रहस्यमयी बॅग

रवींद्र भा. महाजन
मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018

प्रवासात आपल्या सामानाची आपणच काळजी घेतली पाहिजे, म्हणजे सुरक्षा यंत्रणांवर विनाकारण ताण येणार नाही.

प्रवासात आपल्या सामानाची आपणच काळजी घेतली पाहिजे, म्हणजे सुरक्षा यंत्रणांवर विनाकारण ताण येणार नाही.

मुलगा बिकानेरला असताना आम्ही दोघे व आम्हा दोघांच्या बहिणी त्याच्या पतींसह असे सहा जण राजस्थानला गेलो होतो. तीन आठवड्यांची सहल करून परतीला निघालो. परतीची गाडी बिकानेरवरून सकाळी नऊच्या सुमारास होती. आमचे सामान आता जवळ-जवळ तिप्पट झाले होते. गाडी फलाटाला लागल्यावर सर्व सामानासह गाडीमध्ये बसण्यासाठी थोडी घाई करणे गरजेचे वाटले. पण आमची जागा बोगीच्या डाव्या हाताच्या दरवाज्यापाशी होती, पण तो दरवाजा उघडत नसल्याने उजव्या दिशेच्या दरवाजाने सामान आत नेण्यास सुरवात केली. सर्वांनी साखळी करून एकमेकांच्या हातामध्ये सामान देऊन ते जागेवर नेले. बर्थ व सीट खाली लावले. डाग मोजून सर्व आल्याची खात्री केली. बिकानेर सोडून गाडी पुढे आली तसे आम्ही सहलीची छायाचित्रे बघू लागलो.

छायाचित्रे बघण्यात मग्न असताना तिकीट तपासनीस रेल्वे पोलिसांसह माझ्या पत्नीच्या नावाचा पुकारा करीत आमच्यापाशी आला. त्याच्या हातामध्ये हिचे ओळखपत्र व पोलिसांच्या हाती बॅग पाहिल्यावर काहीतरी गडबड आहे असे वाटले. हिला तिकीट तपासनीस विचारत होता की, "हे ओळखपत्र तुमचे का? ही बॅग तुमची आहे का?' सर्व प्रश्‍नांची उत्तरे अर्थातच होकारार्थी होती. त्याची खात्री झाल्यानंतर तो जरा रागावून म्हणाला, ""तुम्ही तुमचे सामान जाग्यावर आल्याची खात्री केली नाही? गेले अर्धा तास आम्ही या बॅगेचा संशय घेऊन चौकशी करत आहोत. आधी या पोलिसांनी पाहिले की, ही बॅग त्या पलीकडच्या दरवाजाजवळच्या सीटपाशी विनामालक आहे. त्यावर त्यांनी नजर ठेवली. पण कुणी ती नेली नाही म्हणून मला बोलावले. बॉम्बशोधक बोलवावे का या विचारत होतो. बॅग तपासली तेव्हा हे ओळखपत्र मिळाले. अन्‌ जर ते मिळाले नसते तर ही संशयित बॅग सरळ गाडीबाहेर फेकण्यात आली असती. तुम्ही सारे सुशिक्षित व सज्जन आहात, विचार करा, आजचे दिवस हे अतिरेक्‍यांचे आहेत. केव्हाही, कुठेही, कसाही, घातपात होऊ शकतो. आपणच सावधगिरी बाळगायला नको का?''
आम्ही सारे खजील झालो होतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ravindra mahajan write article in muktapeeth