अब्बा अजूनही आहेत...

अब्बा अजूनही आहेत...

मला पीएच.डी. ही मिळेल. पण त्या आनंदात सहभागी व्हायला अब्बा नाहीत, याची मनात कायमची रुखरुख राहील. अब्बांच्या जाण्याने माझ्या जीवन प्रवासात दाट सावली देणारे झाडच कोलमडून पडले.

ती रात्र अजून आठवते. सगळे जण किती उशिरापर्यंत गप्पात रंगले होते. आम्ही भावंडे लहानपणीच्या आठवणीत रमलो होतो. इतक्‍यात अब्बांना खूपच अस्वस्थ वाटू लागले. पाहता पाहता त्यांना श्‍वास घेताना त्रास होऊ लागला. म्हणून तातडीने रुग्णालयात घेऊन गेलो. पण काही उपयोग झाला नाही. पहाटेच्या सुमारास अब्बा अल्लाह घरी गेले.

जन्म आणि मृत्यू या काळातील प्रवासाला आयुष्य असे म्हणतात. हे आयुष्य जगताना माणूस अनेक नाती जोडतो. स्वतःच्या चांगल्या जगण्याने चालते बोलते चित्र मागे ठेवून जातो. चांगले जीवन जगलेला माणूस कधी कुणाला हात धरून चालवतो, कुणाचे भरून आलेले डोळे पुसतो, कधी जीवनाशी अटीतटीने संघर्ष करतो. घरावर सावली धरणारा ज्या वेळी या जगातून जातो तेव्हा मात्र अंधारून आल्यासारखे वाटते. माझे अब्बा हाजी मोहम्मद अमीर खान यांना जगातून जाऊन तीन वर्षे झाली असली, तरी त्यांच्या गुणविशेषांनी ते अजूनही आमच्यामध्येच आहेत, असे वाटत राहते. असे राहणे म्हणजे त्यांच्याशी जुळलेला जणू भावनिक कोमल धागाच!
अब्बांचा जन्म श्रीगोंदा तालुक्‍यातील म्हातारपिंप्री या छोट्याशा गावात झाला. आजोबाकडे भरपूर शेती होती. पण दुष्काळांशी सामना करावा लागत असल्याने सतत आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागायचे. अब्बांना शिक्षणासाठी नगरला जम्मो फूफीकडे जावे लागले. जम्मो फूफी विधवा असल्याने खूप कष्ट करायच्या. त्यांनी गोधड्या शिवून, शेवया करून, प्रसंगी मिळेल ते काम करून स्वतःच्या मुलांबरोबर अब्बांचे शिक्षण पूर्ण केले. अब्बांना श्रीगोंदा येथे नोकरी मिळाली आणि दिवस पालटले. नंतर काही दिवसांनी लष्कराच्या एम.ई.एस. विभागात नोकरी मिळाली आणि मध्य प्रदेशच्या जबलपूर या ठिकाणी नियक्ती झाली. म्हातारपिंप्रीत राहणारी मी आणि माझी अम्मी जबलपूरला गेलो.

अब्बा लष्करात असल्याने दरवर्षी दोन महिन्यांची सुटी मिळायची. त्या सुटीत आम्ही जबलपूरहून रेल्वेने गावी यायचो. श्रीगोंदा रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर अब्बा आणि मी कधी चालत, तर कधी पळत शेतातल्या घराकडे निघायचो. घरी आजी- आजोबा, काका- काकूंना भेटल्यावर जो आनंद व्हायचा तो शब्दातून व्यक्त करता येत नाही. सोबतचे सामान आणि अम्मींना आणण्यासाठी बैलगाडी किंवा ट्रॅक्‍टर स्टेशनकडे यायचा. अब्बा दुपारच्या वेळेस चिंचेच्या झाडाखाली विश्रांती घ्यायचे. दुपारचे जेवण आम्ही शेतमजुरांबरोबर घेत असू. हिरव्या मिरचीचा ठेचा, ज्वारीची भाकरी आणि ताक असा मस्त बेत असायचा. अब्बा गावी आलेत हे कळल्यावर नातेवाईक भेटायला यायचे. या पाहुणचारात दोन महिने कसे जायचे, हेच समजत नव्हते.

अब्बा शिस्तीचे भोक्ते होते. अब्बा घरी आल्यानंतर शांतता असायची. वाचन करत बसावे लागायचे. कुणीही दुसऱ्यांशी वाईट बोलत नसे किंवा भांडतही नसे. माझे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्ही ग्वाल्हेरमध्ये राहावयास गेलो.

ग्वाल्हेरच्या "कमलराजा' महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्या काळात मोटरसायकली जास्त नसायच्या. अब्बा सायकलवरून महाविद्यालयात सोडायचे. आपली मुले उच्चशिक्षित होऊन स्वतःच्या पायावर उभी राहावीत याचा ध्यास अब्बांनी घेतला होता. त्यामुळेच मी एम.ए. झाले, तर भय्या बी.ई., एम.बी.ए. झाला. लग्नानंतर मी सोलापुरात आले आणि अब्बांच्या प्रोत्साहनाने बी.एड. केले.

अब्बा धार्मिक होते. पाच वेळची नमाज, कुरआन पठण असा नित्यक्रम असायचा. प्रत्येक नमजानंतर खूप वेळ एका जागी बसून दुआ मागायचे. एकदा नमाजानंतर घरी येताना अब्बांना वाटेतच चक्कर आली आणि ते रस्त्याच्या मध्यभागी बसले. त्या वेळेस दोन मुलांनी अब्बांना घरी आणून सोडले. 1973 मध्ये अब्बा हे आजी- आजोबांसमवेत पहिल्यांदा "नूरजहॉं' या जहाजाने हज यात्रेस गेले. दोन वेळा हज यात्रा व एकवेळा उमराह करण्याचे भाग्य अब्बांना लाभले. "साधी राहणी आणि उच्च विचारसरणी' आम्हाला त्यांच्या रूपात दिसली. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर स्वतःची वाटचाल केली. कधी कुणाला त्रास दिला नाही, कधी कुणाचे वाईटही चिंतले नाही. त्यांच्याकडून मिळालेली ही संस्काराची शिदोरी मला आयुष्यभर पुरणारी आहे. निवृत्तीनंतर अब्बा पुणेकर झाले. अब्बा निवृत्तीनंतरही सेवाकाळातील मित्रांशी पत्रव्यवहार करायचे. हिंदू मित्रांना दिवाळीच्या, तर ख्रिश्‍चन मित्रांना नाताळाच्या शुभेच्छा पत्रे पाठवायचे. ईदला मित्रांची शुभेच्छा पत्रे यायची.

प्रेरणा ही चेतना देणारी संजीवनी असते. अब्बांच्या प्रेरणेमुळेच मी सोलापूर विद्यापीठात पीएच.डी. करू लागले. प्रबंध पूर्ण झाला आहे. मला पीएच.डी.ही मिळेल. पण त्या आनंदात सहभागी व्हायला अब्बा नाहीत, याची मनात कायमची रुखरुख राहील. अब्बांच्या जाण्याने माझ्या जीवन प्रवासात दाट सावली देणारे झाडच कोलमडून पडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com