देव तारी त्याला....

पुष्पा चितांबर
बुधवार, 7 डिसेंबर 2016

एकदा दोन प्रसंग ओढवले. जिवावरचे. पण दोन्हीतून सुखरूप राहिलो. केवळ धाक दाखवून मृत्यू माघारी गेला होता. मला म्हण आठवत राहिली, देव तारी त्याला कोण मारी?

एकदा दोन प्रसंग ओढवले. जिवावरचे. पण दोन्हीतून सुखरूप राहिलो. केवळ धाक दाखवून मृत्यू माघारी गेला होता. मला म्हण आठवत राहिली, देव तारी त्याला कोण मारी?

अधिक आषाढातील ही गोष्ट. बीड जिल्ह्यातील माजलगावजवळ पुरुषोत्तमपुरी नावाचे पवित्र ठिकाण आहे. तेथे फार पुरातन मंदिर आहे. दर अधिक महिन्यात तेथे दर्शनाचे फार महत्त्व असल्याने लांबूनलांबून लोक दर्शनासाठी येतात. आम्हीपण माझ्या मैत्रिणी, मुलगी, जावई, नात असे सात जण गाडी करून दर्शनास निघालो. जालनाजवळच्या गुंजचे दत्तात्रेयांचे मंदिर पाहून माजलगावला पोचलो. दुपारचे चार वाजले होते. दर्शन घेऊन नातेवाइकांकडे जेवण वगैरे होईपर्यंत निघायला आठ वाजले. रात्रीच नगर गाठायचे म्हणून पाथर्डीमार्गे जाण्याचे ठरले. रस्ता थोडा लांबचा, पण चांगला होता. शक्‍य तेवढ्या वेगाने गाडी चालवत निघालो. रात्र अंधारीच होती. बाकीचे गाडीत झोपून गेले.

गाडी वेगात होती आणि समोरून एक चाक अतिशय वेगाने आमच्या गाडीपुढून जाताना मला दिसले. मी ड्रायव्हरला म्हणाले, ""हे काय चाक पळतेंय का?'' ड्रायव्हरच्या ते लक्षात आले. त्याने कशी बशी गाडी थांबवली. मागच्या चाकाच्या मधील रॉड तुटल्यामुळे चाक गाडीपुढे वेगाने निघाले होते. आम्हाला कोणाला काहीही झाले नाही, पण त्या वेळी रात्रीचे अडीच वाजले होते. गाडी दुरुस्त होणे शक्‍यच नव्हते. इकडेतिकडे पाहिल्यावर काही अंतरावर वस्ती दिसली. आम्ही त्यांना हाक मारली. त्यांना वाटले, दरोडेखोरांची गाडी पंक्‍चर झाली; म्हणून ते पाच-सहा जण काठ्या घेऊन धावत आले. म्हणाले, ""आम्ही वस्तीवरचे सर्वजण रात्री अकरा ते पहाटे साडेचारपर्यंत जागेच असतो. चोर-दरोडेखोर याच रस्त्याने जातात. सकाळी गाडी मागवून तुम्ही जा. तोवर येथेच वस्तीला राहा.'' त्या लोकांनी आम्हाला त्यांच्या घराच्या ओट्यावर झोपायला जागा दिली. आम्हाला खूप बरे वाटले. त्यांनी आम्हाला पहाटे पाच वाजता चहा दिला. सकाळी दुसरी गाडी आली व मग आम्ही नगरला पोचलो. चाक निखळूनसुद्धा आम्हाला कोणालाच मार वगैरे लागला नाही, ही पुरुषोत्तम भगवानांचीच कृपा म्हणायची.

000
दुसरी गोष्ट 1977-78 मधली. आम्ही नगर येथे सातभाई गल्लीत दीक्षित वाड्यात राहात होतो. पूर्वीची घरे मातीतच बांधलेली असायची. खूप रुंद अशा भिंती. मातीच्याच विटात बांधकाम असे. पावसाळ्यापूर्वी घरावरील माळवद नीट करून घ्यायचे. ते पावसात गळणार नाही याची काळजी घ्यायची. भिंती मातीच्या असल्याने दर महिन्या-पंधरा दिवसाला छापणे, लिंपणे करावे लागे. जमीनही मातीची दर आठा दिवसा शेणाने सारवून घ्यावी लागत असे. आमचे घरमालक व आम्ही आणि इतरही भाडेकरू प्रेमाने व आपुलकीने राहात असू.

आमच्या ह्यांची बदली धुळे येथील कापडणे गावी झाली होती. दर मे महिन्यात मुलांना घेऊन महिनाभर तेथे राहात असू. त्यावर्षीही जूनमध्ये शाळा सुरू होणार म्हणून मुलांसह मी नगरला आले. घराला रंग देणे, छापणे, लिंपणे वगैरे करायचे होते. नेहमीच्या रंगाऱ्याला निरोप दिला. तो दुसऱ्या दिवशी रंगवण्यासाठी येतो असे सांगून गेला. त्या रात्री मला काही केल्या झोप येईना. माझे दीर त्यांची कंपनी सुटल्यावर साडेबारा वाजता घरी येत. पण तेही काही लवकर परतले नव्हते. मित्र भेटले म्हणून त्यांच्याबरोबर गल्लीच्या तोंडाशी गप्पा मारत बसले. का कोणास ठाऊक, पण मन अस्वस्थ होते. माझी मुलगी भिंतीपाशी झोपलेली होती. सासूबाई पलंगावर. मी व मुले तिथे जवळच झोपलो होतो. मनातून मला खूप भीती वाटत होती. तेवढ्यात भिंतीतून व त्याखालच्या जमिनीतून घरघर सू-सू असा आवाज येऊ लागला. मी घाबरले. अचानक येणाऱ्या त्या आवाजाने मला वाटले, भूकंप होणार. मी माझ्या मुलीला ज्योतीला उठविले. आजी जवळ पलंगावर झोपायला लावले. तीही झोपेतच पलंगावर झोपली. आणि काय आश्‍चर्य! तो आवाज मोठा होत गेला आणि आकाशात वीज चमकावी तशी वेडीवाकडी भेग सरसर भिंतीत पडली. भेग वाढत गेली आणि क्षणार्धात भिंत आतल्या बाजूस धाडकन कोसळली. सर्वजण प्रचंड दचकून उठले. मातीची ढेकळे सर्वत्र पसरले. माझ्या तर काळजाचा ठोकाच चुकला. मुले मला बिलगून मोठमोठ्याने रडू लागली. सासुबाईंनी धीर दिला. ज्योती त्याच भिंतीजवळ झोपली होती. ज्योती वाचली गं बाई, असे म्हणून सासूबाई रडू लागल्या. मला काहीच कळत नव्हते त्याक्षणी. खरेच देवाला काळजी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pushpa chitamber's muktapeeth article