महाप्रलयातून आले परतून

सानिया पाटणकर
बुधवार, 31 मे 2017

गाणे होणार होते तिथे पावसाने थैमान मांडले. गारपिटीने झोडपले. पाहता पाहता होत्याचे नव्हते झाले. जीव वाचवता आला हेच खूप असा जीवघेणा अनुभव. त्या महाप्रलयातही तंबोरा सुखरूप राहिला.

तड्‌ तड्‌ तडाड्‌. दोन वर्षांनंतर अजूनही हा आवाज कानात घुमतो आहे. वाटते, कालच घडले सगळे. जे महाकाल जे शिवशंभू शंकराचे, शिवाचे प्रलयकारी तांडव अनुभवाला आले, तेही उज्जैनसारख्या महांकालाच्या, शिवाच्या स्थानी.

गाणे होणार होते तिथे पावसाने थैमान मांडले. गारपिटीने झोडपले. पाहता पाहता होत्याचे नव्हते झाले. जीव वाचवता आला हेच खूप असा जीवघेणा अनुभव. त्या महाप्रलयातही तंबोरा सुखरूप राहिला.

तड्‌ तड्‌ तडाड्‌. दोन वर्षांनंतर अजूनही हा आवाज कानात घुमतो आहे. वाटते, कालच घडले सगळे. जे महाकाल जे शिवशंभू शंकराचे, शिवाचे प्रलयकारी तांडव अनुभवाला आले, तेही उज्जैनसारख्या महांकालाच्या, शिवाच्या स्थानी.

मार्च महिन्यातली ती टळटळीत ऊन असलेली दुपार. उज्जैनला महाकुंभाकरिता लाखो साधुसंतांचा मेळा जमला होता. केंद्र सरकारने विविध शास्रीय गायनाच्या सभांकरिता शंभर कलाकारांना आमंत्रित केले होते. मुद्दामहून गावाच्या बाहेर मोकळ्या मैदानामध्ये मोठमोठे मंडप टाकून कार्यक्रम होत होते. कलाकारांना उतरण्याकरिता मैदानातच वातानुकूलित तंबू. खूप छान सोय होती. मैदानामध्ये कदाचित गैरसोय होईल म्हणून धनंजय हेगडे व अन्य सहकाऱ्यांनी मला इंदोरमध्ये हॉटेलात राहण्याचा सल्ला दिला होता. पुण्यामधील पुष्कर लेले वगैरे काही कलाकार महोत्सवात सहभागी होणार होते. विमानात सगळेच भेटले. पंडित राजन-साजन मिश्रा, बेगम परविनजी सुलताना यांच्यासारखे दिग्गज कलाकारही तंबूमध्ये राहिले होते, तर आपल्याला काय हरकत आहे तिथे राहायला! सात-आठ तास तर काढायचे आहेत.

तंबूमध्ये गेले. जेवण झाले होते, आता आराम करावा म्हणून पडले, तर पाच मिनिटांमध्ये भर उन्हात पाऊस सुरू झाला. ऊन-पावसाची गंमत वाटली. तोच अचानक तंबू हलायला लागला. तड्‌ तड्‌ तडाड्‌. ताशा कडकडावा तसा आवाज. जोराची गारपीट सुरू झाली होती. बाहेरचा अंदाज घेत होते. पाण्याचा लोंढा तंबूत शिरणार हे लक्षात येताच, तंबूचे दार लावण्याचा प्रयत्न करू लागले. दार लागले नाही. पाण्याचा लोंढा तंबूत शिरला. काय करावे हे सुचत नव्हते, तोच काही कळायच्या आत संपूर्ण तंबूच माझ्या अंगावर कोसळला. हाताशीच असणारी पर्स आणि हातातला मोबाईल घेऊन बाहेर पडण्याची माझी धडपड सुरू झाली. तंबूतून डोके बाहेर काढता आले. आता जे डोळ्यांना दिसले, त्याने आणखीनच भयभीत झाले. बाहेर शॉर्ट-सर्किट होऊन विजेचा लोळ आकाशात गेलेला दिसला. डोळ्यासमोरच समोरचे तंबू एका मागून एक जमीनदोस्त होत होते. त्या आसमंतात पावसाचा, गारपिटीचा भयकारी आवाज आणि कण्हणं, किंकाळ्या भरून राहिलेल्या होत्या. मी एकटी पडले होते. वाटलं, तंबूबाहेर आपण पडू शकणार नाही. धरणीभंग होऊन आत गेले तर? मुलाच्या विचाराने डोळे डबडबले. डोळ्यांसमोर काळोख दाटला होता. रामनामाचा जप करण्याखेरीज काहीच करू शकत नव्हते.

आणि.... अचानक दोन हात आले आणि त्या हातांनी मला तंबूमधून अक्षरशः ओढून बाहेर काढले. तंबूतून सुटका होताच मी मोकळ्या मैदानाकडे जिवाच्या कराराने धावले. पण तिथे जास्त धोका होता. विजा कडाडत होत्या. एका न कोसळलेल्या तंबूपाशी पोचले. तिथे आधीच आठ-दहा माणसे होती. धोका होताच, पण माणसांची सोबत होती. त्यांच्याकडूनच कळले, की ओडिशाच्या काही कलाकारांना मृत्यूने गाठले होते. आतून मरणभयाने धडकांचा जोर लावला होता. मोबाईलची बॅटरी संपत चाललेली. समोर दिसतील त्या नंबर्सवर कळवत गेले, की माझ्या घरी सांगा माझे काही बरे वाईट झाले तर... सरकारी अधिकारी प्रयत्नांची शर्थ करीत होते. पण गुडघ्याच्या वर चिखल आणि दोन लाखांचा समुदाय रस्त्यावर. मदत करणेही अवघड होत होते. विवेक बनसोड माझ्या मदतीसाठी त्यांच्या घरून निघाले होते, पण दोन तास होऊनही ते पोचू शकले नव्हते.

तीन तास आम्ही फाटलेल्या आभाळाखाली उभे होतो. मुख्य रस्ता गाठण्यासाठी चिखलातून स्वतःला पुढे ढकलण्याचा प्रयत्न करीत होते. एवढ्यात मदत आली. पुण्यात माझ्या नवऱ्याला, धीरजला कळताच, त्याने थेट दिल्लीला संगीत नाटक ऍकॅडमीला दूरध्वनीवरून आमच्या परिस्थितीची कल्पना दिली. आणि मग सूत्रे हालली. एक गाडी आली. तिच्यात आम्ही पंधरा जण कोंबले गेलो. पण आता चिखलातून गाडी निघेना. तेव्हा जवळपास पंचवीस लोकांनी मागे धक्का मारून गाडी सुरू केली आणि ढकलत रस्त्यावर आणली. आम्हाला हॉटेलमध्ये हलविण्यात आले. सुरक्षित जागी आसरा मिळाल्यावर माझा बांध फुटला.

भयंकर धास्तीत रात्र जागूनच काढली. सकाळी थरथरतच बाहेर आले तर लख्ख उन पडले होते. जसे काही काल एवढे रौद्र वादळ झालेच नसावे. गुरुवार दत्तगुरूंचा! त्यांनीच मला वाचवले होते. या अशा प्रसंगातही अभद्र चिंतणारे कुणी होतेच, याचे दुःख गारपिटीहूनही थोर झाले. त्या दुःखावर मात करणारा चमत्कारही अनुभवला. सगळे सामान वाहून गेले, पण माझा तंबोरा राहिला. जणू मी माझ्या गाण्यासाठी उरले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sania patankar wirte article in muktapeeth