शेवटच्या घरातील मुलगा

समाधान जाधव
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

तो मुलगा घरासाठी उन्हातान्हात हिंडत प्लॅस्टिकच्या पिशव्या गोळा करीत होता. त्याची शिक्षणाची ओढ लक्षात आली आणि तो आता शाळेत जाऊ लागला. मी केवळ थोडा वेळ दिला अन्‌ थोडासा हातभार.

तो मुलगा घरासाठी उन्हातान्हात हिंडत प्लॅस्टिकच्या पिशव्या गोळा करीत होता. त्याची शिक्षणाची ओढ लक्षात आली आणि तो आता शाळेत जाऊ लागला. मी केवळ थोडा वेळ दिला अन्‌ थोडासा हातभार.

दुपारची वेळ. बसची वाट बघत होतो. एक मुलगा दिसला. आठ-दहा वर्षांचा. कपडे थोडे मळलेले. खांद्यावर मोठी थैली. तो उन्हात प्लॅस्टिक पिशव्या गोळा करत होता. बाजूला शाळा होती. मुले शाळेकडे जात होती. तो अचानक थांबला आणि शाळेत जाणाऱ्या मुलांकडे काहीशा उदासपणे बघायला लागला. मी त्याला आवाज दिला. त्याने दुर्लक्ष केले. मी त्याच्यापाशी गेलो. त्याला नाव विचारले. ""राजेश.'' ""तू शाळेत नाही जात?'' ""नाही, माझा बाप शाळा बोलल्यावर मारतो!'' ""पण का?'' ""जर मी शाळेत गेलो, तर आईसाठी व आजीसाठी स्वयंपाकासाठी पैसे लागतात, आजी नेहमी आजारी असते, बाप नेहमी दारू पीत असतो, मग त्याचे काय होणार?''
कुटुंबातील कर्ता माणूस असावा, तसा तो बोलत होता. मी विचारले, ""तुला शाळेत जायला आवडेल?'' त्याने हळूच होकारार्थी मान हलवली. मी त्याला सांगितले, ""मी भेटेन तुझ्या वडिलांना आणि तुला शाळेत पाठवण्याचा आग्रह करीन.'' संध्याकाळी भेटण्याचे आश्‍वासन देऊन त्याचा निरोप घेतला. आमच्या गावाच्या बाजूला एक वस्ती होती, तिथे तो राहायचा. मी संध्याकाळी त्या वस्तीत पोचलो. तिथली मोजकीच मुले शिक्षण घेत होती. वस्तीत काही लहान मुले खेळत होती. काही तरुण टपरीवर गप्पा मारत होते. मी त्यांच्यापाशी गेलो आणि राजूच्या घराबद्दल चौकशी केली, त्यांनी मला मागच्या गल्लीत शेवटचे घर म्हणून सांगितले.

मी राजेशच्या घराजवळ पोचलो. एक झोपडी होती. घरात चुलीचा धूर स्पष्ट दिसत होता. घरही मातीचे होते. बाहेर कुणीतरी खाटेवर बसलेले दिसले. कदाचित. राजेशची आजी असेल. मी आजीला आवाज दिला, ""राजेश आहे का?'' ""का, त्याने काही केलेय का?'' ""नाही आजी. मला राजेशच्या वडिलांशी बोलायचे होते त्याच्या शाळेबद्दल.'' ""येना, भाऊ बस्स! दीदी पाणी आण गं.'' एक लहानशी चिमुकली होती. कदाचित राजेशची छोटी बहीण असेल. ती पण अशीच शिक्षणापासून दूर असेल, असे मला जाणवत होते. तिने मला पाणी दिले. लगेच आजीने तिला राजेशच्या वडिलांना बोलावण्यासाठी पाठवले. तेवढ्यात राजेशचे वडीलच तेथे आले. त्यांनी कर्कश आवाजात मला नमस्कार केला. मला जाणवत होते, की ते नशेत आहेत. तरी मी थेट विषयावर आलो. ""राजेशला तुम्ही शाळेत पाठवू शकता का?'' ""अहो, काय करणार? आपली परिस्थिती वाईट आहे. शाळा आपल्याला नाही परवडणार. तो शिकून बिकून काय करणार? आपण गरीब आहोत ना!''
""दादा, तुम्हाला नाही वाटत तुमच्या मुलाने मोठे व्हावे. चांगला माणूस म्हणून जगावे, शिक्षण घेऊन समजदार व्हावे?''
""पण कसे होणार ते?''
""असे कितीतरी लोक आहेत, की गरिबीतून शिक्षण घेऊन वर आलेत. बाबासाहेब आंबेडकर पण गरीबच होते ना! आज किती मोठे नाव झालेय, ते फक्त शिक्षणाने. नका हो, तुमच्या मुलाचे आयुष्य बरबाद करू. त्याची इच्छा आहे तर त्याला शिकू द्या. नका दूर ठेवू शाळेपासून त्याला आणि तुम्हीही जबाबदारीने वागा.'' एक बाप म्हणून राजेशचे वडील हे सगळे मुकाट्याने ऐकत होते. मला हे जाणवत होते, की मी सांगितलेले त्यांना सगळे कळत होते. राजेश व राजेशची बहीण हे सगळे ऐकत होते.
राजेशचे वडील थोडावेळ विचार करून बोलू लागले. ""साहेब, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. मी तयार आहे, माझ्या मुलाला मी मोठा माणूस बनवणार. मीही त्याला शाळेत पाठवणार.'' हे ऐकल्यावर राजेशच्या चेहऱ्यावर त्याच्या मनातील हसू उमटलेले दिसले.
""हे बघ राजेश, आता तर वडिलांनी पण होकार दिलाय. आता तू घराचे "टेंशन' घ्यायचे नाही. आता तुझे वडील सगळे बघतील. आता तू मला उद्या गावात भेटशील, तेव्हा आपण शिक्षकांना भेटू. मग आपण वही, पुस्तक, पेन, शाळेचा गणवेश घेऊ. ठीक आहे. पण दररोज शाळेत जायचे बरे का...!'' त्यानेही होकारार्थी मान हलवली आणि मी निरोप घेतला.

दुसऱ्या दिवशी राजेश गावात आला. आम्ही शिक्षकांना भेटलो. शिक्षकांनीही प्रवेश द्यायला होकार दिला. नंतर त्याला वही, पेन, दप्तर व गणवेश घेऊन दिला. आता तो न चुकता शाळेत जातो. माझा थोडा खर्च झाला आणि वेळही गेला. त्यापेक्षा आपण कुणा एकाच्या आयुष्यात प्रकाश आणला याचे मला खूप समाधान वाटते.

Web Title: samadhan jadhav write article in muktapeeth