
- ही माझी दुसरी लांबची राईड.
ही माझी दुसरी लांबची राईड. माझी मधुर व धीरजशी चांगली मैत्री झाली होती, कारण आम्ही ताडोबाची राईड पूर्ण केली होती. १५ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ५.३० वा. मी रामदास लावंड, मधुर बोराटे, धीरज जाधव आणि अमेय दांडेकर पुणे ते बांधवगड राष्ट्रीय उद्यान बुलेट राईडसाठी निघालो. मधुर, धीरजने वायरलेस हेडफोनचे ब्लुटूथ कनेक्ट केले, धीरज लीड करणार आणि मधुर स्वीप करणार असे ठरले. सूर्योदयापूर्वी आम्ही नगरला पोहोचलो. आता औरंगाबादला थांबायचे असे ठरले. पुढील मार्ग कसा असेल त्याचा मधुरने गुगल मॅप पाहून घेतला.
सकाळपासून साधारण ३०० कि.मी. रनिंग झाले होते. टार्गेट नागपूर होते. म्हणजे अजून अंदाजे ५०० कि.मी. त्यानुसार बाईकचा स्पीड १०० ते ११० ठेवला तरच ते टार्गेट पूर्ण होणार होते. जिजामातांचे जन्मगाव सिंधखेडराजे सोडले. आता अमरावती, अमरावती मध्ये आम्ही पोहोचता पोहोचता आम्हाला संध्याकाळ झाली. अजून १४० कि.मी.चा नागपूरपर्यंतचा प्रवास करायचा होता, रस्ता नवीन व चार पदरी हायवे असल्यामुळे बाईक पळवायला मज्जा येत होती. नागपूर अजून अंदाजे २५ ते ३० कि.मी. असेल. रात्री उशिरा नागपूरमध्ये पोहोचलो. पहिल्या दिवशीचा प्रवास जवळपास ७८५ कि.मी. पूर्ण झाला होता. शरीर थकून गेले होते, कधी झोप लागली समजलंच नाही.
आज ४५० ते ५०० कि.मी.चा प्रवास करायचा होता. जबलपूरमार्गे जायचे ठरले. आम्हाला हायवे तसा नवीनच होता. आम्ही पेंच अभयारण्यातून जाणार होतो. दोन्ही बाजूने जंगल होते व रोडला खूपच छान निसर्गसौंदर्य होते. जबलपूरपासून सगळा सिंगल रोड होता. सिंगल रोडने आम्हाला संध्याकाळपर्यंत कडाक्याच्या थंडीमध्ये बांधवगडला पोहोचायचे होते. अंतर होते १२५ कि.मी.. अंतर जास्त नव्हते पण रोड सिंगल, सर्वत्र गडद घनदाट जंगल होते आणि पुढे घाट रस्ता होता. धीरज आणि मधुरने थांबून खूपच सुंदर फोटो काढले होते. आता आम्ही एकत्र एकामागे एक असे चाललो होतो, समोरून ट्रक, कार येत होत्या डोळ्यांवर खूप लाईटचा प्रकाश पडत होता. त्यामुळे डोळे दिपले जात होते.
अनेक ठिकाणी वळणे तर इतकी शार्प होती की समजतंच नव्हते. शहापूर उमरिया अशी गावे लागली. आम्ही उशिरा रात्री बांधवगडच्या गेटला पोहोचलो. तापमान होते ५ अंश डिग्री सेल्सिअस. आम्ही थंडीने थडथड उडत होतो. चौकशी केली असता आमचे रेस्टहाऊस जंगलात कुठेतरी ५ कि.मी. अंतरावर होते. कसे-बसे आम्ही रिसॉर्टवर पोहोचलो. बाईक्सवरचे सामान सोडले व रूममध्ये पोहोचवले. सफारी बुकिंग आणि कन्फर्मेशन लगेच केले. रूममध्ये पण खूप थंडी असल्यामुळे आम्ही सर्व्हिस बॉयला रूममध्ये रूम हिटर लावायला सांगितले. मी आणि मधुर हिटर जवळच बसलो. तोपर्यंत सर्व्हिस बॉय सांगायला आला की, जेवण तयार झाले आहे. त्याला विचारले की डाईनिंग हॉलमध्ये शेकोटीची सोय आहे का? थंडी खूप कडाक्याची आहे. त्याने हो म्हणताच आम्ही त्याला शेकोटी पेटवायला सांगितली आणि शेकोटीच्या बाजूला जेवण करू असे सांगितले. रूमपासून डाईनिंग हॉल थोडा लांब होता.
