आई, तू कुठे होतीस?

आई, तू कुठे होतीस?

जन्मापासून आईच्या सावलीत आपण वाढत असतो. आपल्या प्रत्येक नव्या पावलावर आईचा आधार असतो. पण आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यावर ती आसपास असूनही शेजारी नव्हती आणि हे लक्षातही येऊ नये! कसे विसरलो आईला?

त्या दिवसाची दुपार खूप निवांत होती. बऱ्याच दिवसांनंतर असा एकांत मला मिळाला होता. मी फोटोंचे जुने अल्बम पहात बसते. जवळजवळ पन्नास-साठ लहान-मोठे कलर्स, ब्लॅक अँड व्हाईट असे अल्बम माझ्या कपाटात मी जपून ठेवले आहेत. अगदी मुलांच्या लहानपणापासून ते त्यांची लग्ने, मुलगी व सून यांच्या डोहाळे जेवणाचे, दोन्ही नातींच्या जन्माचे, बारसे दर वर्षीचा वाढदिवस असे अनेक अल्बमस मी आजही अगदी आवडीने पहाते. माझा आवडता छंदच आहे तो. आयुष्यातला जास्त काळ ज्या नोकरीत घालवला तेथून "सेवानिवृत्त' झाले, त्यावेळच्या समारंभाचा फोटो अल्बम पहाताना मैत्रिणी भेटल्याचा आनंद मला मिळतो.

आमच्या लग्नाला यंदा 39 वर्षे झाली. त्याकाळी आजच्यासारखे कलर फोटोज, डिजिटल फोटो, व्हिटिओ शूटिंग्ज, सीडीज हे काहीच नव्हते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोंचा अल्बम, मर्यादीत फोटो आपल्या बजेटमध्ये बसतील असे. तरीही मोठ्या हौसेने माझ्या दादा-वहिनींनी एक अल्बम मला दिला होता. लग्नानंतर सुरवातीला एक-दोनदाच पाहिला असेन तो अल्बम. त्यानंतर संसारातील जबाबदाऱ्या, दोन मुलांचे संगोपन, नोकरीतील तारेवरची कसरत या धावपळीत वेळेच मिळाला नाही तो अल्बम पाहण्यासाठी. आज अचानक माझे लक्ष कपाटातील सर्वांत खालच्या कप्प्याकडे गेले. बाजूला कलरचे कव्हर असलेला जुना अल्बम होता तो. उत्सुकतेने उघडून पाहू लागले व 39 वर्षे मागे गेले. आमच्या लग्नाचा अल्बम होता तो. माझा शालू, ह्यांचा कोट सर्वच ब्लॅक अँड व्हाईट. जमलेले सर्व नातेवाईक कृष्णधवल कपड्यांमधेच दिसत होते. मला हसूच आले. काळ किती झपाट्याने बदलला नाही? मी स्वतःशीच पुटपुटले. एका पाठोपाठ एक विधी आठवू लागले. आदल्या दिवशीचे सीमांत पूजन, व्याहीभेट, विहिणींचे पाय धुणे कार्यक्रम, जेवणाची पंगत, दुसऱ्या दिवशी लग्नाचे सर्व विधी, ह्यांनी मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातले तो माझ्या आयुष्यातील सौभाग्य क्षण असे सर्व फोटो मन हरखून पहात होते व पुनःपुन्हा भूतकाळात जात होते. एकदम भानावर आले व फोटो परत पाहू लागले. ह्या सगळ्या फोटोंमध्ये माझी आई कुठेच नव्हती. खरंतर लेकीचं लग्न हा मातेच्या आयुष्यातील अतिशय हळवा क्षण. मीही तो एकदा अनुभवला आहे. शेवटच्या ग्रुप फोटोमधेही माझ्या बहिणी, मेहुणे, भाऊ-वहिनी, छोटी भाचेकंपनी सर्व होते, पण मग त्या वेळीही आई कुठे होती? सीमंतपूजन, लग्नसमारंभ कुठेच आई नव्हती. घरातून कार्यालयात तरी आली होती, की नाही ती? आमचे वडील माझ्या लहानपणीच देवाघरी गेले. आई विधवा होती म्हणून लेकीच्या लग्नातही तिने येऊ नये. पूर्वी कार्यालयात "कोठी' नावाची एक खोली असायची. कार्याला लागणाऱ्या वस्तू, देण्याघेण्याच्या वस्तू, जोखमीच्या वस्तू सर्व त्या कोठीत असायचे. कुटुंबातील सर्वांत वयस्कर आजी ती कोठी मोठ्या जबाबदारीने सांभाळत असे. आई तिथे होती का? पण मला पूर्ण लग्नसमारंभात एकदाही तिची अनुपस्थिती कशी जाणवली नाही? मी गोंधळलेल्या अवस्थेत असेन कदाचित. पण आम्हा दहा भावंडांपैकी एकालाही तिला हॉलमध्ये बोलवावेसे वाटले नाही? जेवणाच्या पंक्तींमध्येही आई दिसली नव्हती. मग ती जेवली, की नाही? माझ्या मुखी घास भरवून लहानाचे मोठे करणाऱ्या आईशिवाय कशी जेवले मी? एकाच वेळी अनेक प्रश्‍न डोक्‍यात पिंगा घालू लागले.
माझ्या लग्नानंतर अठरा वर्षांनी आई गेली. त्या दरम्यान ती कितीतरी वेळा माझ्या अडचणीला, मुलांना सांभाळायला माझ्या घरी आली होती. तेव्हाच कशी माझ्या लक्षात ही गोष्ट आली नाही? नाहीतर मी तिला नक्की विचारले असते, की "आई तू कुठे होतीस गं?' पूर्वी लग्न लागल्यानंतर वधुवरांनी जोडीने वडीलधाऱ्या मंडळींना वाकून नमस्कार करण्याची पद्धत होती. आम्ही जोडीने तिला नमस्कार केला की नाही? नसेल केव्हा तरी तिच्या निरपेक्ष प्रेमाच्या मूक आशीर्वादाने आमचा संस्कार, मुलांचेही संसार सुखाचे झालेत. मला आठवतंय संध्याकाळी कार्यालयातून सासरी जाताना मी दादा-वहिनींच्या कुशीत शिरून रडले होते. माझ्या बहिणी, वहिनी सर्वांचेच डोळे पाणावले होते. त्या वेळी आईच्या गळ्यात पडून मला रडावेसे वाटले नाही का? निरोप देतेवेळी तरी आई कुठे होतीस तू?

जन्मापासून आईच्या सावलीत आपण वाढत असतो. आपल्या प्रत्येक नव्या पावलावर आईचा आधार असतो. पण आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यावर ती आसपास असूनही शेजारी नव्हती आणि हे लक्षातही येऊ नये! कसे विसरलो आईला?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com