एकलव्याची पराकाष्ठा

श्रीधर कृष्णाजी पाठक
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

शिकण्याला वयाचे बंधन नसते, असावी लागते ती इच्छा. आपल्या आवडीचे शिकण्यासाठी अडसर येणारच नाहीत, असे नाही; पण इच्छा तिथे मार्ग निघतो. वाट चालायला सुरवात करायची असते.

शिकण्याला वयाचे बंधन नसते, असावी लागते ती इच्छा. आपल्या आवडीचे शिकण्यासाठी अडसर येणारच नाहीत, असे नाही; पण इच्छा तिथे मार्ग निघतो. वाट चालायला सुरवात करायची असते.

लहानपणी एकलव्याच्या धनुर्विद्येच्या ज्ञाननिष्ठेची गोष्ट आपण साऱ्यांनीच ऐकली आहे. मीदेखील ती कथा अनेकदा ऐकली. धनुर्विद्या शिकण्याची एकलव्याची आंतरऊर्मी इतकी तीव्र होती, की द्रोणाचार्यांनी ती कला शिकवायला नकार दिल्यावर एकलव्याने त्यांची मातीची प्रतिमा समोर ठेवून स्वकष्टाने आणि प्रयत्नपूर्वक ती कला आत्मसात केली. प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणजे काय, याचे ते एक उत्तम उदाहरण महाभारतात आहे. त्याच्या या पराकाष्ठेची अल्पशी अनुभूती मलाही आली आहे. त्या अनुभूतीचा उपयोग कोणालातरी आपल्यातही जिद्द जोपासण्यासाठी झाला तर मला आनंद होईल, म्हणून हा अनुभव इतरांनाही सांगावा, असे मला मनापासून वाटते.
मला संगीताची, गाण्याची आवड लहानपणापासूनच आहे. लहानपणी वडिलांनी गाण्याची शिकवणीही लावून दिली होती. माझी शिकवणीची फी चार आणे होती. पण एकदा त्या शिकवणीमध्ये मी मस्ती करत होतो, तेव्हा मी टेबलावरून मारलेली उडी तिथल्या डग्ग्यावर पडली आणि तो डग्गा फुटला. त्यामुळे वडिलांना सव्वा रुपाया नुकसानभरपाई द्यावी लागली. त्या वेळी घरची परिस्थिती बेताची होती. म्हणून माझी ती शिकवणी जी बंद झाली, ती बंदच झाली. पुढे नंतर अनेक वेळा मी तो प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी शिकवणीने हुलकावणी दिली. ती इच्छा मनात तशीच राहिली. सेवानिवृत्तीनंतर पुन्हा माझी ती इच्छा उफाळून आली. वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी गाणे शिकणे पुन्हा सुरू केले. गाण्याला संवादिनीची (हार्मोनियम) साथ देता यावी, असे मला वाटत होते. म्हणून मी एक जुनी संवादिनी विकत घेतली. त्यानंतर गाणे गाताना ती वाजवता यावी म्हणून अनेक संगीत शिक्षकांकडे मी शिकवणीसाठी गेलो. त्या प्रत्येकाने मला हार्मोनियमचे शास्त्रीय शिक्षण पहिल्यापासून सुरू करण्याचा आणि त्यासाठी परीक्षा देण्याचा आग्रह केला. सुरवातीला मी ते शिकण्याचा प्रयत्न केला; पण आरोह आणि अवरोह महिनोन्‌ महिने वाजवत बसण्यात मला रस वाटेना. मला संवादिनीवर गाणे वाजवायचे होते. त्यामुळे कोणीतरी मला थेट शिकवावे, असा माझा प्रयत्न सुरू होता; आणि त्याला काही यश मिळत नव्हते.

माझ्या परीने गुरू मिळवण्याचे माझे प्रयत्न सुरूच होते. एक दिवस संगीत शिक्षिका माधवी प्रशांत तळणीकर यांची भेट झाली. त्यांनी माझे वय आणि शिकण्याची तीव्र इच्छा पाहून मला पाहिजे त्या पद्धतीने हार्मोनियम वाजवायला शिकवायची तयारी दाखवली. पण हे काम दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवस करणार नाही, अशी अटही त्यांनी टाकली. कारण त्यांना तेवढाच वेळ होता. आठवड्यातून दोन दिवस या पद्धतीने दोन महिने मी त्यांच्याकडून पेटीवर थेट गाणे वाजवण्याच्या काही टिप्स घेतल्या. त्याचा सराव करायला सुरवात केली. त्याच वेळी आमच्यामध्ये गुरू-शिष्याचे नातेही निर्माण झाले. तसेच मला तीन मुली असूनही मी त्यांना मानसकन्या म्हणू लागलो आणि त्यांनीही ते नाते मोठ्या आनंदाने मान्य केले आणि पाहता पाहता दोन महिने संपलेही. त्यानंतर क्‍लास बंद झाला. शेवटच्या दिवशी निरोप घेताना त्यांनी मला पूर्ण विश्‍वास दिला. कसे प्रयत्न केले म्हणजे मला गाणे म्हणताना संवादिनी वाजवता येईल हे सांगितले आणि मी ते करू शकेल याची खात्रीही व्यक्त केली. त्यांच्या त्या शब्दांनी मला खूप उत्साह आला. पुढे ज्या-ज्या वेळी त्या मला भेटत गेल्या, त्या-त्या वेळी त्यांनी मला अनेक गोष्टी समजावून सांगून माझा आत्मविश्‍वास वाढविण्याचा प्रयत्न केला.

त्याच सुमारास आपला आत्मविश्‍वास कसा वाढवावा या संदर्भातील लेखक शिवराज गोर्ले यांची आणि इतर काही लेखकांची पुस्तकेही माझ्या वाचनात आली. त्याच काळात तळणीकरबाईंचा गायनाचा एक जाहीर कार्यक्रम झाला आणि त्यांचे छायाचित्र आणि कार्यक्रमाची बातमी वृत्तपत्रात छापून आली. मी संवादिनी वाजवण्यासाठी रोज बसतो त्या जागेसमोर त्यांचे ते कात्रण लावून ठेवले आणि समोर बसून त्या मला गाणे म्हणून शिकवित आहेत, असा विचार करून मी संवादिनी वाजवून गाऊ लागलो. त्यांची प्रेरणा आणि मला संवादिनीवर गाणे वाजवता येईल हा मी बाळगलेला आत्मविश्‍वास यामुळे मला आता तीन वर्षांत साधारण पंचवीस-तीस गाणी वाजवता येऊ लागली आहेत. शास्त्रीयदृष्ट्या ती परिपूर्ण नसतीलही; पण सर्वसामान्य श्रोत्यांना आणि मलाही ते गायन, वादन खूपच आनंद देत आहे. ही गाणी गाताना आणि वाजवताना दिवसातले दोन-तीन तास असे जातात, की जणू ब्रह्मानंदी टाळी लागते. एकलव्याच्या जिद्दीशी ही तुलना नक्कीच नाही; पण प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर कोणत्याही वयात काहीही साध्य करता येते, हे मात्र मी खात्रीपूर्वक सांगू शकतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shridhar pathak write article in muktapeeth