आपली माणसं

रोहिणी नितीन होनप
शनिवार, 15 एप्रिल 2017

आयुष्यात माणसं भेटतात. परिचित नसलेली माणसं अगदी जिवाभावाची होऊन जातात. ही माणसं का भेटतात? कशी अचानक येतात आपल्या आयुष्यात? किती आपली होऊन जातात? हे आपल्या गतजन्मीचं पुण्य असावं.

अनेक चढ-उतार, खाचखळगे पार करत आयुष्य इथवर आलं. काय मिळालं या आयुष्याकडून मला? कितीतरी जवळची माणसं मिळाली. माझं गतजन्मीचं पुण्य होतं, की देवाने गुणी माणसांची मला भेट दिली.

आयुष्यात माणसं भेटतात. परिचित नसलेली माणसं अगदी जिवाभावाची होऊन जातात. ही माणसं का भेटतात? कशी अचानक येतात आपल्या आयुष्यात? किती आपली होऊन जातात? हे आपल्या गतजन्मीचं पुण्य असावं.

अनेक चढ-उतार, खाचखळगे पार करत आयुष्य इथवर आलं. काय मिळालं या आयुष्याकडून मला? कितीतरी जवळची माणसं मिळाली. माझं गतजन्मीचं पुण्य होतं, की देवाने गुणी माणसांची मला भेट दिली.

आज विशेष सांगायचं आहे ते माझ्या आयुष्यात खूप उशिरा आलेल्या दोन कुटुंबांबद्दल. या दोन कुटुंबांनी माझं आयुष्य बदलून टाकलं. मुलगी मीनल लग्न करून अमेरिकेला गेली. जयदीप लंडनमध्ये स्थायिक झाला. नवरा नितीन व्यवसायाच्या निमित्तानं उत्तराखंडमध्ये असतो. मग इथं मी राहिले एकटी! पण नाही, मी एकटी पडणं देवाला मान्य नव्हतं. मग त्याने माझ्यासाठी योजना केली, या दोन कुटुंबाची. ही आज माझी हक्काची घरं झाली आहेत.

आनंद माजगावकर सावंतवाडीजवळील माजगाव या खेड्यातून पुण्यात आलेला. चष्म्याच्या व्यवसायात स्वतःचं स्थान निर्माण करणारा. एस.टी.मधील नोकरी सोडून आनंद पुण्यात आला तेव्हा विलासची, धाकट्या भावाची नोकरी हाच एक आधार होता. टक्केटोणपे खात, पण प्रत्येक वेळेला जिद्दीनं उभं राहून त्याने व्यवसाय नावारूपाला आणला. त्याला भक्कम; पण अबोल साथ देणारी सुवर्णा ही एक वेगळंच रसायन आहे. आनंदच्या भाषेत सांगायचं तर "कानाची ताकद जबरदस्त असलेली'. समोरच्याचे शंभर शब्द तर हिचा एक. कधीतरी जरा उदार झाली तर दुसरा शब्द. पण, आज दहा जणांचं कुटुंब एकत्र आहे, ते यांच्यामुळेच. "आम्ही भाऊ कधीही विभक्त होणार नाही,' अशी ठाम भूमिका घेणारा आणि ती निभावणारा असा हा आनंद. विलक्षण मनस्वी अन्‌ "राजा' माणूस!

