बुलबुलांची किलबिल

संदीप खर्डेकर
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

बुलबुलांची जोडी घरात आली आणि घरातलीच झाली. दरसाल नेमानं यायची. घरटं दुरुस्त करायची. पिलं उडून गेल्यावर काही काळ त्या रिकाम्या घरट्यात उदासी असायची. मग पुन्हा नव्यानं किलबिल.

बुलबुलांची जोडी घरात आली आणि घरातलीच झाली. दरसाल नेमानं यायची. घरटं दुरुस्त करायची. पिलं उडून गेल्यावर काही काळ त्या रिकाम्या घरट्यात उदासी असायची. मग पुन्हा नव्यानं किलबिल.

साधारण चार-पाच वर्षांपूर्वी आमच्या घरी बुलबूलच्या जोडप्याचं पहिल्यांदा आगमन झालं. त्याआधी कबुतरं आणि कावळ्यांनी उच्छाद मांडला होता. कबुतरांचा त्रास टाळण्यासाठी खिडक्‍यांना जाळी लावणं, गॅलरीचे दरवाजे बंद ठेवणं यांसारखे उपाय योजावे लागले. याच काळात कधीतरी बुलबूलच्या जोडप्यानं आमच्या घरात प्रवेश केला. जोडी यायची. नुसतीच किलबिल करायची. इथंतिथं नाचायची आणि चाहूल लागताच उडून जायची. हळूहळू त्या जोडीची भीती चेपली असावी. आम्ही आसपास असतानाही ती जोडी निवांत असायची. मग कधीतरी या जोडीनं आपलं घरटं बांधायला घरातील झुंबरांची निवड केली आणि दिवाणखान्यातील दोन्ही झुंबरांमध्ये काडी काडी जमवून त्यांनी त्यांच्या "फ्लॅट'चं स्वप्न साकारलं. घरटं "सिंगल रूम' तरी प्रशस्त दिसत होतं. किमान ती जोडी आरामात राहू शकेल असं. मग एक दिवस त्यात मादीनं अंडी घातली आणि मग "घर दोघांचं असतं' या न्यायानं दोघं आळीपाळीनं अंडी उबवायला बसायचे. त्यांनी वेळाही ठरवून घेतल्या होत्या बहुधा. भुकेच्या वेळेनुसार व शिकारीच्या सोयीनुसार.

आमच्या कुटुंबात तसंही सगळे निसर्गवेडे. मग काय, या जोडीचा घरात मुक्त संचार आणि आमच्याकडून लाड करवून घेणंही! झुंबरातील दिवे बंद. पंखा बंद. त्यांच्या जाण्या- येण्याच्या वाटेत कपडे वाळत घालायचे नाहीत. अशी अनेक बंधनं आमच्यावर आपसूक आली. काही दिवसांनी झुंबरातून चिवचिव ऐकू येऊ लागली. दोन पिलं होती. एक पिलू दोन दिवसांतच गेलं. त्याच्या आईनं त्याला चोचीनं खाली ढकललं आणि मग त्यांची वाचलेलं पिलू जगवायची लढाई सुरू झाली. त्याच्यासाठी रोज नवनवीन पदार्थ. सुरवातीला कधी किडे, कधी अळी आणि मग फळं, भाज्या असा व्हेज- नॉनव्हेजचा संतुलित आहार पिलाला दिला जायचा. यातही दोघांचा सहभाग असे. कधी नर, कधी मादी पिलाला भरवायचे. या काळात दोघंही थोडं आक्रमक झालेले दिसून आलं. आमच्या भोवती चिवचिवाट करत फेऱ्या मारायचे, चोच मारायचा प्रयत्न करायचे. मग बहुधा दोन दिवसांत त्यांच्या लक्षात आलं, की आमच्यापासून पिलाला धोका नाही. मग शांत झाले. त्यांची भीड चेपली. माझ्या ताटातलं अन्न चिवडायला लागले. पिलू मोठं झालं. घरातल्या घरात उडायला लागलं. त्याचे आई-बाबा त्याला उडायला शिकवत होते. त्याच्याभोवती फेर धरत होते; आणि मग एक दिवस ते दोघे "कामा'वर गेले असताना आणि आमचंही लक्ष नसताना पिलू उडून गॅलरीत गेलं. टपून बसलेल्या क्रूर कावळ्यानं डाव साधला. आमच्या समोरच्या सज्जावर त्यानं या पिलावर ताव मारला. घरावर शोककळा पसरली. पिलाचे आई-बाबा तासा-दोन तासानं परतले. घरभर बाळाला शोधलं. त्यांचं आक्रंदन हेलावणारं होतं.

आता आमच्या घरीच या जोडप्यानं मुक्काम ठेवला. घरट्याची डागडुजी करून त्यात दरसाल पिलांना जन्म देत राहिली. काही जगायची आणि थोडी मोठी झाली की उडून जायची. काही कावळे फस्त करायचे. या वेळी मात्र ठरवलं की पिलांना जगवायचंच. काल दोन पिलं मोठी झाली. दिवसभर पाऊस होता, त्यामुळे बाहेर पडली नाहीत. कावळेही फिरकले नाहीत. पण, काल दुपारपासूनच पिलांचे आई-बाबा गायब झाले होते. दर तास- दोन तासानं फिरकणारी ही जोडी आज कुठं गेली असेल? पावसात त्यांचं काही बरं- वाईट तर झालं नसेल? रात्र झाली तरी परतले नाहीत. पिलांना भूक लागली असेल. पिलंही घरभर उडत होतीच... सैरभैर. रात्रभर गायब असलेलं जोडपं भल्या पहाटेच परतलं. पिलांना भरवायला लागलं. भरवतानाही एक अळी किंवा किडा दोन्ही पिलांना अर्धा अर्धा. किती ही माया! निसर्गानं केवढी समज दिलीय या पाखरांना. राजकारणाच्या धबडग्यात माझ्यातील संवेदनशीलता या बुलबूल कुटुंबानं जपली- जोपासली. आज पिलांनी आकार घेतला. घरभर स्वैर संचार करताना हे चौकोनी कुटुंब आज खूपच आनंदी आहे. पिलं स्वतःचं रक्षण करायला समर्थ झालीत. जगातील क्रूर कावळ्यांना तोंड द्यायला सज्ज आहेत. उंच आकाशात झेपावत, नवं क्षितिज गाठायला तयार आहेत.
पाहता पाहता हे कुटुंब उडून गेलं.

आम्ही पुन्हा प्रतीक्षेत बुलबूलच्या परतण्याच्या, आमच्याच विस्तारित कुटुंबाच्या घरट्यातील किलबिलीच्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sandeep khardekar's article in muktapeeth