जाताना पण खूप थंडी वाजत होती. हॉलमध्ये शेकोटीच्या जवळच खुर्चीवर बसलो. शकोटीमुळे थंडी थोडी कमी झाली होती. जेवणाची टेस्ट मस्त होती. आम्ही पहाटे लवकर जाणार असल्यामुळे नाश्ता आणि कॉफी पार्सल तयार ठेवायला सांगितले. पहाटेचा अलार्म लावला आणि झोपी गेलो. तो अलार्म लगेचच वाजला, कारण झोपायलाच १२ वाजले होते. समजलंच नाही कधी पाच वाजले. तोपर्यंत जिप्सी गेटवर येऊन थांबली होती. धीरज आणि अमेयने कॅमेरे आणले होते. ते बरोबर घेतले. थंडी इतकी होती की, आम्ही टी-शर्ट त्याच्यावर स्वेड शर्ट आणि त्याच्या वर रायडींग जॅकेट असे घातले होते, तरीसुद्धा खूप थंडी वाजत होती.
जिप्सीमध्ये गेल्यानंतर प्रत्येकासाठी ब्लॅंकेट ठेवले होते. नाश्ता आणि कॉफीची एक बॅगसुद्धा ठेवली होती. ड्रायव्हर आमचीच वाट बघत होता. आम्ही गेल्यानंतर लगेच त्याने स्टार्टर मारून आम्हाला घेऊन निघाला. गाडी चालू झाल्यानंतर खूप थंडी आणि गार वारा लागत होता. ड्रायव्हरने आम्ही गेटवर पोहोचेपर्यंत गेट पास घेतला आणि आम्ही मेन गेटवर गेलो. तिथून गाईड घेऊन आम्ही जंगलामध्ये प्रवेश करणार होतो. जिप्सीची खूप मोठी लाईन होती. साधारण २० ते २५ जिप्सी असतील.
बरोबर ७.०० वा. गेट मधून जिप्सी जंगलात सोडायला सुरुवात झाली. सकाळी ७ ते ११ पर्यंत सफारीची वेळ होती. गेटमधून प्रवेश केल्यानंतर लगेच उजव्या बाजूला पाळलेला हत्ती आणि त्याचे पिल्लू होते. हे जंगल खास वाघासाठी प्रसिद्ध आहे. या जंगलात बिबट्यांचे प्रमाण पण खूप आहे. या जंगलामध्ये हरणांच्या वेग-वेगळ्या जाती प्रजाती पाहायला मिळतात. अशी माहिती गाईड आम्हाला देत होता. आम्ही थोडे पुढे गेल्यानंतर आम्हाला हरणाचा मोठा कळप चरताना दिसला. १००% जंगलापैकी फक्त २०% जंगल पर्यटकांना पाहण्यासाठी खुले आहे, बाकी ८०% जंगलात प्रवेश निषिद्ध आहे. जिप्सी ड्रायव्हर त्याच्या नेमून दिलेल्या रोडने जात होता.
