ओह नो.... नॉट अगेन!

ओह नो.... नॉट अगेन!

एखादे प्रदर्शन पाहायला विशेष मुलांना घेऊन जायचेच नाही का? त्यांना त्या प्रदर्शनाचा आनंद घेऊ द्यायचा नाही का? खरे तर या मुलांना "विशेष' वागणूक दिली जायला हवी, हे जाणवेल कधी?

पहाटेचे चार वाजलेत. नुकतीच आरोही थकून झोपली. खरे तर मलाही झोपेची नितांत गरज आहे, पण काही केल्या झोपच येत नाही. विचार काही स्वस्थ बसू देत नाहीत. पंधरा वर्षांपूर्वी ज्या कटू अनुभवांना गाठीशी घेऊन पुणे सोडले होते, त्याची पुनरावृत्तीच होत आहे असे वाटू लागले... संध्याकाळी सहा वाजता घरी आल्यावर खरे तर किती खुशीत होती आरोही. तिला तिचा लाडका मोर पाहायला मिळाला नाही; पण बाकी कितीतरी रंगीबेरंगी पक्षी तर पाहायला मिळाले. नावे उच्चारता आली नसली, तरी मोठा पोपट, लाल पोपट, निळा पोपट बघितला असे सांगायची. तिला आनंदी बघून आम्हाला पण छान वाटत होते; पण थोड्याच वेळात तिचे डोके दुखायला सुरवात झाली. थोड्या वेळाने उलट्या सुरू झाल्या. आत्ता कुठे थकून झोपली बिचारी.
विदेशी पक्ष्यांच्या प्रदर्शनाची बातमी कळली आणि आम्हा दोघांनाही प्राणी-पक्षी प्रेम असल्यामुळे प्रदर्शन पाहायचे ठरवले. सारसबागेपाशी गाडी थांबवली. प्रदर्शनाला प्रचंड गर्दी होती. आरोहीला नीटसे चालता येत नसल्याने तिथून गणेश कला क्रीडा संकुलापर्यंत रिक्षा केली. खरी परीक्षा आत जाताना ... सोबत भावाची दोन मुले होती. एकंदर परिस्थिती बघता किमान दोन तास तरी हॉलमध्ये जाण्यास लागतील असे वाटले. बाकी ठिकाणच्या अनुभवावरून मुलगी "विशेष मूल' आहे, तिचे तिकीट लागेल का? असे विचारले, तर "हो, घ्यावेच लागेल' म्हणाले. घेतले. (यात एक अनुभव नमूद करावासा वाटला.. विशाखापट्टणममध्ये आम्हाला या मुलीसाठी प्रत्येक ठिकाणी तिकीट लागणार नाही, असे सांगायचे. मेळा सुरू असेल तर चक्रामध्ये तिला बसवण्यासाठी आग्रह करायचे, ती एकटी बसू शकत नसेल तर तुम्ही बसा; पण तिला तो अनुभव द्या, असा त्यांचा आग्रह असायचा. तीच गोष्ट ओडिशामध्ये. इथे प्रश्न पैशाचा नाही, पण विशेष मुलांना आपल्यात सामावून घेण्याच्या वृत्तीचा आहे).
तिकीट तर काढले, प्रश्न तिला कुठेतरी बसवण्याचा. संबंधितांना विनंती करून तिला एक खुर्ची मागितली; पण तिच्याजवळ तुम्हाला थांबता येणार नाही, असे सांगण्यात आले. कसे तरी करून भावाच्या मुलांना थांबायला परवानगी मिळाली. आम्ही रांगेत, मधेच येऊन बघायचे की, ती कंटाळली तर नाही ना; पण लगेच तेथील स्वयंसेवक तिथून हाकलायचे. आरोहीला मधुमेह असल्याने चार वेळा इन्सुलिन द्यावे लागते. तीन तास रांगेत उभे राहिले तरी अजून किती काळ लागेल कळत नव्हते. रांगेतूनच भाचीला फोन करून तिला डब्यातला खाऊ भरवायची सूचना दिली. (हो, ती आपल्या हाताने खाऊ शकत नाही). "डबा संपला की सांग, मी इन्सुलिन द्यायला येते', असे सांगितले. समोर, स्वयंसेवक हे बघत होते; पण आत मात्र सोडायला तयार नव्हते. शेवटी कसे तरी तुम्हाला एकटीला तिला घेऊन जाऊ देतो, असे अगदी उपकार केल्यासारखे म्हणाले. त्याच वेळी एक शाळेतली मुलगी (साधारण तेरा-चौदा वर्षांची असेल), आई, वडील आणि भाऊ बरोबर. शाळेचे ओळखपत्र दाखवले तर त्यां सगळ्यांना मागच्या दाराने आत जाण्यास परवानगी लगेच दिली. तेव्हा मी थोडी हुज्जत घातली; पण परिणाम शून्य. अखेर साडेतीन तास वाट पाहिल्यावर आमचा नंबर लागला. प्रदर्शनाची व्यवस्था पाहता आरोहीला फिरवणे कठीण झाले आणि इतका वेळ थांबून ती कंटाळून गेली होती. बाकीच्यांचे पाहून होईपर्यंत एका कोपऱ्यात एका खुर्चीवर तिला बसवून मी उभी राहिले. बाकीच्यांचे प्रदर्शन बघून झाल्यावर बाहेर पडलो.

पहाटे- पहाटे तिला झोप लागल्यावर डोक्‍यात विचार सुरू झाले... किती बदलले आहे पुणे? काही वर्षांपूर्वी पुणे सोडले. आता रस्ते रुंद झालेत. उड्डाण पूल झाले. गर्दी वाढली. उंच टॉवर, टाऊनशिप, मॉल.. पण त्याबरोबर मानसिकता नाही बदलली! मी नेहमी व्हॉट्‌सऍप वर माझे स्टेटस.. 'Break Barriers, Open Doors : for an inclusive society and development for all persons of specially able' असे ठेवते. कधीतरी या विशेष मुलांना आपल्या विश्वात सामील करून घ्या. त्यांचे सगळे शारीरिक नियंत्रण कमी असते, कधी ती हायपर होतात, त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते. ती गर्दीमध्ये गोंधळून जातात; पण म्हणून त्यांना त्यांच्या आकलनशक्तीच्या समारंभात सामीलच करून घ्यायचे नाही का? विशेष मुलांना आनंद घेता येईल असे आपण त्यांच्याशी कधी वागणार? कंटाळली नसती तर आरोहीने अजून काही पक्ष्यांचा आनंद घेतला असता. तिला पक्षी ओळखता येतात, आवडतात म्हणूनच तर इतका त्रास होऊनसुद्धा आमचा प्रयत्न असतो की, तिला जे कळते, ते सगळे काही मिळावे. काय चुकते माझे यात.... आपल्या मुलांना असे आनंद मिळावेत, ही ऊर्मी स्वस्थ बसू देत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com