संस्काराचा पुरस्कार

स्नेहल नांदापूरकर
मंगळवार, 30 जानेवारी 2018

अचानक पैसे सापडले. सत्तर हजार. काही क्षण मोहही झाला. पण लगेच संस्कार जागे झाले. ज्याचे त्याला पैसे परत केले, त्यामुळे एकावर शस्त्रक्रिया होऊ शकली.

अचानक पैसे सापडले. सत्तर हजार. काही क्षण मोहही झाला. पण लगेच संस्कार जागे झाले. ज्याचे त्याला पैसे परत केले, त्यामुळे एकावर शस्त्रक्रिया होऊ शकली.

संस्कारांचे महत्त्व जीवनात अनन्यसाधारण आहे. आम्ही चार वर्षांपूर्वी नागपूरला होतो, तेव्हाची गोष्ट. माझी मैत्रीण रश्‍मी पांडे आणि मी गिरी पेठेतील गजानन महाराजांच्या मंदिरात गेलो होतो. दर्शन घेतले. नेहमीप्रमाणे देवाला सुख, आरोग्य मागून हात जोडले आणि घरी परत येण्यास निघालो. वाटेत थोडे सामान घेत-घेत येत होतो. अचानक माझ्या पायाला काही तरी लागले म्हणून मी खाली वाकून ते उचलले तर ते पैशांचे पाकीट होते. कोणाचे पाकीट होते हे कळायला मार्ग नव्हता. माझी मैत्रीण रश्‍मी म्हणाली, ""जाऊ दे ना, तू का एवढा विचार करतेस?'' मैत्रिणीने मला पाकीट उघडायला लावले, तर त्यात नोटांचे बंडल होते. क्षणभर आम्ही दोघी अवाक्‌ झालो. नंतर विचार केला, की हे पैसे एक तर देवळात दानपेटीत टाकावेत अथवा गरिबांना वाटून द्यावेत. पुन्हा मन बदलले. नाही तर, आपणच काही तरी भारी वस्तू घेऊया. गिरी पेठ ते शिवाजीनगर एवढ्या अंतरात दोघींचेही मनोराज्य सुरू झाले व मनातील इच्छांना धुमारे फुटले. पण का कुणास ठाऊक, माझे मन मात्र हळहळत होते.

घरी आले. माझे मिस्टर म्हणाले, ""तू का अस्वस्थ दिसतेस? काही बरेबिरे नाही की काय?'' माझे मन थाऱ्यावर नव्हते. म्हणतात ना, "मन चिंती ते वैरी न चिंती' याप्रमाणे मनात चांगले- वाईट विचार येत होते. शेवटी मिस्टरांना सर्व सांगितले. ते म्हणाले, ""अगं, ते पाकीट उघडून तर बघ त्यात काही कार्ड, चिठ्ठी, पत्ता सापडतो का ते.'' सर्व पाकीट रिकामे केले. सत्तर हजारांचे बंडल होते. मनात एकदम भीती वाटली. अंगाला तर दरदरून घाम फुटला. चोरीचे तर नसतील ना, की कोणाच्या कामाचे असतील तर... मन हळहळले. त्यात आतल्या कप्प्यात एक कार्ड मिळाले. त्यात पत्ता होता - "श्री. व्ही. के. देशपांडे, धरम पेठ, खरे टाउन.' केवळ पत्ता. दूरध्वनी क्रमांक नव्हता. तो पत्ता पाहून माझे मन तर केव्हाच त्या पत्त्यावर गेले होते.
सारी रात्र डोळ्याला डोळा लागेना. कधी एकदा सकाळ होते असे वाटू लागले. आम्ही त्या पत्त्यावर गेलो, त्या सोसायटीत एकसारख्या आद्याक्षरांचे दोन- तीन देशपांडे होते. एका देशपांडेंकडे काही हरविले आहे काय, असे विचारले. ते "नाही' म्हणाले. मग दुसऱ्या देशपांडेंकडे गेलो. एका प्रौढ बाईने दरवाजा उघडला. मी आत गेले; पण का कुणास ठाऊक घरात उदासीनतेचे, दुःखाचे सावट जाणवत होते. एक अदृश्‍य अशी जीवघेणी शांतता होती. मी बोलायला सुरवात केली, ""आपली काही वस्तू हरवली आहे का?'' तेथे असणाऱ्या तरुण मुलाच्या डोळ्यांत एक चमक आली; पण सांगावे की न सांगावे, अशी त्याची घालमेल होताना दिसली. मी पर्समधून पाकीट काढले. ""हे तर नाही ना ते तुमचे पाकीट?'' पाकीट दिसताच त्या मुलाच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसला, तर आजी- आजोबांच्या चेहऱ्यावरच्या दुःखाच्या सुरकुत्या हलल्या. त्यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर उन्हाळ्यात गारवा वाटावा तसा आनंद दिसला. मुलगा सांगू लागला, ""ताई, माझी बायको, वय वर्षे 29, तिच्या शस्त्रक्रियेसाठी मी हे पैसे कर्जाऊ घेतले होते. पाकीट कसे कुठे पडले हे कळलेच नाही. आम्ही तर हतबल झालो होतो. तुमच्यामुळे माझ्या बायकोची शस्त्रक्रिया होईल. मी तुमचा खूप आभारी आहे.'' त्या घरातील मंडळींबरोबर माझ्याही डोळ्याला अश्रुधारा लागल्या. हे सर्व दृश्‍य मी मनाच्या कॅमेऱ्यात टिपले, ते कधीही "डिलीट' न करण्याकरिता.

एवढ्यात घरातून कृश झालेली ती मुलगी बाहेर आली. हातात ओटीचे ताट. वर एक कागदी पाकीट. तिने खणानारळाने माझी ओटी भरली व पाकीट दिले. ""हे कशासाठी?'' विचारले तर आजी म्हणाल्या, ""ही बक्षिसी तुम्हाला.'' ""नको, मला पाकीट नको. मी या पैशांपेक्षा लाखमोलाची ओटी घेते व आजी- आजोबांचे आशीर्वाद घेते.'' तशा आजी सुनेला म्हणाल्या, ""यांच्यामुळे तुला जीवदान मिळणार आहे, त्यांना नमस्कार कर.'' ती नमस्काराला खाली वाकली. अनाहूतपणे माझे हात तिच्या पाठीवर, डोक्‍यावर ठेवले आणि मुखातून आशीर्वाद निघाला, "आयुष्यमान भव!'
काल काही क्षणांसाठी का होईना, मनात येऊन गेले होते, की सापडलेल्या पैशांत मौज करू. आता घरी परतताना ते आठवून माझी मलाच खूप लाज वाटली. पण अखेरीस माझ्यावर लहानपणापासून झालेल्या संस्कारांचा विजय झाला होता. म्हणून मी त्या संस्कारांना धन्यवाद दिले. गजानन महाराजांना हात जोडले, की चांगले संस्कार व प्रामाणिकपणाचा हा अमूल्य ठेवा आजन्म माझ्याजवळ राहील असा आशीर्वाद द्या. त्यांनी माझा सन्मान केला म्हणजे माझ्यातील संस्कारांचा सन्मान केला होता. आता माझे मन हलके झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: snehal nandapurker write article in muktapeeth