घरपोच दंतवैद्यकी (मुक्तपीठ)

घरपोच दंतवैद्यकी (मुक्तपीठ)

गेले वर्षभर दातांच्या दुखण्याने हैराण झाले होते. अशा स्थितीत आम्ही कर्वे रस्त्यावरील ध्यान मंदिर मार्गावरच्या दंतवैद्यांच्या दवाखान्यात पोचलो. आम्हा दोघांच्या हातात काठी. येताना रिक्षा मिळाली, जातानाचे काय? पण काही चौकशी करण्याआधीच सांगण्यात आले, की आमचा माणूस रिक्षा आणून देईल.

तोंडाचा एक्‍स रे काढल्यावर काही दातांचे तुकडे कवळीच्या खाली राहिल्याचे निदान झाले. सगळी तपासणी एकाच वेळी. "अजून एकदाच हे तुकडे काढण्यासाठी मी तुम्हाला बोलावणार आहे, त्यानंतर आम्हीच तुमच्याकडे येऊ.' असे डॉ विजय फडके यांनी सांगितले. कागदावर तशा नोंदी केल्या गेल्या. स्वतः डॉक्‍टर येण्याची वेळ लाल पेनने, इतर सहकारी येण्याची वेळ हिरव्या पेनने नोंदवलेली. कामाला अंदाजे वेळ किती लागेल तेही लिहिलेले. त्या वेळा पाळल्या जात होत्या. म्हणजे, एकदा हिरड्यांमधील दंतकण काढल्यानंतर मी पुन्हा दवाखान्यात गेलेच नाही.

नेहमी वाटायचे, की डॉक्‍टरांच्या विशिष्ट खुर्चीशिवाय दाताचे काम होऊ शकत नाही. पण दाताची काही कामे रुग्णाच्या घरी जाऊनसुद्धा होऊ शकतात, हे मला येथेच समजले. डॉक्‍टर हे काम गेली चाळीस वर्षे करीत आहेत व त्याची सुरवात त्यांचे वडील डॉ. बळवंत गोपाळ फडके यांनी केली. दगडू हलवाई दत्त मंदिराजवळ जैन वस्ती आहे. तेथील जैन साधू व साध्वी त्यांच्याकडील कमंडलूशिवाय बाहेरचे पाणी पीत नसत. पण दाताच्या कामात तर वारंवार चूळ भरावी लागते. त्यावर थोरल्या डॉ. फडके यांनी ठरवले, की या जैन साधू-साध्वींसाठी आपणच त्यांच्या निवासस्थानी जायचे.

धाकट्या डॉ. फडके यांनी तोच विचार पुढे नेत ज्येष्ठ नागरिकांना घरपोच दंतवैद्यकी सेवा द्यायचे ठरवले. कोणतीही वेगळी फी न आकारता हे सर्व उपचार केले जातात. अत्यंत आपुलकीने व प्रेमळपणाने. तरुण होतकरू डॉक्‍टर हा नवसंस्कार डॉक्‍टरांकडे येऊन शिकतात. पुढच्या तरुण पिढीतही रुग्णहिताचा विचार रुजावा, त्या दिशेने अजून प्रयत्न व्हावेत, अशी डॉक्‍टरांची इच्छा व तळमळ असते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com