साडूची ऐशीतैशी!

श्रीधर अनगळ
शनिवार, 2 फेब्रुवारी 2019

दुसऱ्यांचा साडूही आपल्याला कधीकधी त्रासदायक ठरू शकतो, बरं का!

दुसऱ्यांचा साडूही आपल्याला कधीकधी त्रासदायक ठरू शकतो, बरं का!

मी नुकताच माझा अगोदरचा पुस्तक विक्रीचा व्यवसाय बंद करून कपडे विक्रीचा धंदा सुरू केला होता. एक दिवस असेच एक ओळखीचे बहीण-भाऊ दुकानात आले. मुलगा पंधरा-सोळा वर्षांचा; तर त्याची बहीण त्याच्याहून दोन-एक वर्षाने मोठी. त्यांच्या वडिलांचा पन्नासावा वाढदिवस साजरा करावयाचा होता. या मुलांना त्यांच्या वडिलांना एक "सरप्राइझ गिफ्ट' द्यायची होती; पण त्यांच्याकडे खरेदीसाठी पुरेसे पैसे नव्हते. ते कुटंब बऱ्याच वर्षांपासून माझ्या ओळखीचे होते, म्हणून मी त्यांना उधारी ठेवून एक छानसा झब्बा-कुर्ता दिला. त्यानंतर दोन-तीन दिवसांनी ते कुटुंब त्यांच्या नातेवाइकांसह दुकानात आले. भाऊसाहेबांनी तो नवीन झब्बा-कुर्ता घातला होता. आता त्यांच्या मुलासाठीही एक झब्बा-कुर्ता हवा होता. त्याचे पैसे देण्यासाठी भाऊसाहेबांनी पाकीट काढल्यावर त्यांच्या सौभाग्यवती म्हणाल्या, ""अहो, आज आपल्याकडे खूप वर्षांनी अशोकराव मुंबईहून आले आहेत, त्यांच्यासाठीही एक झब्बा-कुर्ता घेऊया'' हे ऐकल्यावर भाऊसाहेबांना होकार देणे भागच पडले. साडूसाहेबांनी प्रत्येक झब्बा-कुर्त्याची किंमत पाहून महागातला एक झब्बा-कुर्ता निवडला.
भाऊसाहेबांनी आधीचे उधारीचेही बिल दिले आणि ती मंडळी आनंदाने गप्पा मारत बाहेर पडली. त्यानंतर साधारण आठ दिवसांनी भाऊसाहेब दुकानात आले. आल्या आल्या ते मला म्हणाले, ""अहो, तुम्ही त्या आमच्या फुकट्या साडूला महागातले महाग झब्बे-कुर्ते दाखवत बसलात. अहो, तो एक नंबरचा फुकट्या आहे.'' अशी बरीच मुक्ताफळे उधळल्यावर थोडेसे शांत झाले. मग मी त्यांना म्हणालो, ""अहो भाऊसाहेब, त्या माणसाबद्दल मला कसे काय माहीत असणार? तुम्ही मला आधीच सांगितले असते तर मी त्यांना थोडे कमी किमतीचे झब्बे-कुर्ते दाखविले असते.'' पण भाऊसाहेबांना ते पटले नाही. जराशा नाराजीनेच दुकानाबाहेर पडले आणि त्यानंतर गेल्या पंधरा वर्षांत पुन्हा खरेदीला आलेले नाहीत. आता त्यांचा साडू फुकट्या होता यात माझा काय दोष? पण त्या साडूपायी मी माझे एक ग्राहककुटुंब गमावले ना!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shridhar angal write article in muktapeeth