रामफळाचे झाड

स्मिता तत्त्ववादी
बुधवार, 5 एप्रिल 2017

 

ते केवळ दारातलं झाड नव्हतं, आमच्या कुटुंबातलंच एक होतं. सासरी आले आणि या झाडाशी मैत्र जुळलं. हे झाड म्हणजे प्रभू श्रीरामांचीच कृपा वाटायची. ते अचानक कोसळलं आणि वर्षाच्या आतच आम्ही ते घर, शहर सोडून निघालो.

 

 

ते केवळ दारातलं झाड नव्हतं, आमच्या कुटुंबातलंच एक होतं. सासरी आले आणि या झाडाशी मैत्र जुळलं. हे झाड म्हणजे प्रभू श्रीरामांचीच कृपा वाटायची. ते अचानक कोसळलं आणि वर्षाच्या आतच आम्ही ते घर, शहर सोडून निघालो.

 

नागपूरला आमच्या घरी रामफळाचे मोठ्ठे झाड, नव्हे वृक्षच होता. अगदी अंगणातच. चाळीस वर्षं मोठ्या दिमाखात उभा होता. आमच्या घराला व अंगणाला या झाडामुळे शोभा आली होती. आमच्या घराच्या पत्त्याची खूण "रामफळाचे झाड' अशीच होती. रामफळाच्या झाडाखाली उभे राहिले की वाटायचे, जणू आजोबांच्या छत्रछायेखालीच आहोत. हे सर्व आठवले की आजही डोळ्यांत पाणी येते. जानेवारीतल्या थंडीच्या दिवसांत रामफळाच्या झाडाला फुले यायची. फुले अगदी काजूसारखी दिसायची, पण गंध मात्र उग्र. एखाद्या औषधासारखा तो उग्र दर्प नाकात जायचा की अस्वस्थ व्हायचे. पण तरी सवयीने तोच दर्प हवाहवासा वाटायला लागला.

लग्न होऊन सासरी आले. लग्न एप्रिलमध्ये झाल्याने रामफळ लगेचच चाखायला मिळाले. चव फारशी मधुर नव्हती. पण अगदी मगजदार, आकाराने मोठे, अतिशय देखणे आणि रुबाबदार फळ. हळूहळू रामफळाची चव जिभेवर रुळली. मग दरवर्षी रामफळाच्या झाडाकडे लक्ष जायला लागले! किती रामफळे लागली? रामनवमीपर्यंत पिकतील ना? हिशेब सुरू व्हायचे. आणि रामफळ तयार व्हायचे रामनवमीलाच! रामाला रामफळ अर्पण केल्याचे समाधान या झाडानी वर्षानुवर्षे दिले. आमच्या दोघांच्याही आजोळी रामनवमीला रामफळ न चुकता जात असे. रामफळ आणि रामनवमी हे समीकरण दैवीच वाटायचे. निसर्गाच्या या किमयेची खरेच खूप मजा वाटते. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पहाटेपासूनच रामफळांवर डोळा ठेवून असायचे. रामफळाचे देठही खूप मजबूत! पक्षी त्यावर आडवे बसून झोके घेत घेत रामफळाचा आस्वाद लुटत. अगदी विलक्षण दृश्‍य असायचे. मुलेसुद्धा यातच रमून जात.

रामफळे लागली की येणारे जाणारे ते बघून रामफळाचे "बुकिंग' करून जायचे. आम्हालाही ते सर्वांना वाटायला खूप आवडायचे. त्यानंतर पक्ष्यांचे खाऊन झाल्यावर मग आपला हक्क आम्ही दाखवायचो. रामफळ कच्चे झाडावरून उतरवून कधीच पिकायचे नाही. पण झाडावर पिकलेल्या रामफळाची गोडी मात्र अवीट असायची. अशा या झाडांनी आम्हाला वर्षानुवर्षे गोड, मधुर फळे दिली. एखादे नजरेतून सुटलेले रामफळ पिकून खाली फरशीवर पडायचे. ते पण उचलून खाण्याची मजा काही औरच होती. रामफळ मिळणे तसे दुर्मिळच. त्यामुळे आम्हाला रामफळांचे अप्रूप वाटायचे. सहजासहजी रामफळाची झाडें दृष्टीस पडत नाहीत. आम्ही आमचे रामफळाचे झाड आमच्या कुटुंबातील सदस्यासारख जपलें. त्याच्यावर खूप प्रेम केलें. त्या झाडानेसुद्धा ते ऋण पुरेपूर फेडले. खरेच इतके लुशलुशीत मोठ्ठे रामफळ देणारे झाड दारी असणे म्हणजे प्रभू श्रीरामांची कृपाच म्हणावी.

नागपूरच्या कमालीच्या तापमानामध्ये दाट सावली देण्याचे काम या झाडाने इमाने इतबारे केले. इतकी वर्षे रामफळ आणि कडुनिंबाच्या सावलीत घराचे आणि आमचे रक्षण झाले. यामुळेच नागपूरचा कडाक्‍याचा उन्हाळा सुसह्य झाला. या झाडाची दाट सावली येणाऱ्या जाणाऱ्यांनापण विसावा द्यायची. रखरखत्या उन्हात खूप सारे पक्षीसुद्धा झाडावर आसरा घ्यायचे. या झाडांचे आम्ही सदैव ऋणी आहोत. मोठ्ठे खोड, भरघोस हिरव्या फांद्या आणि दाट पाने झाडाचे वैभव होते. रामफळाच्या झाडाने ओकेबोकेपण कधीच ल्यायले नाही. पानगळ व्हायची तीसुद्धा टप्प्याटप्प्याने. सगळी पाने एकदम गळून झाड सुने झाल्याचे तर आम्ही कधीच अनुभवले नाही. अभिमान वाटावे असेच रामफळाचे झाड होते. घरात येणारा प्रत्येक जण विचारी, ""अरे व्वा, रामफळाचे झाड? या वर्षी आम्हाला चाखवणार ना?''

एकलेपण झाडालाही मरणयातना देते हे माहितीच नव्हते. जानेवारी महिन्यात मुलीकडे गेलो. पूर्ण महिनाभर पुण्याला राहिलो. मनात यायचे, रामफळाचे झाड आता बहरायला सुरवात झाली असेल. फुलांचा दर्प पसरला असेल. पण हाय! आम्ही नागपूरला परतायच्या आतच फोन आला. रामफळाचे झाड कोसळले. आम्ही हादरून गेलो. आपण इकडे आलो आणि हे काय झाले! पूर्वजांचा आशीर्वाद असणारे आमचे लाडके झाड अचानक कोसळले.

लगबगीने घरी परतलो. घर आणि घराचे अंगण ओकेबोके वाटायला लागले. एक झाड जाण्याने एवढे दु:ख होते हे पहिल्यांदाच अनुभवले. रामफळाच्या झाडाखाली एक मोठी कार-शेड होती. ती तुटली होती. गाडी एका बाजूने चेपली होती. घराच्या टेरेसचा एक कोपरा पडला होता. एक विशाल, भव्य, समृद्ध झाड कोलमडून पडले होते. हा कसला संकेत! घराचे वैभव गेल्यासारखे वाटत होते. वर्षाच्या आतच घरासाठी प्रस्ताव आला. आमचे हे सुंदर, पण रामफळाचे झाड नसलेले घर, शहर सोडून निघालो.

Web Title: smita tatwawadi write article in muktapeeth