स्मृतीतील युवा महोत्सव

 डॉ. सुमेधा आपटे-रानडे, मिरज. मो. ९४२३५३७३१७
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

युवा महोत्सवात आणखी एक छान गोष्ट घडली, ती म्हणजे नीलेश साबळेशी ओळख. ‘लाईम लाईट’मध्ये येण्याची दुर्दम्य इच्छा त्याच्या ठायी दिसली. तो मिमिक्री स्पर्धेकरिता आला असला तरी नाटकाला, मूकनाट्याला, आमच्या समूहगीताला काही मदत लागली तर कायम तयार असायचा.

सांगलीतील वसंतदादा कॉलेजमधून आयुर्वेदाचार्य पदवीचा अभ्यास करत असताना कॉलेजकडून अनेकदा मी युवा महोत्सवासाठी प्रतिनिधित्व केले आहे. महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय शाखांचे विद्यापीठ हे नाशिक (महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस-‘मयुहेसा’) असल्याने आमच्या विद्यापीठाचे आंतरविभागीय युवा महोत्सव ‘स्पंदन’ हे महाराष्ट्रात विविध ठिकाणी व्हायचे. आम्ही कॉलेजमध्ये असताना पुणे, नाशिक, जळगाव अशा शहरांमध्ये ‘स्पंदन’साठी सहभागी झालो व कॉलेजच्या आणि पर्यायाने पश्‍चिम विभागाच्या नावावर अनेक बक्षिसे मिळवून दिली. माझा मुख्यतः वैयक्तिक शास्त्रीय गायन, समूह गायन, युगूल गायन यांत समावेश असायचा. समूह गायनात तर हमखास पहिले बक्षीस ठरलेलेच. असेच एका वर्षी स्पंदनमध्ये समूहगीताचे विजेतेपद मिळाल्यानंतर आमची आंतरविद्यापीठीय युवा महोत्सव ‘इंद्रधनु’साठी निवड करण्यात आली. त्यावर्षीचा हा युवा महोत्सव मुंबईतील गोरेगावमध्ये होता. आमच्या ‘मयुहेसा’कडून आम्ही समूहगीताचे प्रतिनिधित्व करणार होतो, तर मिमिक्रीमध्ये आजचा प्रसिद्ध सूत्रधार, दिग्दर्शक डॉ. नीलेश साबळे हा विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार होता.

गोरेगावला स्पर्धेला जायची आमची जय्यत तयारी चालली होती. मी, माझ्या मैत्रिणी गौरी, रश्‍मी, प्रियांका, मित्र कौशिक व नागेश असा आमचा समूह होता. साथ संगतीला ढोलकीला वाडेकर काका होते. आमच्या समूहगीताचे दोन भाग असायचे. पहिला भाग देशभक्तिपर गीत व नंतर लोकगीत. लोकगीतात आम्ही ‘गोंधळ’ बसविला होता. त्यासाठी दिमडी वादक म्हणून वाडेकर सरांच्याच ओळखीचा, अवघ्या १० वर्षे वयाच्या बच्चूला आम्ही वादक म्हणून न्यायचे ठरवले. खूप छान दिमडी वाजवायचा तो. ठरल्याप्रमाणे आमच्या भोसले सरांबरोबर आमच्या चमूने गोरेगावकडे महालक्ष्मी एक्‍स्प्रेसने प्रयाण केले. सकाळी दादर स्टेशनवर आम्ही सगळे उतरलो. आता गोरेगाव म्हणजे वेस्टर्न लाईनला जायचं होतं. त्यामुळे लोकलच्या वेस्टर्न साम्राज्यात जावे लागणार होते.

आम्ही अक्षरशः बिचकतच पाऊल ठेवले. कारण ही एवढी गर्दी, त्यात अंदाजे सकाळचे १० वाजले होते. म्हणजे ऐन मोक्‍याची वेळ!! कसंबसं आमच्या बॅगा सावरत, ढुश्‍या मारत फलाटावर पोचलो. सगळेजण आलेत ना, याची खात्री करून आता येणाऱ्या लोकलमध्ये चढायचेच असा निर्धार केला. लोकल येताना दिसली तशी सर्वांनी निश्‍चयाने एकाच डब्यात सगळे बसू, असा विचार करून जनरल डब्यात एकदाचा झटापटीने प्रवेश मिळवला. दोन मिनिटं स्वतःला शोधण्यातच गेली... मग बाकीच्यांना. सगळे दिसत होते; पण... पण.. आमचा बच्चू दिसत नव्हता. सर व मुले एका बाजूला होती. त्यांना वाटले तो आमच्याकडे आहे, तर आम्हाला वाटत होते तो तिकडे आहे. बरं, विचारायला आवाज तरी गेला पाहिजे ना! असेल तो याच डब्यात, गोरेगाव आलं की, दिसेल किंवा आपण हाक मारू, उतरेल तो असं आम्ही ठरवलं.

