आमची रोल्स रॉईस (मुक्तपीठ)

वैजयंती पटवर्धन 
सोमवार, 1 एप्रिल 2019

कॉलेजच्या सायकल स्टॅंडमध्ये खूपच जुनी दिसायची आमची सायकल. पण, तिला बदलायचा विचार कधी मनात आला नाही. स्टॅंडमधून सायकल काढताना, ठेवताना मुलं कमेंट करायची. अरे ती बघ रिटा फरियाची रोल्स रॉईस. 

गोष्ट तशी जुनी. माझी मोठी बहीण मॅट्रिक होऊन फर्ग्युसन कॉलेजला आर्टसला गेली. तेव्हा आम्ही प्रभात रोडला राहात असू. तिला कॉलेजला जायला-यायला वडिलांनी नवी कोरी लेडीज सायकल घेतली. आम्ही अपूर्वाईने त्या सायकलला पाहत असू. पण, बहिणीच्या परवानगीशिवाय हात लावत नसू. आम्ही पाच बहिणी व धाकटा भाऊ अशी भावंडे होतो.

त्या काळी काही लागल्यास बहीण सायकलवर जाऊन घेऊन येत असे. तिच्यानंतरच्या आम्ही तिघी बहिणी डेक्कन जिमखाना भावे स्कूल (आताची विमलाबाई गरवारे हायस्कूल) मध्ये जायचो. आमच्यापैकी कुणालाही शाळेत जायला उशीर झाला, तर बहीण मागे बसवून सोडून यायची. पानशेतच्या पुरात पाणी, वीजपुरवठा बराच काळ बंद होता. तेव्हा कोपऱ्यावरच्या बंगल्यातल्या विहिरीवरून पाणी आणावं लागे. सायकलच्या हॅंडलला दोन बादल्या, मागे कळशी ठेवून सर्व वापरायचे पाणी आणत होतो. चार वर्षांनी बहीण बी.ए. झाली. त्यानंतर ती सायकल माझ्या दोन बहिणी रजनी आणि ललिता आलटून-पालटून वापरत. ललिता व तिच्या मैत्रिणी तशा टॉमबॉय होत्या. त्या दर रविवारी सायकल काढून कधी सिंहगड, कधी विठ्ठलवाडी अशा फिरून येत. माझा नंबर चौथा व धाकटी बहीण खूपच लहान होती. त्यामुळे आमच्या वाट्याला सायकल फारच कमी येत असे. पण, मी गाण्याच्या क्‍लासला, पी.टी.च्या तासाला न्यायची.

कॉलेजच्या सायकल स्टॅंडमध्ये खूपच जुनी दिसायची आमची सायकल. पण, तिला बदलायचा विचार कधी मनात आला नाही. स्टॅंडमधून सायकल काढताना, ठेवताना मुलं कमेंट करायची. अरे ती बघ रिटा फरियाची रोल्स रॉईस. रिटा फरिया ही भारतीय तरुणी 1966 मध्ये पहिली विश्‍वसुंदरी झाली तेव्हा लंडनमध्ये रोल्स रॉईस कंपनीने मोटर भेट दिली होती. 

पुढे योगायोगाची गोष्ट घडली. माझ्या भावाची मुलगी कल्याणी ही बी.ई. (मेकॅनिकल) झाली व नंतर स्वीडनमधून एम.एस. केले. मेरिटवर तिला लंडनस्थित कंपनीचा कॉल आला. ती कंपनी प्रख्यात रोल्स रॉईस होती. आता याला काय म्हणायचे. काव्यगत न्याय का योगायोग?

Web Title: Pune Edition Muktapeeth Article