ह्रदयात वाजे समथिंग... दिल तो पागल है...

सोनल घोडके
Sunday, 4 October 2020

या हृदयाचा पण एक खास जागतिक दिवस असतो म्हणे, २९ सप्टेंबर... या दिवशी फक्त सगळेजण हृदयाच्या बाबतीतल्या गोष्टी वाचत असतात. पण भावनिक नाही हं...! वैज्ञानिक दृष्टिकोनातून....!!  कारण अख्खं जग भावनिक दृष्टीकोनातून हृदय दिवस तर १४ फेब्रुवारी ला साजरं करत असतं... हो ना...?

 प्रीत ह्रदयी...असं म्हटलं तरी बहुतेकांच्या जणांच्या नजरा नक्कीच वळतील, काहीतरी नक्कीच असेल म्हणून... ह्रदयाचा संबंध प्रेमाशी किंवा भावनेशी जोडलेला आहे. संत ज्ञानेश्वरांनीही ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलं आहेच की, ये ह्रदयीचे ते ह्रदयी... एकंदर काय तर तन्मयतेची भावना किंवा एकरूपता. दोन्ही ह्रदय एकमेकांशी तादात्म्य साधतात ती परिस्थिती....

ह्रदया ह्रदय येक जाले /ये ह्रदयीचे ते ह्रदयी घातले/

द्वैत न मोडता केले/आपण ऐसे अर्जुना//

दिल से म्हणजे काय तर ह्रदयापासून. दिल हा तसा जरासा बदनाम झालेला शब्द. शास्त्रीयदृष्ट्या या दिलाची चिरफाड केली तर ह्रदयात प्रेमच नाही असं समजेल. अशी चिकित्सा कोणी करण्यास धजावले तर तो भावनाशून्य म्हणून गणला जाण्याचीच शक्यता अधिक.

खरंतर आजकाल वेळोवेळी ह्रदयाबद्दल अनेक विचारांची समाज माध्यमांवर देवाण-घेवाण होत असते. हृदय निरोगी राहण्यासाठी ' हे ' करा, ' ते ' करा... ' अमुक ' करा, ' तमुक ' करू नका... वगैरे वगैरे. तशी हृदयाची ' काळजी ' तर आपण नेहमी घेतच असतो. पण हे खरंच खरं आहे का..? आपण दररोज किती वेळ धावतो...? जरा विचार तर करून बघा...

आपण किमान काही वेळ चालत तरी जात असतो का...? अगदीच जवळच्या ठिकाणीसुद्धा आपण चालत जात नाही ( काही नमुने सोडून ), तर लांबच्या ठिकाणी जाणे तर सोडाच .... एक किक मारली की आपली गाडी सुसाट ...! ठिकेय, मान्य आहे की वेळ वाचतो, त्या वेळेचा सदुपयोग आपण करत असतो. पण आपल्यापैकी कितीजण वरच्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्या चढून जातात...? हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच. बाकी...? लिफ्टला लिफ्ट मागत असतात! मग ह्रदय कसं फिट राहणार. कोणीही यू ट्यूबवगैरे उचकलं तर तिथे ह्रदय बळकट कसं ठेवायचं असा सल्ला देणारे सापडतील. अगदी दही खायचं की दूध, याचाही सल्ला ते देताना दिसतात.

चित्रपटसृष्टी अनेक वर्षांपासून ह्रदयाला साद घालीत आलीय.

सचिन - सुप्रिया यांचं गाणं पाहिलंय का..? सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं... 

       " हृदयी वसंत फुलताना, प्रेमास रंग यावे...."
       
शांताराम नांदगावकर यांचे लेखन... शाब्दिक मेळ अत्यंत सुरेख घातलेला. ते म्हणतात, हृदयात वसंत फुलत असताना प्रेमाला रंग येत असतो... पण खरंय का ओ हे...? हा उपमा आणि उपमानाचा खेळ किंवा अलंकार काढून शास्त्रीयदृष्ट्या विचार केला तर हे साफ चुकीचं आहे.

मुळात प्रौढ झालेल्या माणसाच्या हृदयाची लांबी १२ से.मी. असते. त्याची रुंदी ८ से.मी. आणि त्याची जाडी ६ से.मी. असते. साध्या गुलाबाच्या फुलांचे काही रोपटे लावण्यासाठी आपल्याला मोठी जागासुद्धा अपुरी पडते... आणि केवळ २५० ते ३०० ग्रॅम वजनाच्या हृदयात अख्खा वसंत फुलतो... वाह..!!  असा विचार करणारे पाषाणह्रदयीही आहेत.

पुढे ते म्हणतात...
        " प्रेमास रंग भरताना, दुनियेस का डरावे... "

हृदय चांगलं राहण्यासाठी ऑक्सिजन लागत असतो, ' प्रेम ' नाही. तेच ऑक्सिजन मिळण्यासाठी जरा चालत -  फिरत चला...  हेच प्रेम पुढे ' चाललं - फिरलं ' नाही की म्हणत बसा,  आनंद  बक्षी यांचं गाणं....

