. पण नंतर लक्षात आले, की ते मी बाल्कनीतून जाण्याची वाट बघतायेत. मादी कसलेतरी निरीक्षण करत असल्यासारखं वाटलं आणि नंतर ती सतत बाहेर जाऊन झाडांचे तंतू, बारीक काड्या, दोऱ्या, धागे आणताना दिसली. बाल्कनीतील कपडे वाळत घालण्याच्या एका दोरीच्या दांडीवर मादी सनबर्डने तीन दिवसांत एक सुंदर सुरक्षित घरटे विणले. मी घरात सगळ्यांना घरटं दाखवून सांगितलं की, "या दांडीवर कोणीही कपडे वाळत घालू नका.'
मादीने घरट्यात मऊ मऊ पिसे, कापूस आणून तिने अंथरला. या संबंध काळात नर एका विशिष्ट स्वरात गात होता. एक दिवस मादीने अंडी घातल्याचं लक्षात आलं. दहा दिवसांनंतर आई चोचीतून काहीतरी आणताना दिसली, म्हणजे पिले झाली होती. एकदा आई सनबर्ड पिलांना खाद्य आणायला बाहेर गेल्यावर मी कॅमेरा घेतला आणि हळूहळू दोरी खाली आणली. मी शूटिंग करायचा प्रयत्न केला, पण इतक्‍यात माझा मुलगा ओंकार तिथे आला आणि एकदम ओरडला ""आई ! शूटिंग करतेस?'' झालं. मी पटकन दांडी वर सरकवली. चार-सहा दिवसांनंतर एकदा चुकून मुलांनी ती दांडी खाली ओढली होती तेव्हा पिलं जोरात हलताना मी पाहिली. त्यांच्या आई-बाबांच्या फेऱ्यांची वेळ होती म्हणून दांडी वर सरकवली. नंतर 2 दिवसांनी आई रात्रीची पिलांसोबत घरट्यात नसते हे माझ्या लक्षात आले याचाच अर्थ पिलं रात्रीची एकटीच असतात. आता मला रात्री शूटिंग करता येणार होते.

एका रात्री मी शूटिंग करायचं ठरवलं. दोरी हळूहळू खाली ओढली. घरटं खाली आणताना घरट्याचं दार किचनकडे होतं आणि किचनमध्ये दिवा सुरू होता. मला काही कळायच्या आत एक लांब चोच किचनमध्ये उडाली. अरे बापरे ! पिलांची आई होती की काय? आणि परत एकदा किचनमध्ये काहीतरी उडालं. दोन्ही पिले बाहेर पडली. मला एकदम धस्स झालं. त्यांच्या आईला कळलं तर? एक पिलू धडपडत होते, त्यावर रुमाल टाकून उचललं आणि परत घरट्यात ठेवायचा प्रयत्न केला. "आई ! अगं, पिलांना हात लावू नकोस. तूच तर सांगितलंस ना त्यांचे आई-बाबा त्यांना मारतात म्हणून !' माझा मुलगा नको तेव्हा कसा कडमडतो. मला कळत नाही. या माझ्या प्रयत्नात ते पिलू घरट्यांतून परत बाल्कनीत उडालं. आता मात्र मी थरथरले बाहेर कुणी रात्री त्याला खाल्लं तर? तसंच रुमालातून उचलून घरात आणलं. तुला कुणी सांगितलेत नसते उद्योग? इति मुलांचे बाबा.

पिलं बाहेर जाऊ नये म्हणून मी दारं-खिडक्‍या लावल्या. पिलं त्यांच्या आई-बाबांपर्यंत सुखरूप कशी पोचवायची हाच माझ्यापुढे प्रश्‍न होता. दोघं एकमेकांना आणि आई-वडिलांना हाका मारत होती. छोटं मोठ्याकडे जायचा प्रयत्न करत होतं. मी दिवा सुरू ठेवून सर्वांना झोपायला पिटाळलं. दिव्यामुळे पिलं घाबरणार नाहीत असं वाटलं. मी झोपायला गेले तरी त्यांच्या चीई-चीई हाका सुरूच. दिवा बंद केल्यावर थोड्या वेळातच पिलांचा आवाज थांबला. खरी काळजी तर सकाळचीच होती. पिलं घरट्यात न दिसल्यास आई काय करेल? पिलं शोधेल की मेली असं समजून निघून जाईल? विचार करता करता डोळा लागला.

सकाळी साडेसहाला जाग आली. पिलं?? मी धसकून उठले. किचनमध्ये आले. पिलांचा आवाज ऐकू येत होता, पण कुठे आहेत ते कळत नव्हतं. मोठं पिलू खिडकीतून बाहेर जाण्याची धडपड करत होतं. काचेमुळे त्याला आई दिसत होती, पण बाहेर जाता येत नव्हतं. त्याची आई बाहेरून त्याला बोलावत होती आणि ते प्रतिसाद देत होतं. मी हळूच पुढे होऊन बाल्कनीचं दार उघडलं पण तरीही आई आत येईना पिलू बाहेर जाईना. शेवटी थोडं हुस्स-हुस्स केल्यावर दुसऱ्या बाजूच्या खिडकीत गेलं. मी बाल्कनीत जाऊन पाहिलं. वर घारी उडत होत्या आणि खाली मनीमाऊ बसलेली होती. खिडकीच्या आत व बाहेर माय-लेकरांची अस्वस्थ धडपड सुरू होती. पिलू खाली पडायला नको होतं आणि घारींचाही घास व्हायला नको होतं. शेवटी देवाचं नाव घेऊन खिडकी उघडली आणि लेकराला घेऊन आई झाडावर गेली. एक तरी पिलू सुखरूप पोचलं. छोट्या पिलाचा आवाजही येत नव्हता. छोट्याला शोधलं, त्याच्यापाशी गेले तरी उडेना. हाका मारेना. एका पेपरवर त्याला उचलायचा प्रयत्न केला. त्याबरोबर ओरडलं. त्याच्या आईने बाहेरून आवाज दिला. पिलू एकदाचं उडालं आणि बाल्कनीच्या गजावर बसलं. आई जवळ होती. ती त्याला "प्रयत्न कर, येईल तुला उडता. या झाडावर ये पाहू ! माणसांपासून दूर !!' असे सांगत असावी. एकदाचं पिलू उडालं आणि समोरच्या झाडावर बसलं. मी निःश्‍वास सोडला. रात्रीच्या घरात उडण्याच्या अनुभवाचा पिलांना फायदाच झाला होता. ती सुखरूप त्यांच्या आई-वडिलांकडे पोचली होती !!
शेवटी All is well, that ends well!

Web Title: prof madhuri ghanekar write article in muktapeeth