राधाचं वृक्षारोपण

सुरेखा हिरेन निरगुडकर
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

राधाला जाम "टेन्शन' आलेलं. काल संध्याकाळीच तिनं डब्यात बी पेरलं होतं आणि आज सकाळी पाहिलं तर झाड उगवलेलं नव्हतंच. आता काय करायचं बाई!

राधाला जाम "टेन्शन' आलेलं. काल संध्याकाळीच तिनं डब्यात बी पेरलं होतं आणि आज सकाळी पाहिलं तर झाड उगवलेलं नव्हतंच. आता काय करायचं बाई!

राधा शाळेतून नेहमीप्रमाणेच आनंदात घरी आली. नाचत. मध्येच एका पायावर गिरकी घेत. नेहमी ती तशीच येते. घरी आल्यावर चपलाही निघाल्या नाहीत पायांतल्या, तर तिने आजीला श्रीखंडाचा रिकामा डबा आहे का विचारले. का, कशाला असे काहीच प्रश्‍न न विचारता आजीने सहज उत्तर दिले, "नाही.' आपल्याकडे श्रीखंडचा रिकामा डबा नाही हे समजताच राधाने भोकाड पसरले, "अगं, काय झाले? का रडतेस?' एक नाही - दोन नाही. काही सांगेनाच ती. फक्त तिने भोकाड पसरलेले आणि दोन्ही डोळ्यांतून गालावर उतरलेला पाऊस. आजीला कळेनाच काय झाले क्षणभरात.

तर, आज शाळेत राधाला "वृक्षारोपण व वृक्षवाढ' हा धडा शिकवला होता. राधा माझी नात. मुलीची मुलगी. सेवासदन शाळेत पहिलीत शिकते. घरी तिच्या बाबांनी, ओल्या कचऱ्यापासून खत बनवले आहे. कुंडीत पुदिना, कोथिंबीर, मिरची लावली आहे. रोपे मस्त वाढली आहेत. त्यात गांडूळ खत घातले जाते. ही कुंडीतील बाग पाहताना राधा खूपच खूष असते. आज तर तिलाच झाड रुजवायचे होते. बाबा कुंडीत रुजवतात तसे. शाळेत तिच्या टीचरांनीच तर तिला छोट्या टाकाऊ डब्यात बी पेरायला सांगितले होते. झाड कसे वाढते ते तिला पाहायचे होते. आठ दिवस झाले की रोप शाळेत न्यायचे होते. पण आता तर डब्यापासून सुरवात, घरात डबाच नव्हता. मग ती बी पेरणार कशी, झाड उगवताना पाहणार कसे, शाळेत नेणार कशी, म्हणून राधाला रडू फुटले होते. तिची आई पाच वाजता घरी आली तोपर्यंत राधाने आपले जवळपासचे नातेवाईक व शेजारी यांच्याकडे श्रीखंडाचे डबे आहेत का विचारले होते. कुणाकडेच डबे नव्हते. त्यामुळे ती चिंतेत पडली होती. तिच्या आईने, मालविकाने, डबा देते म्हणून सांगितलेही, पण राधाला तो मिळेपर्यंत दम नव्हता. अखेर संध्याकाळपर्यंत सात-आठ डबे स्वच्छ धुऊन घरात येऊन पडले. पण राधा कुणाचेच ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. झाड लावण्याच्या विचाराने पछाडली होती.

मग कुठले बी पेरावे यावरून चर्चा सुरू झाली. तिने सर्वांनाच वेठीला धरले. बी पेरले की आठ दिवसांत झाड उगवून छानपैकी वर आले पाहिजे होते. खरे तर तिला त्या झाडाला फळ यायला हवे होते. तिला मी व मालविकाने खूप समजावले. काही सांगितले की तिला पटायचे. पण थोड्या वेळाने ती पुन्हा सूर लावतच होती. कोणी म्हणाले, मोहरी पेरा. कोणी सुचविले, अहळीव पेरा लवकर उगवतात. तर कोणी म्हणाले, गहू पेरा, उंच वाढतील. शेजाऱ्या पाजाऱ्यांनाही राधाच्या वृक्षारोपणात "इंटरेस्ट' निर्माण झाला होता. राधा बोलकी म्हणून सर्वांशीच तिची गट्टी. सगळे तिला पर्याय सुचवत होते आणि तिला जाम "टेन्शन' आले होते. आम्हा सगळ्यांनाच हसू येत होते.

अखेर आम्ही दोन-तीन डबे घेतले. राधाने ताईच्या, नूपुरच्या, मदतीने डब्यात खत-माती भरली. गहू, मोहरी, अहळीव सर्वच पेरले. न जाणो, नाही उगविले तर! दुसऱ्या दिवशी सकाळी राधाला उठवावे लागले नाही. ती स्वतःहून उठली. लगबगीने तिने डबे पाहिले व परत रडारड सुरू. अजून काहीच उगविले नव्हते डब्यात. असे दोन दिवस गेले, सकाळ-दुपार-संध्याकाळ तिन्ही त्रिकाळ ती डबे पाहत होती. त्यांची जागा बदलत होती. त्यावर पाणी शिंपडत होती. आम्हाला काहीही सुचू देत नव्हती. दोन दिवसांनी अचानक मातीवर हिरवा रंग दिसू लागला. राधा टाळ्या वाजवून नाचू लागली. तिची खात्री पटली, की झाडे उगविली आहेत. तिच्या चेहेऱ्यावरचा तो आनंद! आमच्या सर्वाच्याच जिवात जीव आला. सगळ्या मावशा, आज्या विचारत होत्या, आली का झाडे? कारण सर्वानाच राधाची काळजी. या सर्व खटाटोपात राधाला झाड कसे लावावे, त्याची काय काळजी घ्यावी हे मात्र चांगले समजले. ती लहान असून कुठल्याही झाडाची पाने, फुले कधीच तोंडत नाही व दुसऱ्यालाही तोडू देत नाही. इतक्‍या लहान वयातील तिचे वृक्षारोपण तिला पुढील आयुष्य समृद्ध होण्यासाठी नक्कीच मदत करेल यात शंका नाही. आठ दिवसानी ते डबे शाळेत नेण्यात आले. म्हणजे तिच्या बाबांनी ते शाळेत नेऊन दिले, न जाणो परत गाडीतून जाताना काहीही गडबड झाली तर? शाळेत टीचरनी राधाचे कौतुक केले, सर्व मुलांना दाखविले, की राधाने एक नव्हे, तर दोन झाडे छान वाढवली आहेत. राधाच्या चेहेऱ्यावरचा त्या दिवशीचा आनंद काय वर्णावा!

Web Title: surekha nirgudkar write article in muktapeeth