अमिताभ स्टाईल रे!

सागर बोत्रे
गुरुवार, 17 जानेवारी 2019

सर "ऑडिटर' होते. कागदावरचे हिशेबच नव्हे, तर समोरचा माणूसही एका नजरेत जोखायचे.

सर "ऑडिटर' होते. कागदावरचे हिशेबच नव्हे, तर समोरचा माणूसही एका नजरेत जोखायचे.

आमचे कार्यालय सदाशिव पेठेत असले तरी इस्त्री केल्यासारखे नसायचे. मोकळेपणी हसायला परवानगी होती. खरे तर आमचे सर म्हणजे एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व. चेहरा कायम हसरा. बोलणे मधाळ. एखाद्याशी बोलता बोलता त्यांनी त्याची घेतलेली फिरकी समोरच्याला समजायची ती आसपास एकदम हास्यस्फोट झाल्यावरच. एके दिवशी दुपारी सगळेच कामात गर्क होतो. कामाच्या ताणाने कार्यालयातील वातावरण तसे गंभीरच होते. तोच अचानक अंदाजे अठरा-एकोणीस वर्षांचा एक अंगाने किडकिडीत असणारा मुलगा कार्यालयामध्ये आला. आधीच त्याचा रंग काळा. त्यात तो भर उन्हात पायपीट करून आला असल्याने चेहरा घामाने डबडबलेला. कपडे ढगळ. काहीसे जीर्ण झालेले. पायात स्लीपर. हातात काही कागदपत्रे असणारी प्लॅस्टिकची मळकट पिशवी असा त्याचा अवतार होता. त्याचा तो अवतार कोणाला रुचावा असा नव्हताच. तो दाराशी किंचित घुटमळला. आत प्रवेश करावा की नको, कोणाला विचारावे, असा प्रश्‍न त्याच्या चेहऱ्यावर झळकला. थोडासा गोंधळलेलाच दिसला तो.
तो दारात दिसताच सरांनी त्याला हाक मारून आत बोलावून घेतले. आपल्यासमोर बसायला सांगितले. पाणी दिले. तो थोडा शांतवल्यावर विचारले, ""काय काम आहे?'' सरांचा प्रश्‍न पूर्ण व्हायच्या आधीच तो मुलगा म्हणाला, ""मला नोकरीची गरज आहे. मला सीए व्हायचे आहे आणि मी सीए होणारच.'' त्याचे ते एका दमात सांगून झाले आणि दुसऱ्याच क्षणी सर म्हणाले, ""उद्यापासून ये.'' आता समोरचा मुलगा आणखी बावरला. म्हणाला, ""मी आठवडाभर सदाशिव पेठेतली पन्नास-एक सीएंची कार्यालये पालथी घातली. पण नोकरी तर दूरच, माझा अवतार बघून माझ्याशी बोलण्याचीही कुणी तसदी घेतली नाही. तुम्ही तर नोकरी देताय. ना माझ्याकडची प्रमाणपत्रे पाहिली, की ना माझी मुलाखत घेतली. सर, चेष्टा तर नाही ना?'' मुलगा रडवेला झाला होता. सरांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले आणि मिश्‍किलपणे म्हणाले, ""तू अगदी अमिताभ बच्चन स्टाइलने डॉयलॉग फेकलास ना, म्हणून घेतोय.'' मुलाच्या चेहऱ्यावर क्षणार्धात हसू उमटले. हसण्याचे असे अनेक प्रसंग अजून आठवतात, फक्त हसवणारे मिलिंद संगोराम सर आमच्यात नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sagar botre write article in muktapeeth