आठवणीतील हादगा

आठवणीतील हादगा

एेलमा पैलमा गणेश देवा!
 माझा खेळ मांडू दे 
करीन तुझी सेवा...’ 
हे मुलींच्या गाण्याचे सूर कानावर पडले आणि आम्ही खेळत असलेल्या हादग्याची आठवण झाली. ‘हादगा’, आमच्याकडे त्याला ‘हातका’ म्हणतात तर थोडे प्रमाणभाषेत ‘भोंडला’. अश्‍विन महिन्यात हस्त नक्षत्र निघाले की आमचा हातका बसायचा व त्याचा मुक्काम तब्बल सोळा दिवस असायचा. पूर्वी बांबूच्या कामटांचा चौरस करून त्यांच्या मध्ये ही आडवी-उभी कामटे बांधून तो तुळीला टांगायचा व त्याचा हातका म्हणून पूजन करायचे. पहिल्या दिवशी हातग्याला साडेसोळा फळे व फळभाज्या बांधायच्या.

त्यामध्ये काकडी, दोडका, टोमॅटोपासून ते सीताफळ, पेरू, चवळीच्या शेंगापर्यंत खूप लांब यादी असायची आणि सर्वात मध्ये अर्धे फळ बांधायचे. त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक दिवशी हादग्याला एक-एक माळ सभोवती फिरवून बांधायची. त्यामध्येही चिरमुऱ्यांची, खोबऱ्याची व काटेभोवऱ्याची माळ बांधली की मग राहिलेल्या माळा कारीळ्याच्या पिवळ्याधम्मक फुलांच्या बांधायच्या.

पहिल्या दिवशी एक गाणे, दुसऱ्या दिवशी दोन असे करत करत चढत्या क्रमाने सोळाव्या दिवशी सोळा गाणी म्हटली जात, या गाण्यांत तरी किती विविधता. 
आज कोण वार बाई आज कोण वार,
आज आहे सोमवार, 
महादेवाला नमस्कार! 
असे म्हणत प्रत्येक देवाला नमस्कार करायचा तर कधी 
ती मी फुले हातक्‍याला दिली,
हातक्‍याने मला प्रसाद दिला, 
तो मी प्रसाद सर्वांना वाटला...

असे म्हणत ‘देतो तो देव राखतो तो राक्षस’ या उक्तीची प्रचिती द्यायची. कधी कधी 
शिक्‍यावलं लोणी खाल्लं कोणी
खालं खालं वटाणीनं खाल्लं, 
आता माझा दादा येईल गं...
म्हणत वहिनीला चिडवण्याची संधी साधायची तर कधी

आडबाई आडवनी, आडाचं पाणी कडवनी आडात व्हती संत्री, हातका आमचा मंत्री
असे म्हणत हातक्‍याला छान छान उपाधी जोडायची. या साऱ्या गीतांमधून निसर्ग, देवदेवता, नातेसंबंध यांच्याबाबतचे भरभरून वर्णन असायचे आणि या मुलींचा सूरही असा जमायचा की, ही गाणी कधी संपूच नयेत, असे वाटायचे. या हादग्यामध्ये आणखी एक खास गोष्ट असायची ती म्हणजे दररोजचा हातक्‍याचा प्रसाद.  यामुळे दररोज नवीन पदार्थ खायला मिळे. आणि यातील आणखी एक आमच्या आवडीची गोष्ट. ती म्हणजे शेवटी खिरापत ओळखणे, ओळखायची नाही कधी कधी. मग डबा वाजवून, वास देऊन, अगर काही खुणा सांगून ती ओळखली जायची. सारेच कसे मजेदार!

हा हादगा आम्ही सोळाव्या दिवशी नदी अगर ओढ्यात सोडत असू. हादग्याचे विसर्जन हे आमच्यासाठी मोठी मेजवानी असे. हातक्‍याच्या निमित्ताने याबद्दलच्या काही गोष्टीही आई-आजींकडून ऐकायला मिळत. आजी म्हणे हस्त दुनियेचा राजा तर आई म्हणे ‘पडेल हस्त तर पीक येईल मस्त!’ आम्ही विचारू ‘असं का गं?’ तर म्हणे कशी, ‘‘अगं नुकतीच भातं भरायला लागलीत. जर या हस्ताचा पाऊस पडला तर ती टपोरे भरतात नाहीतर पोची (फोल) निपजतात. म्हणजे रिकामी तशीच राहतात. कधी कधी हा हस्ताचा पाऊस हत्ती जसा सोंडेतून धुवाँधार पाण्याचा वर्षाव करतो तसा कोसळतो. खूपच नुकसान करतो. साऱ्या पिकांना झोडपून काढतो. असा कोसळायला लागला की मग आजोबा म्हणत ‘हत्ती नि पाडी भीती.’ पाऊस अगदी आभाळात सातफळी धरून येई. दिवसातून एकदा गच्च आभाळ भरून पडला की एक फळी! असे दिवसातून सात वेळा आकाश भरून सात वेळा धो-धो पाऊस पडला की सात फळीचा पाऊस म्हटले जाई. असा हा फळ्या धरून पाऊस मुसळासारखा धो-धो कोसळायचा. सारी पिके भुईसपाट करून ठेवी. मग मात्र घरच्यांचा सारा राग आमच्या हातक्‍यावर पडायचा. कसली पूजा करताय? गप बसा! नुसता हैदोस घातलाय तेनं’ तर असा हा हादगा. परतीचा पाऊस घेऊन येणारा. पुढील रब्बी हंगामासाठी जमिनीची जलसंजीवनी वाढविणारा. निसर्गाची सधनता सांगणारा! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com