पेंग्विनची कवायत

muktapeeth
muktapeeth

सूर्यास्तानंतर पेंग्विन दुडक्‍या चालीने किनारा चढून आले व परेडला सुरवात झाली.

ऑस्ट्रेलियाच्या सहलीत मला व माझ्या मैत्रिणींना सर्वांत जास्त आवडली ती पेंग्विन परेड. मेलबर्नपासून दोन तासांच्या रस्त्यावर फिलीप आयलंड आहे. बीचवर पोचला तेव्हा असे कळले, की पेंग्विन येण्याची वेळ पावणेसात अशी आहे. समुद्रकिनारी जायला रस्ता व त्याच्या दुतर्फा जवळ-जवळ सहा फूट उंचीचे जाळीदार लाकडी कुंपण बांधलेले आहे. चालत जाऊन सर्वजण पायऱ्यांवर आपापल्या जागा घेऊन शांत बसलो. नाहीतर पेंग्विन घाबरतात. दिवेदेखील मंद होते. सूर्यास्त झाला तसे किनाऱ्यावर असणारे; पेंग्विनना घाबरवणारे पक्षी कमी झाले, पण झिमझिम पाऊस सुरू झाला आणि थंडी आणखीच वाढली. उजव्या हाताला दूरवर दहा-बारा पेंग्विनची टोळी दिसली; पण ती घाबरून लगेच पाण्यात परतली. वाटले, आज पेंग्विनचा मूड नाही की काय?

नंतर डाव्या बाजूला समोरून वेगळा आठ-दहा पेंग्विनचा गट आला. त्यांच्यातलाच एक जरासा मोठा पेंग्विन चढ चढत पार आमच्या डाव्या हाताला दहा फुटांवर आला. हा त्यांचा म्होरक्‍या. त्याने मान इकडे-तिकडे फिरवून परिस्थितीचा अंदाज घेतला व मागच्यांना सर्व काही खुशाल असल्याचे कळवले. आता दोन्ही बाजूंनी पेंग्विनचे गट त्यांच्या दुडक्‍या चालीने वर चढू लागले व परेडला सुरवात झाली. एक ते दीड फुटाचे पेंग्विन पक्ष्यांचे कित्येक गट वर येतच राहिले. हे हुशार व गोंडस पक्षी ऐटीत चालताना मधेमधे थांबून आपल्याला काही धोका तर नाही ना हे पाहत होते. फारच मनमोहक दृश्‍य होते ते. त्यांची चाल बघून दहा-बारा महिन्यांच्या नुकतेच चालायला लागलेल्या लहान मुलाची आठवण येत होती. चढावरून वर आले की त्यांची घरे आहेत. तिथे ते रोज सूर्यास्तानंतर येतात व सूर्योदयापूर्वी परत समुद्रात जातात. कुंपणाच्या आत आम्ही प्रेक्षक व पलीकडे हे लुटुलुटू चालणारे पक्षी असे कितीतरी वेळ आम्ही आवाज न करता पाहतच राहिलो. पेंग्विन म्हणजे निरबुद्ध ठोंब्या हा माझा समज बदलून मी त्यांच्या अक्षरशः प्रेमात पडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com