सर्व सिग्नल तोडत गेलो...

सुनील मुरलीधर उखंडे
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

वेळच तशी होती. मी रिक्षाचा पुढचा दिवा उजळला आणि रुग्णवाहिकेसारखा रिक्षा पळवू लागलो. वाटेतले सिग्नल तोडले. हॉर्नवरचा हात दूर न करताच गर्दीतून रिक्षा दामटत राहिलो.

वेळच तशी होती. मी रिक्षाचा पुढचा दिवा उजळला आणि रुग्णवाहिकेसारखा रिक्षा पळवू लागलो. वाटेतले सिग्नल तोडले. हॉर्नवरचा हात दूर न करताच गर्दीतून रिक्षा दामटत राहिलो.

पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट. नुकताच शाळेतील मुला-मुलींना सोडून गोळीबार मैदानाजवळ प्रवाशांची वाट पाहत थांबलो होतो. तितक्‍यात एक एसटी जवळ येऊन थांबली. त्यातून उतरलेले एक पुरुष, एक स्त्री व सात-आठ वर्षांची छोटी मुलगी असे तिघे रिक्षात बसले. "रिक्षावाले, जरा हळू चालवा बरं का!', असे त्या प्रवाशाने मला सांगितले. मी दापोडीकडे निघालो. त्या बाई खूप ओरडत होत्या. मीही अगदी सावकाशपणे रिक्षा चालवत होतो. त्या बाई गरोदर होत्या. रिक्षा अगदी हळू होती; पण तेवढाही धक्का त्यांना सहन होत नसावा. त्यांच्या त्या वेदना मलाही व त्या सोबतच्या पुरुषालाही सहन होत नव्हत्या. मी कॅम्प मार्गे येत लाल देवळाकडून मालधक्का गाठले. आरटीओ कार्यालयाकडून मी जुन्या मुंबई रस्त्यावरून दापोडीच्या दिशेने अगदी सावकाशच गाडी चालवत होतो. बाईंना वेदना अजिबातच सहन होत नव्हत्या. मी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयापाशी सिग्नल ओलांडला. पाटील इस्टेट झोपडपट्टीजवळ आलो आणि... अचानक टॅहॅं असा आवाज आला आणि मी चमकलो. त्या बाई मागे मान टाकून गप्प झालेल्या. सोबतची व्यक्ती घाबरलेल्या आवाजात म्हणाली, ""अहो रिक्षावाले, बाळ पायापाशी पडले आहे.'' मी सुन्न झालो. दापोडी तर अजून कितीतरी लांब होती.

मी सावरलो. प्रसंगावधान राखून मी वयस्कर अशा एखाद्या आजींना शोधू लागलो. एक आजी दिसताच रिक्षा थांबवत ""आजी, आजी अहो, रिक्षातच त्या बाईंचं बाळंतपण झालेय, जरा बघा ना,'' अशी त्यांना विनवणी केली. त्यांनीही विलंब न करता, ""अरे, मागेच दळवी हॉस्पिटल आहे. जा लवकर.'' मग मी थांबलो नाही. विलंब न करता रिक्षा तशीच वळवून घेतली. रिक्षाचा पुढचा दिवा उजळला आणि रुग्णवाहिकेसारखा रिक्षा पळवू लागलो. वाटेतल्या गर्दीची, सिग्नलची पर्वा न करता एकामागून एक सर्व सिग्नल तोडत मी निघालो होतो. शिवाजीनगरच्या सिग्नलजवळ एक पोलिस दिसला. त्या पोलिसापाशी सेकंदभर रिक्षा थांबवत त्याला सर्व प्रकार सांगितला आणि तसाच वेग वाढवला. पण तेवढ्यातही तो म्हणाला, ""ठीक आहे, मी बघतो.''

मी माझा उरलो नव्हतो. समोरून वेगाने येणाऱ्या वाहनांची भीती वाटत नव्हती. हॉर्नवरचा हात दूर न करताच त्या अंगावर येणाऱ्या गर्दीतून रिक्षा दामटत राहिलो.
शिवाजीनगर येथील दळवी हॉस्पिटलच्या आवारात रिक्षा घेतली. इमारतीच्या शक्‍य तितक्‍या जवळ रिक्षा नेली. थांबवली व पळत पळत नर्सपाशी गेलो. घाईघाईनेच त्यांना प्रसंग सांगितला. मुख्य नर्ससह पाच-सहा नर्स एक मोठी चादर घेऊन धावत आल्या. त्यांनी रिक्षाला चादरीने झाकून टाकले. त्या बाईंना व बाळाला वेगळे करीत दोघांनाही सुखरूप वाचवले. बाळ-बाळंतिणीची व्यवस्था लावून मोठ्या डॉक्‍टरीण आमच्यापाशी आल्या. मला धीर देत त्या मोठ्या डॉक्‍टरीण म्हणाल्या, ""रिक्षावाले, तुमची रिक्षा मी धुवायला सांगते. तुम्ही काळजी करू नका. खूप चांगले काम तुम्ही केले आहे.'' रिक्षा जणू एक मोठे युद्ध करून रक्तबंबाळ झाली होती. थोड्या वेळाने डॉक्‍टरबाई आमच्याकडे आल्या. म्हणाल्या, ""मुलगी झाली. आई आणि बाळ दोघीही ठीक आहेत.'' आम्हाला आनंद झाला. पण माझी दुसरी चिंता समोर आली. मी त्या डॉक्‍टर बाईंना म्हणालो, ""डॉक्‍टर, मी सर्व सिग्नल तोडले आहेत. जर माझ्यावर केस झाली तर तुम्ही मला मदत करताल ना?'' ""हो, हो. कोणता पोलिस तुमच्यावर केस टाकतो ते मी बघते,'' असे म्हणत त्यांनी मला धीर दिला.

मी त्या सोबतच्या पुरुषाचा निरोप घेणार तर तेच म्हणाले, ""चला, आपण आता दापोडीला जाऊ.'' तो त्या बाईचा दीर होता. ती छोटी मुलगी त्याची पुतणी. त्यांना घेऊन दापोडी येथील घरी गेलो. मीच पुढाकार घेऊन त्या मुलीच्या आजीला झाला सर्व प्रकार सांगितला. आजी उखडल्या. बडबड करू लागल्या. "अहो, ही काय पद्धत आहे का? घरातून बाहेरच कशाला पडायचे? मी आता काय नेऊ त्या बाळंतिणीला, त्यांना कळत नाही का?'

मी त्यांना शांत केले. त्या आजींना घेऊन निघालो. शिवाजीनगरला चांगल्या हॉटेलमधून वरण-भात घेऊन दिला. नंतर मी त्यांचा निरोप घेतला त्या वेळी माझे फक्त ऐंशी रुपये झाले होते. त्या दिराने केलेल्या मदतीबद्दल जास्त पैसे देऊ केले. पण मी केवळ माझे रिक्षाभाडे घेतले. अचानक आलेल्या वादळातून त्या माय-लेकींना सुखरूप नेता आले हेच माझे बक्षीस होते.

Web Title: sunil ukhande write article in muktapeeth