घराघरात हवेत - श्याम आणि श्यामची आई

श्याम आणि श्यामची आई घराघरात निर्माण व्हायला हवी
श्याम आणि श्यामची आई घराघरात निर्माण व्हायला हवी

आज 24 डिसेंबर अर्थात साने गुरुजी यांची जयंती त्यानिमित्त त्यांच्या आई यशोदा वर टाकलेला एक प्रकाश -

२ नोव्हेंबर २०१६ पासून सानेगुरुजीची आई यशोदा साने यांची स्मृतिशताब्दी साजरी करण्यात येत आहे. साने गुरुजींनी "श्यामची आई" हे पुस्तक लिहून त्यांच्या आईला जगप्रसिद्ध केले आहे. प्र. के. अत्रे म्हणाले होते," श्यामची आई हे पुस्तक मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र आहे." आईबद्दल जगात किती वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य निर्माण झाले असेल पण अजूनही धार्मिक ग्रंथाप्रमाणे घरोघरी ज्याचे वाचन व्हावे,असे वाटते ते म्हणजे सानेगुरूजी लिखित "श्यामची आई" हे पुस्तक होय. सानेगुरुजींच्या प्रेमाने चिंब होऊन आजही सर्वांच्या हृदयात मायेचा ओलावा टिकून असलेले हे पुस्तक! आजच्या आधुनिक युगात यशोदा साने,राष्ट्रमाता जिजाऊ यांच्यासारख्या स्वाभिमान,राष्ट्रप्रेमाचे संस्कार करणाऱ्या आईची नितांत गरज आहे. तरच सानेगुरुजीसारखे संवेदनशील व शिवाजी महाराजांसारखे युगपुरुष सर्वांच्या हृदयावर राज्य करतात.

कोण होती श्यामची आई, आज जिच्या निधनाच्या एका शतकानंतरही तिच्या संस्काराची, तिच्या विचाराची गरज लोकांना वाटते. आजची भरकटलेली दिशाहीन, आत्मकेंद्री, व्यसनाधीन, तरुण पिढी पाहिली की, सानेगुरुजींच्या आईची गरज भासते. कसा घडवला या आईने आपला मुलगा? आजच्या आईसारखे संस्कार शिबिरात पाठवून की, व्यक्तिमत्त्व विकासाचे क्लास लावून? आज मुलांना घडवताना का गरज पडते अशा औपचारिक प्रयत्नांची? चंगळवादी युगात संस्कारही विकत मिळू शकतात का?

श्यामच्या आईने केलेले संस्कार हे दैनंदिन जीवनात चालताबोलता येणाऱ्या प्रसंगातून केलेले आहेत. असं म्हणतात,देणाऱ्याने दे जावे,घेणाऱ्याने घेत जावे..." हे संस्कारच असे आहेत की,देणारी आई जेवढी जबाबदार व्यक्ती होती तेवढेच त्या संस्कारांना स्वीकारून आचरणात आणणारे साने गुरुजी  संवेदनशील होते. म्हणूनच हे संस्कार देणारी आणि घेणारी ह्या दोन्ही व्यक्ती आज अजरामर आहेत. श्यामची आई म्हणजे फार उच्चशिक्षित वगैरे काही नव्हती. गरीबीत कोंड्याचा मांडा करुन स्वाभिमानाने जगणारी आणि तोच स्वाभिमान आपल्या मुलांमध्ये यावा म्हणून प्रयत्नशील असणारी आई होती ती!  प्रसंग अगदी साधे आहेत. वरवर पाहता  रोज आई आणि मूल यांच्यात घडणारे हे सरळ संवाद आहेत. पण प्रत्येक संवादामध्ये जीवनाचे तत्वज्ञान साररूपाने भरलेले आहे.