गाईड आम्हाला सांगत होता की प्रत्येकाने सावधानपूर्वक लक्ष ठेवा कधीही कुठलाही प्राणी दिसू शकेल. त्याप्रमाणे आम्ही डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून होतो. आज आम्ही स्पॉट ‘‘टी’’ या वाघिणीच्या परिसरामध्ये फिरणार होतो. त्या वाघिणीच्या तोंडावर इंग्रजी अक्षर ‘‘T’’ अाकाराचा ठिपका आहे म्हणून तिचे नाव स्पॉट ‘‘T’’ ठेवले होते. सकाळी-सकाळी काही पक्षीसुद्धा दिसत होते, आमच्या बरोबर पक्ष्यांचा अभ्यास असलेला धीरज माहिती देत होता. चांडियार, कबुतर, घुबड, गिधाड, गरूड, पावशा, पोपट, टिटवी, खाटीक, मोर/ लांडोर, नीलकंठ असे पक्षी या जंगलात होते, आम्ही आपले हो-हो म्हणत होतो. गाईड आम्हाला एक पाण्याच्या तळ्याजवळ घेऊन गेला होता. त्या तळ्यातले पाणी इतके शांत होते की, आजूबाजूच्या डोंगराचे प्रतिबिंब हुबेहुब त्या पाण्यात दिसत होते, त्याचा खूपच सुंदर फोटो आम्ही घेतला होता. खूप फिरलो पण स्पोटी वाघीण काही दिसेना. शेवटी बाहेर पडण्याची वेळ झाली.
आमच्या अजून तीन सफारी व्हायच्या बाकी होत्या. गेटवर गाईडला सोडून ड्रायव्हर आम्हाला रिसॉर्टवर घेऊन गेला. दुपारची सफारी ३.०० वा. होती. दुपारी व्हेज आणि रात्री नॉनव्हेज अशी जेवणाची सुंदर व्यवस्था होती. या वेळेस भागोडीच्या परिसरात हा गाईड घेऊन जाणार होता. भागोडी वाघिणीचे नाव आहे. तिला तीन छावे आहेत. ते चार पाच महिन्यांचे असतील असे सांगण्यात आले होते. जाताना आम्हाला हरणांचा कळप दिसला. वानरं झाडाची पाने तोडत होती आणि त्या झाडाखाली हरणे चरत होती. बाजूला काही टेकड्या दिसत होत्या त्या टेकड्यांमध्ये गिधाडांची घरे होती, काही गिधाडे आकाशात उडताना पण दिसत होती. बाजुलाच बांधवगड दिसत होता. प्रभू श्रीरामाने लक्ष्मणाला वनवासात असताना या परिसरावर लक्ष ठेवायला सांगितले होते, तेव्हा लक्ष्मणाने या गडावरून लक्ष ठेवले होते. त्यामुळे या गडाला बांधवगड असे नाव पडले होते. एका रोडवर आम्हाला वाघाच्या पायाचे ठसे दिसले. आजूबाजूला बघितले पण जवळपास कुठे काही दिसले नाही.
आमच्या अगोदरच्या जिप्सीला वाघ रोड क्रॉस करताना दिसला होता. आम्हाला आतापण पायाच्या ठश्यांवरच समाधान मानावे लागले. आम्ही थोडे निराश झालो होतो, कारण दोन सफारी मध्ये आम्हाला वाघ दिसला नव्हता. तरी आम्ही आशा सोडली नव्हती. अजून दोन सफारी बाकी होत्या. आम्ही गाईडला सोडून रिसॉर्टवर गेलो. आम्ही जुनी गाणी ऐकत सर्वांच्या गप्पा चालू होत्या. आज बाहेरच शेकोटी बनवायला सांगितली होती. आम्ही पोहचेपर्यंत शेकोटी चांगली पेटली होती. मला माझी लहानपानाची आठवण आली, हिवाळ्यामध्ये आम्ही अशीच शेकोटी करून त्याच्या बाजूला बसायचो. जेवण उरकले आणि झोपायला गेलो. आजची आमची तिसरी सफारी होती. सकाळी ६.०० वा. जिप्सी येऊन थांबलीच होती. आजचा ड्रायव्हर थोडा वयस्कर आणि हटाकटा होता. पण त्याने जिप्सी काय जोरात चालवली मज्जाच आली. आम्ही गाईडला घेऊन गेट मधुन एन्ट्री केली. आज आम्हाला स्पोटीचे दर्शन होणार होते. स्पोटीच्या परिसराच्या दिशेने सगळ्याच जिप्सी चालल्या होत्या. आम्ही तळ्यवार चक्कर मारून पुढे गेलो.
