शून्यागारातील महाटिकटिक 

शून्यागारातील महाटिकटिक 

ध्यानधारणा शिकण्यासाठी एखाद्या शिबिराला जाण्याची पद्धती आता रूढ होऊ लागली आहे. ध्यानधारणेच्या एका शिबिराला आमचा एक मित्रही गेला होता. या मित्राने त्याच्याबाबत घडलेला एक प्रसंग नुकताच कथन केला. गौतम बुद्धाने विकसित केलेल्या ध्यान पद्धतीविषयी कुतूहल होतेच! अनेक वर्षे नोकरी आणि इतर व्यापामुळे अशा दीर्घ मुदतीच्या शिबिरास जाणे त्याला जमले नव्हते.... खरे तर ही केवळ सांगायला म्हणून सबब. सलग अकरा दिवस मोकळा वेळ काढून आजच्या गतिमान युगात ‘संन्यासी’ होऊन स्वतःशी संवाद करायचा... जीवनाकडे अधिक व्यापकतेने बघायला शिकायचे. देहाला जाणिवा, संवेदनांच्या पातळीवर सजग करायचे आणि नाठाळ मनाला आवर घालायचा, ही गोष्ट तशी सोपी नव्हेच! 

शिबिराचा नितांत रम्य आणि अतिभव्य परिसर. मागे सुंदर डोंगररांग. पाणी साठवणीचा एक विशाल तलाव. मोठे थोरले वृक्ष... पहाटेच्या स्तब्ध शांततेवर आपल्या कूजनाने अदृश्‍य तरंगनक्षी रेखाटणारे अनेकविध पक्षी! दहा दिवसांचे मौन पाळायचे, ही काही साधी बाब नव्हे. अशा नि:शब्द होण्याने निसर्गातले आवाज आणि आपल्या ‘अंतरा’तले आवाज स्पष्टपणे ऐकू येऊ लागतात. मौनात स्वतःचा आवाज ऐकणे महत्त्वाचे. 

तर माझ्या या मित्राला एक दिवस ‘शून्यागारा’त बसण्याची संधी मिळाली. साधकांसाठी शून्यागार म्हणजे जणू काही तपस्वी जनांची एकांतवासाची गुहाच. जवळपास पुरुषभर लांबी. दोन्ही हात थोडेसे बाजूला रुंदावल्यावर हाताला लागणाऱ्या शेजारच्या भिंती. उंची साधारण आठ फूट. आत उघडणारा आतून बंद करता येण्याजोगा दरवाजा. खाली फरशीवर पातळशा गादीची मऊ बैठक. नेमून दिलेल्या दिवशी क्षमतेनुसार साधक या शून्यागारात बसून ध्यान धारणा करू शकतो. पहाटेपासून तेथे बसू शकता. या शून्यागारात जाऊन बसले की घड्याळाची वेळ कळत नाही की कुणी दिसत नाही. 

शिबिरात प्रवेश करतानाच मोबाईल नावाचे यंत्र आपल्या ताब्यातून काढून घेतलेले असते. त्यामुळे मोबाईलही जवळ नसतो; पण सकाळी जाग येण्यासाठी गजराचे घड्याळ सोबत ठेवायला परवानगी असते. आता शून्यागारात वेळ कशी समजेल, या शंकेने आदल्या रात्रभर आमच्या मित्राच्या डोक्‍यात विचारकाटे फिरत राहिले. शेवटी आपण आपले टेबल क्‍लॉक सोबत नेऊ, या विचारावर तो ठाम झाला. पहाटे शून्यागारात गेला. 

पुढची हकीकत त्याच्याच शब्दांत वाचा - 
... त्या टिकटिक करणाऱ्या इवल्याशा यंत्राला खिशात घेऊन शून्यागारात पोचलो. बैठकीवर बसलो खरा; पण त्या ‘पिनड्रॉप’ शांततेत ती टिकटिक... म्हणजे महाध्वनी वाटला. रात्री सारे जग झोपलेले असताना बंद न होणारा पाण्याचा नळ टपटप गळत असतो. त्याचा आवाज खूप मोठा वाटतो आणि आपली झोप उडते, तसे झाले. घड्याळ आणि त्याची महाटिकटिक ही एक कटकटच झाली. आता या घड्याळाचे नरडे बंद कसे करायचे? पहाटेचा गच्च काळोख आणि त्यात शून्यागारातील दिवाही लागेना. हा आवाज थांबवायचा तरी कसा? मुळात शून्यागारात कोणतीही वस्तू नेण्यास परवानगी नसताना हे घड्याळ घेऊन येण्याची चूक केली होती. ते आपले अस्तित्व आणखी मोठ्याने जाणवून देत होते. शून्यागारातील पहिल्याच ध्यान साधनेचा असा बोऱ्या वाजलेला. खिशात ठेव, बैठकीखाली ठेव...नाना प्रयोग करून झाले... टिकटिक थांबेना... काय करावे सुचेना... वेळ निघून चाललेली, घड्याळाचे काटे पुढे पुढे सरकतच होते! या खटपटीत बराच वेळ गेला. मनाचा निग्रह करून त्या आवाजाला माझ्या आत्मिक बळाने थोपविण्याचा आटोकाट प्रयत्न सुरूच ठेवला. मन:स्वास्थ्यच ढळल्यावर तुमच्या मनाची खरी ताकत लक्षात येते. हे आव्हान कसे पेलावे, हा विचार मनातून काही केल्या जाईना... एवढ्या चांगल्या संधीची माती होत होती. नव्हे, मी माझ्या हातानेच ही संधी वाया घालवत होतो. ‘दैव देते पण कर्म नेते’, या वाक्‍प्रचाराची तीव्रतेने आठवण झाली! 

एकदम कल्पना सुचली. या घड्याळाचा ऊर्जास्रोत बंद केला तर... आणि क्षणार्धात त्या घड्याळातली बॅटरी काढून टाकली...त्याचे नरडे बंद झाले! सुटलो एकदाचा असे म्हणत ‘न-आवाजा’त ध्यानाला बसलो. जेमतेम पाचएक मिनिटे झाली असतील... आणि घंटेचे टोल कानावर पडले. न्याहरीची सूचना देणारे ते टोल होते. 

 ‘शून्यागारात’ला हा असा ‘शून्य ध्यानाचा अनुभव’ गाठी बांधून आमचे ‘मित्र-ध्यान’ शून्यागारातून 
बाहेर पडले! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com