शताब्दी डेक्कन इन्स्टिट्यूटची

राजाराम धुमकर
शुक्रवार, 1 जून 2018

एखाद्या संस्थेची शताब्दी हा मैलाचा दगड असतो. संस्थेच्या संस्थापकांनी घेतलेल्या मेहनतीमुळे ती उभी राहत असते.

पुण्यातील व्यापारी शिक्षण देणाऱ्या पहिल्या संस्थेचा डेक्कन इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्सचा 1 जून 2018 हा शताब्दिदिन. या वेळी प्रकर्षाने आठवण येते ती वडील दिवंगत शंकरराव धुपकर (ज्यांना आम्ही भाऊ म्हणायचो) आणि त्यांचे पट्टशिष्य दिवंगत वसंतराव रिसबूड यांची. त्यांचे संपूर्ण जीवन म्हणजे संस्था. संस्थेच्या प्रगतीत त्यांचा फार मोलाचा वाटा आहे.

एखाद्या संस्थेची शताब्दी हा मैलाचा दगड असतो. संस्थेच्या संस्थापकांनी घेतलेल्या मेहनतीमुळे ती उभी राहत असते.

पुण्यातील व्यापारी शिक्षण देणाऱ्या पहिल्या संस्थेचा डेक्कन इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्सचा 1 जून 2018 हा शताब्दिदिन. या वेळी प्रकर्षाने आठवण येते ती वडील दिवंगत शंकरराव धुपकर (ज्यांना आम्ही भाऊ म्हणायचो) आणि त्यांचे पट्टशिष्य दिवंगत वसंतराव रिसबूड यांची. त्यांचे संपूर्ण जीवन म्हणजे संस्था. संस्थेच्या प्रगतीत त्यांचा फार मोलाचा वाटा आहे.

भाऊंना मी पाहिले ते केवळ संस्थेलाच वाहून घेतलेले. 8 ते 10 वर्षे त्यांनी संस्था एकट्याने चालविली. त्यांचा पोशाख अगदी साधा. धोतर, शर्ट, कोट व काळी टोपी. म्हणजे खरोखर शिक्षकी पोशाख. त्यांचा खास विषय म्हणजे अकौंटन्सी. कुठल्याही वर्षी जेव्हा ते पहिल्यांदा अकौंटन्सी शिकवायला जात तेव्हा हे अकौंटन्सीचे प्रोफेसर? असा भाव अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर असायचा. पण पहिला तास संपेपर्यंत हेच आपले अकौंटन्सीचे योग्य शिक्षक असा बदल झालेला असायचा. ते फील्डहौस या लेखकाच्या पुस्तकाचा वापर करत. तास सुरू असताना पुस्तक टेबलावर फक्त असायचे. पण क्वचितच उघडले जायचे. ते एकपाठी होते. संपूर्ण पुस्तक त्यांना तोंडपाठ असायचे. शिकवायची पद्धतही शिक्षकी. शंभर जणांच्या वर्गात कोण विद्यार्थी चुकीची एंट्री करत आहे हे त्यांच्या लक्षात येत असे. मग त्याला उभा राहायला सांगून प्रश्‍न विचारायचे. सांग ही वस्तू आपल्याकडे आली का गेली? म्हणजे डेबिट का क्रेडिट? विद्यार्थ्याला चूक लक्षात येई आणि त्याची दुरुस्तीही होई. संपूर्ण वर्गावर एवढे बारीक लक्ष असे. शिक्षकी पद्धतीनेच त्यांचे शेकडो विद्यार्थी अकौंटन्सीमध्ये तयार झाले. सरकारी, खासगी आस्थापनात हिशेबाची कामे हाताळू लागले. काही चार्टर्ड अकौंटंट झाले. त्यांच्या डोळ्यात जरब होती. स्वभाव रागीट नव्हता, पण वर्गावर पूर्ण ताबा असे.

जेव्हा संस्थेची इमारत बांधण्याचे काम सुरू झाले तेव्हा संस्थेकडे बांधकामासाठी पुरेशी रक्कम नव्हती. त्या वेळी एका दानशूर गृहस्थाने संस्थेकडे काही रक्कम आपणहून ठेव म्हणून आणून दिली. त्यानंतर भाऊंनी आणि रिसबूड सरांनी ठेवी घेण्यास सुरवात केली. प्रत्येक ठेवीवर ठरलेल्या तारखेला व्याज दिले जाई. ठेवीदारांचा विश्‍वास होताच तो द्विगुणित झाला. संस्थेच्या इमारतीचे काम पूर्ण झाल्यावर भाऊंनी ठेवी परत करायला सुरवात केली. जसं जशी रक्कम जमा होई (फी मधून किंवा देणग्यांमधून) तसं तशी ठेवीदारांच्या ठेवी व्याजासह परत केल्या जाऊ लागल्या. प्रत्येक ठेवीदार ठेवी परत करायचे कारण विचारायचे. भाऊंचे त्यांना उत्तर असायचे की, "संस्था काही व्यापार करत नाही. संस्थेकडे ठेव परत करण्याइतकी रक्कम आहे. तर का परत करायची नाही?' ते म्हणायचे मला संस्थेमध्ये आणि बाहेरदेखील ताठ मानेने राहायचे आहे. कोणीही त्यांची रक्कम संस्था देणे लागते असे म्हणून नये. भाऊंनी आणि रिसबूड सरांनी सर्व ठेवी सव्याज परत केल्या आणि जेव्हा शेवटची ठेव परत दिली तेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. आता मी कर्जमुक्त झालो, असे ते आनंदाने म्हणाले.

12 जुलै 1961 रोजी पानशेत व खडकवासला येथील धरणे फुटून पुण्यात हाहाकार माजला होता. दुसऱ्या दिवशी खडकवासला येथील धरण फुटले अशी अफवा पसरली. सर्व पुणेकर उंचीवरच्या ठिकाणी जाण्यासाठी धावत होते. त्या दोन्ही दिवस भाऊंना संस्थेच्या कागदपत्रांची व इमारतीची काळजी म्हणून ते संस्थेकडे म्हणजे नदीच्या बाजूला धावले.

विद्यार्थ्यांना व्यापारी शिक्षण देता येईल तेवढे लवकर द्यावे म्हणून त्यांनी एक शाळादेखील काढली होती. पूना कमर्शियल स्कूल असे त्या शाळेचं नाव होते. आणि संस्थेचा कार्यभार सांभाळून ते त्या शाळेचे काम पहात. तिथे शिकवत असत. पुढे आर्थिक अडचणींमुळे ही शाळा बंद करावी लागली. सुरवातीला दोन वर्षे संस्थेत विद्यार्थी म्हणून आलेले भाऊ 1930 मध्ये शिकवू लागले ते 1977. तब्बल 49 वर्षे ते शैक्षणिक काम प्रत्यक्षपणे करत होते. रिसबूड सर देखील 1947 पासून सुमारे 55 वर्षे शिकवत होते. भाऊंनी संस्थेची आर्थिक घडी व्यवस्थित ठेवली. अकौंटन्सीचे शिक्षक असून देखील घरच्या रिसीट पेमेंटचे गणित बसवणे त्यांना अवघड जात होते, पण संस्थेचा बॅलन्स शीट मात्र कधीच ढळला नाही. संस्थेच्या शताब्दी प्रसंगी दोन्ही त्यागी व्यक्तींना विनम्र आदरांजली.

Web Title: rajaram dhumkar write article in muktapeeth