मुक्तपीठ : अनपेक्षित अपहरण

मुक्तपीठ : अनपेक्षित अपहरण

माझा मुलगा पराग दहावीच्या परीक्षेचा क्रमांक पाहायला शाळेत गेला होता. बराच वेळ झाला तरी तो घरी आला नाही. आम्हाला वाटले, मित्राकडे गेला असेल. मात्र खूपच उशीर होत गेला आणि आमची चिंता वाढली. त्याला शोधायला मी स्कूटरने निघालो. शाळा, वर्गमित्र, शेजार-पाजार, मित्रमंडळी सर्वांना विचारले, पण कुठूनच काहीच कळेना.

नातेवाईक, मित्रमंडळीं मदतीला धावली. पराग जिथे जाण्याची शक्‍यता होती, त्या सर्व ठिकाणी शोधून झाले. रात्रीचे आठ वाजले तरी मुलाचा काहीच पत्ता लागला नव्हता. असा एकाएकी कसा गायब झाला? मनात खूपच नकारात्मक विचार येऊ लागले. त्याला अपघात तर झाला नसेल? काही चुकींचे घडले नसेल ना? कोणत्या अवस्थेत असेल? रुग्णालयांत चौकशी केली, पोलिसांकडेही तक्रार नोंदवली.

रात्र वाढत चालली. कुठूनच काहीच समजत नव्हते. आसपास कुजबूज सुरू झाली. परीक्षा द्यायची नसेल म्हणून मुलगा पळूनच गेला असेल. आमच्यासाठी ती रात्र भयंकर होती. रात्रभर आम्ही दोघेही काळजीत होतो. परागची आई रात्रभर रडतच होती. हतबल होतो आम्ही. उद्याचा सूर्य काही शुभवार्ता सांगेल? 
अन्‌ सकाळी साडेसहाला फोन खणखणला. फोनवर माझ्या मुलाचाच आवाज ऐकू आला. ""बाबा, मी पनवेल बस स्टॅंडवरून बोलतोय. सुखरूप आहे, मला न्यायला या, आज पहिला पेपर आहे आणि मला तो लिहायचा आहे.'' अन्‌ आमच्या सर्वांच्या जिवात जीव आला. मी तातडीने पनवेलला राहणाऱ्या माझ्या मेव्हण्याला फोन केला. त्याने परागला बसस्टॅंडवरून ताब्यात घेतले. मी, माझे सासरे, आम्ही सर्व जणच शाळेच्या बाहेर परागची वाट पाहत होतो, त्या वेळी मला एक एक मिनिटदेखील तासासारखा भासत होता ...आणि अखेर पराग आला.

मळलेला, चुरगळेला पांढरा टी शर्ट, जीन्स आणि निरागस चेहरा. कुणी, का केले होते अपहरण? शाळेजवळूनच त्याचे अपहरण करण्यात आले होते. कदाचित चुकीच्या मुलाचे अपहरण झाल्याचे लक्षात आले असेल आणि त्याला पनवेलजवळ गाडीतून बाहेर टाकले असेल. त्याला मधल्या प्रवासातील काही नीट आठवत नव्हते.

मलाही माझा मुलगा सुखरूप परतला हेच खूप महत्त्वाचे वाटले. इतके सर्व घडूनही त्याने पेपर लिहिला आणि चांगल्या गुणांनी उतीर्णही झाला. आसपासच्यांच्या टोमण्यांना थेट उत्तर मिळाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com