           " ओये राजू, प्यार ना करियो... 
              दिल टूट जाता है...!! "

 

अरे..!! का तुटेल..? तो काय काचेचा ग्लास ए का..? की प्लॅस्टिकची वस्तू ए... तुटायला... इतकंच नाही पण साधी एखादी व्यक्ती हताश होऊन बसली तर आपण लगेच म्हणत असतो, " बेचारे का दिल टुट गया होगा...!! "

अरे, खरंच असं असेल तर तो मेला नसता का..? तो जिवंत का राहिलाय मुळात...? नाहीतर मग त्याला ' हृदयाच्या डॉक्टर ' कडे घेऊन जा ना.... पण केवळ हताश झालेल्या आणि हृदयाचा कोणत्याही प्रकारचा विकार नसलेल्या व्यक्तीवर उपचार कसा करावा ? तो डॉक्टर तुम्हाला कसा हाकलावून लावेल ते बघाच.... मग त्याचा हताश होण्याचा आणि 'दिल' तुटण्याचा काय संबंध...?

अति विचाराने माणूस बेचैन होतो, अस्वस्थ होतो. आणि वास्तवात कोणतेही मानवी शरीर ' विचार ' डोक्यातून करत असतो. डोकं म्हणजे मेंदू. मग हृदय का निकामी होईल...? असं म्हणतात की हृदयात भावना असतात. पण पुन्हा विज्ञानाचा आधार घेतला तर 'भावना ' तर या मनात असतात. आणि मनाचा संबंध मानसशास्त्रात तर मेंदुसोबत केला जातो. खरंय ना..? मग एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही किंवा मनाच्या विरोधात झाली तर आपण ' हार्ट ब्रेकिंग ' असं का म्हणतो...? हे ' ब्रेन ब्रेकिंग ' का नाही होऊ शकत...? मनातील सगळे विचार साफ करायला मात्र आपण म्हणत असतो ' ब्रेन वॉशिंग '... मग भावना जर हृदयात असतील तर ' हार्ट वॉशिंग ' असं म्हणता येईल का..? हे तर अख्खी हार्ट सर्जरी केल्याप्रमाणे होईल... हो ना..?  केवळ प्रश्न पडला इतकंच...  आता हे पण असू द्यात....
             " हृदयात वाजे समथिंग...
                    सारे जग वाटे हॅपेनिंग...
                    असतो सदा मी आता ड्रिमिंग... "

                        
'विश्वजित जोशी ' आणि ' श्रीरंग गोडबोले ' यांचे शब्द. " ती सध्या काय करते " मधील हे गाणं लहानच काय पण जवळपास थोरा-मोठ्यांच्यादेखील तोंडी रुजलेले असणार.

आता यांचं बघा. हृदयात काहीतरी वाजतं... म्हणजे नक्की काय होतं...? आपण नाकावाटे श्वास घेत असतो, त्यातून आधी सांगितल्याप्रमाणे ऑक्सिजन आपल्या शरीरात जात असतो. त्यावेळेस आपलं हृदय आकुंचन आणि प्रसरण पावत असतं. म्हणजे याला आपण सामान्य भाषेत ' धड - धड ' म्हणतो. मग हेच वाजत असेल का..?

साधारणपणे मानवी शरीर ज्यावेळेस घाबरत असतं किंवा काही तरी मनाजोगतं घडत असेल किंवा मनविरोधात घडलं असेल, त्यावेळेस असं होत असतं. पण हे सगळं मेंदूला अनुसरून आहे. म्हणजे काय, तर हृदयाला ' काड्या ' टोचण्याचं काम आपला मेंदू करत असतो. बरोबर...? (काही चुकत असेल तर पुस्तकं वाचा ना राव..!)  

यानंतर ते पुढे म्हणतात की, सारं जग मजेशीर वाटतं... आणि म्हणून तो स्वतः नेहमी स्वप्नात असतो. आता स्वप्न आणि मेंदूतील प्रक्रिया यामध्ये आपलं विज्ञान नेहमीच सक्रिय असतं. म्हणजे बघा आपला मेंदू जास्त हुशार ... हो ना...?  कदाचित म्हणूनच  ' आनंद बक्षी ' यांनी लिहिले आहे की ... " दिल तो पागल है...!"

या हृदयाचा पण एक खास जागतिक दिवस असतो म्हणे, २९ सप्टेंबर... या दिवशी फक्त सगळेजण हृदयाच्या बाबतीतल्या गोष्टी वाचत असतात. पण भावनिक नाही हं...! वैज्ञानिक दृष्टिकोनातून....!!  कारण अख्खं जग भावनिक दृष्टीकोनातून हृदय दिवस तर १४ फेब्रुवारी ला साजरं करत असतं... हो ना...? एकमेकांना शुभेच्छा देऊन, ती ' लाल रंगाचे बदामी ' आकाराचे गिफ्ट देऊन, वगैरे वगैरे... त्याला म्हणे अन्य भाषेत ' हार्ट शेप ' म्हणतात.

खरंच तो आकार हृदयाचा असतो...? असंभव... म्हणजे थोडक्यात हास्यास्पद..!! जर प्रेम ही भावना आहे तर ती मेंदूच्या साहाय्याने वाढत जाते. मग कोणी गिफ्ट देताना ' ब्रेन शेप 'च का नाही देत...? नकोच नाहीतर, उगाच मेंदूचा ' अपमान ' होईल.. त्याचा ' पिसाळलेला ' अवतार बघून..!  

खरंच कठीण आहे ना हे सगळं समजून घेण्यासाठी...म्हणूनच ह्रदयात वाजे समथिंग... जरासा भावनिक म्हणजे डोकं खाजवून विचार करा ...  कदाचित म्हणूनच अमिताभ भट्टाचार्य लिहितात...
            " ए दिल है मुश्किल...!! " 

(sonalghodake10@gmail.com)

संपादन - अशोक निंबाळकर                                                                             


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Something in the heart