आनंदचा मोठेपणा व्यवहारी जगात सहसा न आढळणारा आहे. गरीब परिस्थितीतील मित्राची मुलगी त्याने शिक्षणासाठी पुण्यात स्वतःकडे आणली आणि तिच्या सर्व हौशी पोटची मुलगी असल्यासारख्या पुरवल्या. बरे-वाईट धक्केही न बोलता पचवले. विजय फळणीकरांच्या "आपलं घर' या अनाथाश्रमाचा आनंद हा एक भक्कम आधारस्तंभ आहे. लहान वयातला आनंदचा हुडपणा सहन न झाल्यानं एका काकांनी आनंदला रिमांड होममध्ये टाकलं. आपला असा काय गुन्हा झाला, हेही न कळण्याच्या वयातला आनंद रिमांड होमच्या मुलांना गार पाण्यानं अंघोळ करावी लागते हे बघून कळवळला. आज परिस्थितीने साथ दिली आणि त्या रिमांड होमसाठी आनंदने स्वखर्चाने सौरऊर्जा सिस्टीम बसवून दिली. असा हा जगावेगळा सहृदय माणूस! आनंदच्या प्रत्येक गोष्टीत त्याला शांतपणे साथ देणारा भाऊ विलास ही त्याची शक्ती आहे. या कुटुंबाने मावशीचं नातं जोडून मला त्यांच्या घरातलीच बनवलं. माझ्या प्रत्येक अडचणीत पाठीशी उभे राहणारे आनंद-सुवर्णा, विलास-राजश्री यांची कशी उतराई होऊ?

दुसरं कुटुंब आहे संजय आणि मंजू केसकर यांचं. मी त्यांच्याशी जोडली गेले ते आनंदमुळे. संजयची मैत्रीण म्हणून त्यांच्या घरात गेले; पण मंजूची मोठी बहीण झाले. किती प्रेम करावं यांनी माझ्यावर! "तू घरचीच आहेस' हे संजयचे शब्द किती मोलाचे आहेत हे फक्त मीच जाणते. संजय म्हणजे अत्यंत हौशी, आनंदी, पॉझिटिव्ह आणि जिंदादिल व्यक्तिमत्त्व. कुणाशीही वाकडेपणा नसलेला, अगदी ज्यांच्याविरुद्ध न्यायालयात केस चालू होती, त्यांनाही मधल्या वेळात चहा- नाष्टा देणारा. संजय उत्तम बासरीवादक आहे. गाणं, खाणं, बोलणं हा आमच्या मैत्रीचा स्थायीभाव आहे.
आमच्या ओळखीनंतर आलेला माझा पहिलाच वाढदिवस संजयने त्याच्या घरी अत्यंत थाटात साजरा केला आणि अशा हौशी कुटुंबाशी मैत्री झाल्याबद्दल मी देवाचे अक्षरशः आभार मानले.

संजय अतिशय कुटुंबवत्सल आणि तितकाच रसिक माणूस. संगीत विषयात सखोल अभ्यास आणि जाण असलेला. आम्ही अनेक रात्री संजयच्या जुन्या घरात जुनी हिंदी गाणी, रागदारी, गझला ऐकत घालवल्या. मंजूची संजयच्या प्रत्येक गोष्टीत संपूर्ण साथ असते. तिच्याशिवाय कुठलाही कार्यक्रम होऊच शकत नाही.

संजयचं वैशिष्ट्य म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत, गरिबापासून श्रीमंतापर्यंत कोणाशीही त्याचे सूर चटकन जुळतात. बजाजमध्ये नोकरी करता करता संजय व्यवसाय करू लागला; पण त्याचा व्यवसाय "कोट्यधीश' केला मंजूने! अत्यंत अगत्यशील, उत्तम स्वयंपाक करणारी आदर्श सून, आदर्श मुलगी, आदर्श पत्नी आणि इतर सगळीच नाती यशस्वीपणे निभावणारी, सर्वांना प्रेमाच्या धाग्यात बांधून ठेवणारी साधी, निगर्वी मंजू! संजयइतकाच किंबहुना त्याच्यापेक्षा अधिक क्षमतेनं व्यवसाय करून आणि वाढवत नेऊन त्याचा वटवृक्ष केला मंजूने! माझ्यासाठी संजय म्हणजे "त्वमेव बंधुश्‍च सखा त्वमेव'. परिस्थितीचं किंवा समस्येचं चटकन आकलन होणं आणि त्यातून कोणालाही न दुखावता सन्माननीय मार्ग काढणं हे फक्त त्यालाच जमू शकतं.
या दोन कुटुंबांमुळे माझं आयुष्य आणि भावविश्‍व समृद्ध झालं.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rohini honap write article in muktapeeth