पावसाच्या अवेळा

श्‍याम भालेराव
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

कोणालाही गृहीत धरू नये. पावसाला तर अजिबात गृहीत धरू नये. पाऊस येणार नाही, असे मानून तुम्ही प्रवासाला निघाला, तर तो अर्ध्या वाटेवर आडवा येईल. यंदा लांबलेल्या पावसाने फजितीच्या जुन्या गोष्टी आठवल्या.

कोणालाही गृहीत धरू नये. पावसाला तर अजिबात गृहीत धरू नये. पाऊस येणार नाही, असे मानून तुम्ही प्रवासाला निघाला, तर तो अर्ध्या वाटेवर आडवा येईल. यंदा लांबलेल्या पावसाने फजितीच्या जुन्या गोष्टी आठवल्या.

साधारणतः सात-आठ वर्षे झाली. पावसाळ्यातील या घटना. पुणे विद्यापीठ बहिःशाल शिक्षण मंडळातर्फे श्रीरामपूरला व्याख्यान होते. व्याख्यानाची वेळ सकाळी दहाची. माझ्या मित्रालाही कामानिमित्त नगरला जायचे होते. व्याख्यानासाठी वेळेवर पोचावे, यासाठी मोटारसायकलवरून आम्ही पहाटे तीनलाच पुण्यातून निघालो. निघताना पाऊस नव्हता. त्यामुळे पाऊस येण्याची शक्‍यता जाणवली नाही. आम्ही येरवडा ओलांडले अन्‌ अचानक पावसाला सुरवात झाली. तुफान पाऊस कसा असतो, याचा अनुभव यानिमित्ताने आला. रस्त्यावर सगळाच शुकशुकाट होता. कोठे थांबावे अशी जागाही नव्हती. वेळेत पोचावे यासाठी आम्ही पुढे कोठेच थांबलो नाही. नगरजवळ गेल्यावर पाऊस कमी झाला. नगर स्टॅंडवर श्रीरामपूरची गाडी लागलेलीच होती. मी गाडीत बसलो अन्‌ मित्र त्याच्या कामानिमित्त निघून गेला. अंगावरचे कपडे भिजलेले असल्याने थंडी चांगलीच वाजत होती. श्रीरामपूरला पावणेदहाला पोचलो. दरम्यानच्या काळात व्याख्यान संयोजकांकडून दोन वेळा फोन आला. मी कुठेपर्यंत आलो याची ते विचारणा करत होते. दहाला पाच मिनिटे कमी असताना मी महाविद्यालयात पोचलो. तोपर्यंत अंगावरील कपडे काही प्रमाणात वाळले होते. दहाला व्याख्यान सुरू झाले अन्‌ ते व्यवस्थित झाले. व्याख्यानासाठी मी भर पावसात भिजत आलो हे संयोजकांच्या अन्‌ विद्यार्थ्यांच्याही लक्षात येण्याचे काहीच कारण नव्हते.

पावसातील प्रवासाचा हा आणखी एक प्रसंग. सहज भेटण्यासाठी मी अन्‌ माझा मुलगा अळकुटीस (ता. पारनेर) बहिणीकडे गेलो होतो. जेवण झाले. गप्पा झाल्या. बाहेरचे वातावरण ढगांनी पूर्ण भरून आले होते. कोणत्याही क्षणी पाऊस कोसळेल अशी स्थिती होती. यामुळे मेव्हणे अन्‌ बहिणीनेही आज राहून उद्या सकाळी जा, असा आग्रह धरला; पण काही कारणामुळे थांबता येणार नव्हते. आम्ही निघालो. साधारणतः पाऊण तासानंतर पाऊस सुरू झाला. सुरवातीला भुरभुर वाटणाऱ्या पावसाने नंतर चांगलेच रौद्र रूप धारण केले. काही क्षणांतच सगळीकडे पाणीच पाणी झाले.

एका चहाच्या टपरीच्या आश्रयाने आम्ही थांबलो; पण भिजलोच. असे किती वेळ थांबायचे म्हणून आम्ही आमचा मोटारसायकलवरचा प्रवास सुरू केला; पण नदीने वाट अडवली. ज्या नदीला कधीच पाणी नसते, अशी नदी दुथडी भरून वाहत होती. आता पुढे कसे जायचे हा प्रश्‍नच होता. नदीच्या अलीकडे अन्‌ पलीकडे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पाऊस थांबला; पण पाण्याचा वेग मात्र वाढतच होता. आम्ही थांबलो त्या ठिकाणी शेताचा बांध फुटल्याने आमच्या पाठीमागून वेगाने पाणी येऊ लागले. सुदैवाने आम्ही थोड्या उंच भागावर असल्याने आम्हाला वळसा घालून पाणी नदीला मिळाले. नदीच्या पाण्याचा फुगवटा वाढतच होता. सुमारे अर्ध्या तासानंतर पलीकडील तीरावरील एका ट्रकचालकाने आमच्या बाजूला येण्यासाठी ट्रक पाण्यात घातला. सर्व जण भयचकीत नजरेने पाहत होते. ट्रकनंतर काही मोठी वाहनेही त्यापाठोपाठ आली. पाण्याचा प्रवाह ज्या बाजूला होता, त्या बाजूला मोठी वाहने, तर वाहनांच्या दुसऱ्या बाजूस छोटी वाहने हळूहळू पूल ओलांडू लागली. आम्ही थांबलो तेथे एक एसटी आली. नदीच्या पलीकडे जाणारे आम्ही दहा-पंधरा जण एसटीत चढलो. कंडक्‍टरनेही सहकार्य केले. नदी ओलांडल्यानंतर आम्ही एसटी तून उतरलो. या गडबडीत कंडक्‍टरचे आभार मानण्याचेही राहून गेले.

नुकताच या रस्त्याने प्रवास केला. तेव्हा नदीच्या पात्रात काहीच पाणी नव्हते. क्षणभर नदीपात्राच्या मध्यभागी थांबलो अन्‌ नंतर पुढचा प्रवास सुरू केला.

Web Title: shyam bhalerao write article in muktapeeth