सापडेना अल्टरवाला! 

कांचन आनंद बदामीकर
सोमवार, 21 जानेवारी 2019

आपण अल्टरला त्याच ठिकाणी पॅंटी दिल्या होत्या यावर त्या बाई ठाम होत्या आणि त्या अल्टरवाल्याला काही त्या सापडत नव्हत्या. 

कोथरूड बस स्थानकाजवळ अल्टर करणाऱ्यांची दुकाने. संध्याकाळची वेळ. कपडे अल्टर करून पंधरा मिनिटांत मिळणार असल्याने थांबले. एवढ्यात पूर्ण चेहरा स्कार्फने झाकलेली बाई वाद घालताना दिसली. ""अरे, क्‍या करते हो भैया... वहॉं ऊपर रखा होगा तुमने.. क्‍या तुम भी... ऐसा कैसा काम करता है. मैंने तुम्हारे पास चार पॅण्ट दी थी अल्टर करने को. ऐसी गुलबक्षी कलर की कॅरीबॅग थी. याद करो ना. शोधो ना किधर रखी थे.'' तिच्या समाधानासाठी टेलरने मागे ठेवलेले कपडे वीस-पंचवीस वेळा तरी खाली वर करून पाहिले; पण तिची गुलबक्षी रंगाची बॅग सापडेना.

शेवटी घाम पुसत तो पुन्हा त्याच्या जागेवर येऊन बसला. स्कार्फमधला चेहराही त्याला ओळखता येत नव्हता. बरे, त्या बाईला स्कार्फ काढायला सांगणे म्हणजे घोर पाप. त्यातून धंद्याची वेळ. तिच्यामागे बाकीची गिऱ्हाइके तिष्ठत राहिलेली. ती बाई तिच्या हिंदीत गड लढवत होती. टेलरला ती बाई, चार पॅंटी, तिची गुलबक्षी कॅरीबॅग काहीच आठवत नव्हते.

शेवटी न राहवून टेलरने विचारले, ""ताई, किती वाजता तुम्ही इथे पॅंटी आणून दिल्या?'' ""कल नहीं क्‍या, इसी टाइम को। अरे तुमको याद कैसे नहीं! गुलबक्षी कलर के बॅग में चार पॅण्ट रखा था.'' टेलर एक्‍दम निर्विकार. त्याने तिला थोडा वेळ बाजूला थांबायला सांगितले आणि तिच्या मागे उभ्या असलेल्या माणसाला खुणेने पुढे बोलावले. 

तेवढ्यात त्या बाईलाच काय वाटले कुणास ठाऊक. तिने आपल्या नवऱ्याला फोन लावला, ""अवो, तुम्ही तुमच्या पॅंटी कुणाकडे दिल्या?'' पलीकडून टेलरचे नाव सांगितले गेले असावे. इतका वेळ तावातावाने बोलणारी ती बाई गुपचूप दोन दुकाने सोडून पलीकडच्या दुकानात गेली आणि तिथून अल्टर पॅंटी घेऊन जणूकाही झालेच नाही, अशा आविर्भावात निघाली. त्याबरोबर तिथे एकच हास्यस्फोट झाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Muktapeeth Article on Alterwala

टॅग्स