नेवार्क विमानतळावर...

श्रीनिवास वळसंगकर
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

एक्‍सलेटरवर आम्ही दोघांनी एकदमच पाऊल ठेवले. परंतु काही सेकंदांतच पत्नी एक्‍सलेटरवरून गडगडत चार-पाच पायऱ्या खाली जाताना दिसली.

छोटी नात, मुलगी, जावई अमेरिकेला जाऊन साधारण दीड वर्ष होत आले होते. आम्ही एकमेकांशी स्काईपवर गप्पा मारत असू. घर, फर्निचर, कार, नातीची खेळणी, नवीन खरेदी स्काईपवर पाहात एकमेकांच्या जवळ असल्याचे समाधान मानत असू. नात छोटी असल्याने स्काईप ओपन होताच तिला अतिशय आनंद होत असे व तिला आम्हाला काय दाखवू, काय नको होत असे. तिची पळापळ पाहून आमचे व तिचे मनोरंजन होत असे.

एक्‍सलेटरवर आम्ही दोघांनी एकदमच पाऊल ठेवले. परंतु काही सेकंदांतच पत्नी एक्‍सलेटरवरून गडगडत चार-पाच पायऱ्या खाली जाताना दिसली.

छोटी नात, मुलगी, जावई अमेरिकेला जाऊन साधारण दीड वर्ष होत आले होते. आम्ही एकमेकांशी स्काईपवर गप्पा मारत असू. घर, फर्निचर, कार, नातीची खेळणी, नवीन खरेदी स्काईपवर पाहात एकमेकांच्या जवळ असल्याचे समाधान मानत असू. नात छोटी असल्याने स्काईप ओपन होताच तिला अतिशय आनंद होत असे व तिला आम्हाला काय दाखवू, काय नको होत असे. तिची पळापळ पाहून आमचे व तिचे मनोरंजन होत असे.

आता आम्ही अमेरिकेत यावे यासाठी तिचा आग्रह सुरू झाला. तिला उत्तरे देता देता आपण जाण्याचे जास्तच टाळत असल्यासारखे वाटू लागले. न येण्याची कारणेही संपली. मग एकदाचा व्हिसाचा प्रयत्न करून पाहू; नि मिळाल्यास तसे न येण्याचे प्रश्‍नही आपोआपच संपतील, या विचाराने व्हिसा प्रोसेस करण्याचे आम्ही ठरविले. व्हिसा इंटरव्ह्यूला गेलो आणि आश्‍चर्य म्हणजे आमच्या रांगेमधील पुढच्या-मागच्या लोकांना व्हिसा मिळाला नाही, पण आम्हा दोघांचा व्हिसा मंजूर झाल्याचे अमेरिकन लेडीने लगेच सांगितले. आता मात्र आम्हाला जाणे भागच होते. व्हिसा मिळाल्याचे कळताच जावईबुवांनी दोन-तीन आठवड्यांतच तिकीटही पाठविले.

त्याप्रमाणे आम्ही दोघे पुणे-फ्रॅंकफर्ट-वॉशिंग्टन डी.सी.-नॅशवेल असा प्रवास करून पोचलो. प्रवासात सावध राहणे जरुरीचे आहे. छोट्या-छोट्या गोष्टींतून मोठ्या समस्या उभ्या राहू शकतात. वॉशिंग्टन डी.सी. ते नॅशवेल प्रवासात विमानात बसण्याआधी केबिन बॅग खाली ठेवण्यास सांगण्यात आले. बॅग ठेवून विमानात आल्यानंतर बॅगेत दोघांचेही पासपोर्ट असल्याचे लक्षात आले. हवाईसुंदरी खाली उतरण्यास मनाई करत होती. पण मी खाली उतरून पासपोर्ट घेऊनच विमानात बसलो. पासपोर्ट हरवल्यास खाली उतरणे भागच पडले असते.