"श्यामचे पोहणे" या कथेत श्यामला पोहण्याची भीती वाटते. त्याला  पोहणे शिकवण्यासाठी मुले येतात तेव्हा तो लपून बसतो. अशावेळी आपल्या मुलाला कोणी भित्रा म्हणू नये त्याला मारून पोहायला पाठविणारी आणि आपणच त्याला त्या मारलेल्या पाठीवर तेल लावणारी आई म्हणजे यशोदा साने! मुलांवर चांगले संस्कार करतांना वेळप्रसंगी कठोर व्हावं लागतं,हे आम्हाला शिकविणाऱ्या श्यामची आई ही अशा वेळी  एकट्या श्यामची रहात नाही,ती सर्व भारतातील मुलांची आई होते. मुलाच्या मनाला घाण लागू नये म्हणून लहानपणापासूनच तसे संस्कार करणारी आई विरळच! सावित्रीच्या व्रतातून स्त्री-पुरुष समानता, हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथेवर टीका करणारी आई, स्पृश्य-अस्पृश्याची जाचक बंधने असतांनाही अस्पृश्य म्हातारीला मदत देऊन जातीपेक्षा माणुसकी शिकविणारी आई, पत्रावळ बनवायला सांगताना कामाबद्दलची निष्ठा शिकविणारी, दुसऱ्यांच्या  महालातल्या सुखापेक्षा  झोपडीतले स्वातंत्र्यमूल्य जपणारी,यशस्वी होण्यासाठी प्रेम, ज्ञान, शक्ती यांचे महत्व पटवून देणारी, मुक्या कळ्या तोडू नये सांगताना पर्यावरण रक्षणाचे महत्व सांगणारी, गरीबीतही स्वाभिमान जपणारी, नवऱ्याला सुखदुखात साथ देणारी, सुतकामागे संसर्गजन्य रोगाचा संदर्भ सांगून वैज्ञानिक दृष्टिकोन जपणारी,लग्नातील दक्षिणा नाकारून,दारिद्र्यातही माहेर त्यागणारी  स्वाभिमानाचे रक्षण करणारी आणि शेवटी त्याच्यावरच घाला झाल्याने, ते सहन न झाल्याने त्यात खचून मरेस्तोवर अंथरुणाला खिळून बसलेली आई श्यामला लाभली होती. आपला मुलगा आपल्या प्रेमाच्या मोहात अडकून देशसेवा करणार नाही, म्हणून आई लाडक्या श्यामला सोडून गेली असेल, असा आईच्या मृत्यूचाही व्यापक अर्थ लावणारा श्याम पुन्हा होणे नाही."श्यामची आई"या पुस्तकाचे हस्तलिखित साठसत्तर लोकांनी वाचले,ऐकले होते.तेव्हा त्यावरची त्या लोकांची प्रतिक्रिया फार बोलकी होती,जी सानेगुरुजींनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिली आहे, "आईबद्दलची आमची भक्ती व प्रीती हे हस्तलिखित वाचून शतपट वाढली". आपल्याच जन्मदात्रीवर नव्याने प्रेम करायला शिकवणारी ही आई! आपल्या मुलाचे संगोपन करतांना प्रत्येक आईने "श्यामची आई" हे पुस्तक आवर्जून वाचावे जेणेकरून घराघरांत संस्कारी मूल घडेल, त्यातून संस्कारी समाज व पर्यायाने संस्कारी देश बनण्यास नक्कीच या श्यामच्या आईच्या संस्काराची आज गरज आहे. याच संस्कारातून एक जेवढे हळवे, संवेदनशील, मनमिळाऊ सानेगुरुजी घडले  तेवढेच 

वंचितांच्या, अस्पृश्यांच्या, शेतकऱ्यांच्या अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे व त्यासाठी जीवाचे रान करणारे सानेगुरुजी घडले. आज अशाच संस्काराची गरज घराघरात आहे. ते संस्कार देणारी यशोदा व ते संस्कार घेणारा श्याम घराघरात निर्माण व्हायला हवा. हीच काळाची गरज आहे. आज साने गुरूजी यांची जयंती त्यानिमित्त विनम्र अभिवादन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com