गोरेगाव आलं. ठरल्याप्रमाणे केले; पण व्यर्थ. बच्चू काही उतरला नाही. सर व मुलेही उतरली; पण तो नाही उतरला... झालं! कुठे गेला असेल तो, दादरला चढलाच नाही का? की दुसऱ्या डब्यात चढला? आधीच्या स्टेशनवर उतरला तर नसेल? एक ना हजार शंका, प्रश्‍न आम्हा सर्वांच्या डोक्‍यात पिंगा घालू लागले. काय करावं काहीच सुचेना. बिचारा तो बच्चू, किती विश्‍वासाने त्याच्या आईवडिलांनी त्याला आमच्याबरोबर पाठवले. पहिल्यांदा मुंबईत यायचं म्हणून तो पण काय खूश झाला होता!! कुठे असेल तो? त्याच्याकडे मोबाईल नाही, घरचा नंबर पाठ आहे का, हे माहिती नाही. असं वाटू लागलं, स्पर्धा राहूदे, त्याला शोधणं हे त्यापेक्षा कैक पटीने महत्त्वाचे आहे. सरांना टेन्शन येऊ लागले. त्यांना धीर देत आम्ही लगोलग कामाला लागलो.

आमच्यातील कौशिक व नागेश यांनी पुन्हा दादरला जायचा निर्णय घेतला. मी व गौरीने गोरेगाव स्टेशनवर शोधायचे व नसेल तर सरळ रेल्वे पोलिसांत तक्रार करायची ठरवली. कारण इतक्‍या मोठ्या मुंबईत नुसते आम्ही कसे शोधू शकणार होतो? शोध मोहीम सुरू झाली. आम्ही गोरेगाव स्टेशन पिंजून काढू लागलो. इकडे कान कौशिकच्या फोनकडे होता. अखेर फोन वाजला, ‘देवा, चांगली बातमी असू दे’ अशा विनवण्या करतच फोन उचलला. ‘सुमेधा, बच्चू सापडला’... ते शब्द ऐकून जीव असा बाऊन्सर घेत भांड्यात पडला... मी ‘कुठे, कसा आहे?’... ‘हो, हो, सगळं सांगतो आल्यावर..’ कौशिक म्हणाला.

सरांना पण हायसं झालं. दादरहून येणाऱ्या लोकलची आम्ही आतुरतेने वाट पाहू लागलो. एकदाचा बच्चू उतरला. आमचा प्रश्‍नांचा भडिमार सुरू झाला. नागेश म्हणाला, ‘दादरला लोकलची वाट पाहत आपण ज्या जागी उभे होतो, तिथेच हा पठ्ठ्या उभा होता...’

बच्चू म्हणाला, ‘तुम्ही सगळे चढलात; पण मला गर्दीतून चढायलाच येईना, म्हणून थांबलो तसाच, पुन्हा त्याच जागी. तुम्ही शोधायला आलात तर दिसावे म्हणून मी तसाच उभा राहिलो.’ अवाक्‌ होऊन आम्ही त्याच्याकडे पाहतच राहिलो. या एका प्रसंगाने आम्हाला टीमवर्क, प्रसंगावधान, धैर्य, आमच्याबद्दल त्या छोट्याला वाटणारा विश्‍वास, हे सगळं जाणवून दिलं. त्या बच्चूला शाबासकी देत व मनोमन देवाचे आभार मानत आम्ही पाटकर कॉलेजला स्पर्धेसाठी रवाना झालो.

युवा महोत्सवात आणखी एक छान गोष्ट घडली, ती म्हणजे नीलेश साबळेशी ओळख. ‘लाईम लाईट’मध्ये येण्याची दुर्दम्य इच्छा त्याच्या ठायी दिसली. तो मिमिक्री स्पर्धेकरिता आला असला तरी नाटकाला, मूकनाट्याला, आमच्या समूहगीताला काही मदत लागली तर कायम तयार असायचा. त्यावेळी पडद्यामागेही प्रत्येकास हिरीरीने मदत करणारा, पडेल ते काम मन लावून करणारा नीलेश आम्ही पाहिला. तेव्हाच वाटलं होतं की, हा नंतर परिपूर्ण कलाकार होणारच. जे आज त्याने सिद्ध केलंय.
अशा रितीने ‘इंद्रधनु’ युवा महोत्सव आमच्यासाठी विविध आठवणींचा, स्मृतीतला युवा महोत्सव ठरला...!

Web Title: Sumedha Apate Rande writes in Muktapeeth