थोडे अंतर गेल्यानंतर एक जिप्सी क्रॉस झाली. त्यांनी सांगितले की स्पोटी आताच रोड क्रॉस करून गेली आहे. आम्ही जर तळ्यावर गेलो नसतो तर कदाचित आम्हाला आज ती दिसली असती. आम्ही त्या दिशेनं जाऊन आलो ती रोडवर बसल्याच्या खुणा दिसल्या. आम्ही बराच वेळ थांबलो पण कसलीच हालचाल दिसली नाही. आम्ही कंटाळून कॅन्टीनला गेलो. कॅन्टीन मध्ये ड्रायव्हरसाठी चहा ऑर्डर केला. अचानक हातातला चहाचा कप फेकून ड्रायव्हर जिप्सीच्या दिशेनं पळतच सुटला आम्हाला समजेनाच तो असा काय करतो. तो आम्हाला तिकडूनच आवाज देत होता पटकन गाडीत बसून घ्या. गाडीला स्टार्टर मारून इतक्या स्पीडने त्याने गाडी वळवून जोरात पळवली की, असे वाटत होते रेसच्या गाडीत बसलो आहे.
एकामागून एक अशा सगळ्या जिप्सी त्या दिशेनं चालल्या होत्या. धुळ खूप उडत होती. पण आम्हाला पोहचायला थोडा उशीर झाला. आणि स्पोटी रोड क्रॉस करून झाडीत गेली. आम्हाला तिची थोडीशी हालचाल दिसली. पण पूर्ण दिसली नाही. ती जवळच होती पण आम्हाला दिसत नव्हती. आम्ही दुसऱ्या रोडवर जाऊन थांबलो होतो. ती तो रोड क्रॉस करून जाणार होती. सगळे तिची बाहेर येण्याची वाट बघत होते. आणि ती एका झाडाच्या मागून बाहेर येत होती. कॅमेराच्या शटरचे आवाज कट-कट सुरु झाले, जो तो कॅमेरामध्ये फोटो काढत होता. मी मोबाइलमध्ये तिचे व्हिडिओ शुटिंग केले. गाईड आणि ड्रायव्हर आपल्या गाडीतील लोकांना ती कशी दिसेल याची धडपड करत होते. जो तो आपली गाडी पुढे घेत होता. आणि स्पोटी आरामात चालली होती. म्हणजे तिला काही घेणे-देणे नाहीच की आपल्याला बघण्यासाठी लोक इतकी धडपड करताहेत. ती सरळ थोडे अंतर रोडने चालली आणि रोड क्रॉस करून जंगलात गेली. आमचा आनंद गगनात मावेनासा झाला. आमची राईड सफल झाली होती. आमच्या इतक्या लांबच्या राईडचे चीज झाले होते. सगळे खूप समाधानी होते, की स्पोटी दिसली.
सर्व जिप्सी गेटच्या दिशेने निघाल्या. दुपारी अजून एक सफारी होती. दुपारचे जेवण करून आम्ही आमच्या शेवटच्या सफारीला गेलो. आता दिसो आगर ना दिसो काही फरक पडणार नव्हता. जर वाघ दिसला तर तो बोनस ठरणार होता. माणसाचं समाधान होता होत नाही अपेक्षा वाढतच असतात. तसे आम्ही पण निघालो. आताचा मार्ग भागोडीचा होता त्या परिसरामध्ये माकडाचा कॉल्लिंगचा आवाज येत होता.
कॉलइंग म्हणजे जर वाघ दिसला तर हरण माकड एक विशिष्ट आवाज करतात आणि बाकीच्या प्राण्यांना सावध करतात. आम्ही बराच वेळ थांबलो पण तो काही बाहेर आला नाही. आम्ही पुढे पाण्याजवळ एक सांबर पाणी पिताना दिसले. ते बघून आम्ही गेटवर गेलो. गाईडला सोडून आम्ही रिसॉर्टवर पोहोचलो. अशा प्रकारे आमची मध्यप्रदेश मधील बांधवगड राष्ट्रीय उद्यान बुलेट राईड सफल झाली.