पासपोर्ट हरवला.. सापडला!

शलाका माटे
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

काहीतरी गोंधळ होतो. आपण अस्वस्थ होतो. मग गोंधळ आणखी वाढतो. मग चित्त होते वाराभर...

काहीतरी गोंधळ होतो. आपण अस्वस्थ होतो. मग गोंधळ आणखी वाढतो. मग चित्त होते वाराभर...

दोन मैत्रिणींबरोबर युरोपला निघाले. प्रवासाच्या चौकशीसाठी गेले. पासपोर्ट पाहिल्यावर ते म्हणाले, ""पासपोर्टचे बाईडिंग योग्य नाही. तेव्हा नवीन पासपोर्ट करावा लागेल.'' शेवटी पासपोर्ट, व्हिसा हातात आला आणि मी निघाले. मुंबई विमानतळावर सर्व आवश्‍यक त्या तपासण्या पूर्ण करुन बोर्डिंग पास घेऊन आम्ही गेटजवळ बसलो. प्रवाशांना सोडायला सुरवात झाली. एकदा वॉशरुमला पटकन जाऊन येवू म्हणून तिकडे गेलो. हातातला बोर्डीग पास पर्समध्ये टेकवला. मंजूचे लक्ष बहुधा पर्सकडे गेलें अन ती म्हणाली, "शलाका, तुझा बोर्डिंग पास पर्सबाहेर डोकावतो आहे बरं.' मी "हो' म्हटले. परतल्यावर, बोर्डिंगपास घ्यावा म्हणून पर्समध्ये हात घातला, तर हाताला लागेना. सगळे कप्पे पाहिले. बोर्डिंगपास नाहीच. तेवढ्यात पर्सबाहेर बोर्डिंगपास डोकावतो आहे हे मंजूचे वाक्‍य आठवलें आणि वॉशरुमकडे धावत गेले. तिथे नव्हता. जाण्या-येण्याच्या वाटेवरही दिसला नाही. विभा, मंजू, टुर लीडर सगळ्यांनी पर्स पाहिली. माझा धीर सुटत चालला होता. मी गेटजवळच्या ऑफिसरला विचारले, "बोर्डिंगपास सापडत नाही. माझ्याकडे तिकीट, पासपोर्ट आहे. तेव्हा मी आत जाऊ शकते का?' जोरात नकार मिळाला.

मैत्रिणी मागे बघत आत गेल्या. माझें युरोपचे स्वप्न सध्या तरी स्वप्नच राहणार होते. अचानक एक स्त्री आली. "मॅडम तुम्ही खुर्चीत शांतपणे बसा आणि पटकन एकदा पहा ना.' "अहो चार वेळा पर्स पाहून झाली,' असें म्हणत परत सगळे कप्पे उलगडले. आता फक्त शेवटचा कप्पा. मोठ्या कप्प्याच्या थोडा आत दडलेला लक्षातच आला नव्हता. त्यातच बोर्डिंगपास होता. आम्ही दोघी जोरात ऑफिसरकडे पाहात ओरडलो. आत जायला दोन मिनिटे उरली होती. मी अक्षरशः पळत गेले. मैत्रिणी वाटेकडे डोळे लावून बसल्या होत्या. एकमेकींना पाहिल्यावर आता आनंदाचे अश्रू वाहायला लागले. मी सीटवर शांत बसले आणि मनात आले, मला पर्स उघडाच म्हणणाऱ्या त्या स्त्रीला मी "थॅंक्‍स' म्हटलें का?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shalaka mate write article in muktapeeth