अडीच महिन्यांच्या अमेरिकेतील मुक्कामात ऍटलांटातील लाइव्ह डॉलफिन शो, सी. क्रीचर्स म्युझियम, कोकाकोला फॅक्‍टरी, नारायण स्वामी मंदिर पाहिले. तसेच जवळ जवळ चौदाशे किलोमीटरचा प्रवास मोटारीने केला. नयनरम्य असा जॉर्जिया-नायगाराचा धबधबा बोटीतून जवळून पाहिला. तसेच आदल्या दिवशी त्याच धबधब्यावर रात्रीचा "फायर क्रॅकर'चा शोही पाहिला. जाताना सिनसिनाटीच्या व येताना कोलंबसच्या हॉटेलमध्ये रात्रीचा मुक्काम केला. तसेच नायगाराच्या चौकातच कॅनडाची हद्द सुरू होत असल्याने कॅनडातही जवळून चक्कर मारली. नॅशवेलच्या जवळपासच्या सहलीही सुखद ठरल्या. थंडी जवळ येऊ लागली तशी झाडांच्या पानांचा रंग लाल होताना दिसला.

या मौजमजेत अडीच महिने संपले व भारतात परतीचा दिवस आल्याचे कळलेच नाही. या परतीच्या शॉरलेट - नेवार्क प्रवासात वेगळाच अनुभव आला. शॉरलेट-नेवार्क फ्लाईटने वेळेत टेक-ऑफसाठी रनवे गाठला. परंतु विमानाने रनवेवर दोन वेळा फेऱ्या घेऊन अर्ध्या तासाचा थांबा घेतल्याने पुढील प्रवासाची काळजी वाटू लागली. कारण पुढील फ्लाईटमध्ये फक्त दीड तासाचेच अंतर होते.

नेवार्कला पोचताच टर्मिनलला पोचण्यासाठी एअरपोर्टची मोनो रेल हाच शॉर्टकट होता. मोनो रेल पकडण्याचा शॉर्टकट आमच्या चांगलाच अंगलट आला. एक्‍सलेटरवर आम्ही दोघांनी एकदमच पाऊल ठेवले. परंतु काही सेकंदांतच पत्नी एक्‍सलेटरवरून गडगडत चार-पाच पायऱ्या खाली जाताना दिसली. मी कोणताही विचार न करता उलटे खाली जाऊन तिला गाठले. ती झोपल्यासारखी पायऱ्यांवर पडली होती. तिच्या डोक्‍याला साईडचा धक्का लागून नये म्हणून मी हाताचा पंजा धरून वर पोचेपर्यंत तिला सावरले. दरम्यानच्या काळात एक तरुण सुरक्षारक्षक एक्‍सलेटरवर कोठून आली, मला समजलेच नाही. तिनेही आम्हाला आधार दिला. केबिन बॅग सांभाळल्या. वर पोचताच तिच्या सिनियर सिक्‍युरिटी ऑफिसरनेही आम्हाला कोठे लागले का, तसेच मेडिकल एड हवी का ते आपुलकीने विचारले. त्यांना "नो थॅंक्‍स' म्हणेपर्यंत समोर मोनो-रेल येऊन थांबल्याचे दिसले. तसा घाबरून पत्नीचा पुतळाच झाला होता. तिला मी समोरील रेल्वेच्या डब्यात नेले. काही मिनिटांतच आम्ही टर्मिनलजवळील थांब्यावर उतरलो व कण्हतच टर्मिनल गाठले.

तेथे पोचताच एकमेकांना कोठे कोठे लागले ते पाहू लागलो. मिसेसला बराच मुका मार लागला होता. तिला नीट चालताही येत नव्हते. मी उलट्या दिशेने एक्‍सलेटरवरून खाली गेल्याने माझ्या पायांना एक्‍सलेटरचे फटके बसून जखमा झाल्या होत्या. आम्ही दोघेही वाचलो होतो. त्याचेच समाधान मानून व फ्लाईटच्या वेळेत पोचल्याच्या समाधानात मुंबईला पोचलो. मुंबईत मायभूमीत पोचताच जणू पुण्यात पोचल्यासारखे वाटले. परंतु, अजूनही मनात येते, या प्रसंगात काही विपरीत घडले असते तर...

Web Title: shriniwas walsangkar's muktapeeth article