राजू शेट्टींच्या शिलेदाराचा अनुभव सोशल मिडियात चांगलाच गाजतोय

grape
grape

भाजीपाला घ्यायला बाजारात गेलो होतो. एक शेतकरी द्राक्षच्या जाळ्या घेऊन बाजारात द्राक्ष विकायला उभा होता.
""काका कशी दिली द्राक्ष.?''
""25 रुपये किलु लावली. घ्या. गोड हाय खूप. जास्त दिसाचा माल झाल्यामुळे जास्त साखर उतरलीय त्यात. एकदम गोड हाय दराख. खोट वाटत असेल तर एखादा मणी तोंडात टाकून पहा.''
द्राक्ष खरच खूप गोड होती.


""काका करा तीन किलो. आठ दिवस पुरतील अशी.''
द्राक्ष घेऊन मी पिशवीत टाकली. मला एक गोस्ट जाणवली. बाजारात गर्दीच्या ठिकाणी उभ्या असलेल्या त्या काकांनी तोंडाला काहीही बांधलेलं नव्हतं. मी त्यांना माझ्या खिशात एक्‍स्ट्रा असलेलं एक मास्क काढल आणि त्यांच्या हातात देऊन ते तोंडाला लावायला सांगितल. खर तर ते घ्यायलाच तयार नव्हते. मी बळजबरीने ते त्यांच्या हातात दिलेलं होत. हो नाही करता-करता काकांनी माझ्या तोंडाकडे बघत हसत हसत दोन्ही दोऱ्या कानाच्या मागे अडकवल्या.


""हायला... मी तर आता डाक्‍टर सारखा दिसायला लागलो असन.'' काका उद्गारले.
बहुदा ह्या सगळा प्रकार त्यांच्यासाठी नवीन असावा. म्हणून त्या गोष्टीचं त्यांना अप्रूप वाटत असाव. पैसे देऊन मी थोडा पुढे गेलो. त्या काकांनी परत आवाज दिला.
""ये दादा थोडा माघारी ये.''
मी परत त्यांच्या जवळ गेलो. त्यांनी एक मोठा द्राक्षचा घड जाळीतून उचलला आणि माझ्या पिशवीत टाकला.
मला ते थोड ऑड वाटलं. म्हंटल काका, ""तुमच्याकडून कसली अपेक्षा म्हणून मी तुम्हाला मास्क दिल नव्हतं. इतक्‍या गर्दीत तुम्ही दिवसभर उभे रहाणार हे मला कळल्यानं मी काळजी पोटी ते तुम्हाला दिल होत. तुम्ही तर जाग्यावर त्याची परतफेड करून टाकली..''

काका मला थांबवत म्हणाले, ""नाही नाही पोरा. अस काही समजू नको. तुला माझी कीव आली. ते तू खिश्‍यातून चटकन काडून मला दिलस. मग तू एक माझ पोरगच म्हणून तुला एखादा दराखाचा घड जास्ती दिला तर कुठ काय बिघडल? अख्खा माल बागत सडून चालला आणि तुला एखादा घड जास्त दिला तर काय फरक पडणार हाय पोरा. असू दे. घरी पोरबाळ खातील.''

मी निशब्द होतो. काहीच बोलता आले नाही. खर सांगू मित्रांनो शेतकऱ्यांची जातच अशी असते. त्याच्या हातात कायम देण्याची दानत असते. खोट वाटत असेल तर एखाद्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बघा. वावरात भाजीपाला असेल तर तो तुम्हाला कधीच रिकाम्या हाती परत येऊ देणार नाही. काही का होईना तुमच्या सोबत देणारच. पैसा अडका त्याच्यासाठी गौण. माणुसकी, आपुलकी त्याच्या नजरेत कायम महान असते.


काही शिकली सवरलेली लोक त्यांची अवहेलना करतात. खेडवळ, गबाळ्या, खेड्यातल येड, अडाणी अशी नको नको ती पदवी बहाल करून मोकळी होतात.
बाबांनो, कितीही टीका केली, कितीही अपमान केला तरीपण रोज सकाळी तुमच्या घरात जे दूध येत ना ते त्याच गबाळ्याच्या गोठ्यातून येत, हे विसरू नका. घरातला भाजीपाला संपला ना की त्याच गबाळ्याच्या पुढे जाऊन तुम्हाला तुमची झोळी भरून घ्यावी लागते हेही विसरू नका.

कसाही असला तरी जगाचा पोशिंदा ही एक डिग्री कायम त्याच्या नावापुढे जोडली जाते हे विसरू नका. म्हणून बळीराजाला सन्मान द्या... आपुलकी फुकट घ्या... जय जवान... जय किसान... जय विज्ञान !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com