बच्चनचे पत्र

muktapeeth
muktapeeth

ई-मेल आणि एसएमएसच्या काळात पत्रभेटीकडे दुर्लक्ष होत आहे. निरोप कळला म्हणजे झाले, या पलीकडचे काही पत्र बोलत असते. हा पत्रसंवाद कोणालाही अनौपचारिकतेकडे नेतो, आनंद देतो, सहानुभव देतो.

या सुंदर भूतलावरील आपले आगमन आणि निर्गमन या गोष्टी प्रत्येक सजीवाच्या आयुष्यात अटळ असतात. आपल्या आगमनाने सारे आप्त अतिशय आनंदी होतात. याच्या बरोबर उलट परिस्थिती आपल्या निर्गमनाच्या वेळी असते. आपल्या निधनानंतर झालेल्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी आपले आप्तस्वकीय, स्नेही महत्त्वाची भूमिका बजावत असतात. अशी फुंकर घालण्यासाठी आपण दुःखितांच्या प्रत्यक्ष भेटीला जातो. काही वेळेस दूरध्वनी करतो, तर काही वेळेस हेच काम आपण एखादे पत्र पाठवूनही करीत असतो. मी स्वतः गेली अनेक वर्षे अशा पत्र लेखनाचा उपक्रम राबवीत आहे. मात्र, नुसत्या सांत्वनाच्या प्रसंगीच मी पत्र लिहितो असे नव्हे, तर एखाद्याने उत्तम यश मिळविले किंवा अगदी त्याच्या विवाहाची पत्रिका आली, तरीही मी अशा प्रसंगी पत्र लिहिण्याचा खटाटोप करीत असतो. सांत्वनाच्या पत्राची भूमिका दुःखाची तीव्रता कमी करणे असते, तर अभिनंदनाच्या पत्रात अशाच वाटचालीसाठी शुभेच्छा असतात. विवाहप्रसंगी त्यांच्या पुढील वैवाहिक जीवनात स्थैर्य, आनंद आणि प्रगतीसाठी शुभेच्छा याबरोबरच सामाजिक बांधिलकीच्या जागृतीबाबत त्यांच्यासाठी दोन ओळीही असतात.

आपण ही पत्रे सामान्यतः प्रतिसादाची अपेक्षा न करताच लिहिलेली असतात. माझा गेल्या अनेक वर्षांचा अनुभवही तसाच आहे, त्यामुळे अशा पत्राची पोच आली नाही तरी अशा प्रसंगी त्याचे काही वाटत नाही. ही पत्रे काही वेळेस मात्र आपल्याला काही सुखद आणि अनपेक्षित धक्के देत असतात. मला असाच एक अनपेक्षित धक्का बसला. सतत प्रसिद्धी आणि लोकप्रियता यांच्या शिखरावर असलेले अमिताभ बच्चन यांच्या आईचे निधन झाल्यावर मी त्यांना एक सांत्वनपर पत्र पाठविले होते. हा प्रसंग मी पूर्णपणे विसरलो होतो. एके दिवशी मोठे, एक अत्यंत आकर्षक जाड सोनेरी पाकीट आमच्या कार्यालयात आले. पाकिटावर फक्त माझे नाव आणि पत्ता होता. पाठविणाराचे नाव कोठेच नव्हते. पाकीट फोडल्यावर माझ्या कार्यालयातील सहकाऱ्यांना माझ्याआधी कळले, की अत्यंत संवेदनशील भाषेत लिहिलेले, उत्तम रीतीने मांडणी केलेले, अत्यंत उच्च दर्जाच्या कागदावर टंकलिखित केलेले हे आभाराचे पत्र स्वतः अमिताभजी यांच्या उत्तम स्वाक्षरीत त्यांच्या जुहूच्या पत्त्यासह त्यांनी आम्हाला पाठविले होते. प्रत्यक्ष "बादशहा'ची सही पाहून आम्ही सारे जण आनंदून गेलो. हे पत्र माझ्याकडे अजूनही आहे.

अशाच प्रकारचे पत्र श्रीमती सोनिया गांधी यांनी (राजीव गांधींच्या निधनानंतर मी त्यांना सांत्वनपर पत्र पाठविल्यावर) मला पाठविले, तेही माझ्या संग्रही आहे.
अनेकजण पत्राला उत्तर देत नाहीत; पण या सामान्य संकेतांच्या उलटचा अनुभव शरद पवार यांच्याबाबतचा आहे. त्यांना लिहिलेल्या प्रत्येक पत्राची पोच शंभर टक्के येतेच, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. त्यांना "पद्‌मविभूषण' पुरस्कार जाहीर झाल्यावर मी त्यांना अभिनंदनाचे आणि शुभेच्छांचे पत्र पाठविले होते. त्यानंतर पंधरा दिवसांतच अपेक्षित पोच, आभारासह आली.

ई-मेल आणि एसएमएसच्या काळात पत्रभेटीकडे दुर्लक्ष होत आहे. निरोप कळला म्हणजे झाले, या पलीकडचे काही पत्र बोलत असते. हा पत्रसंवाद कोणालाही अनौपचारिकतेकडे नेतो, आनंद देतो, सहानुभव देतो. ई-मेल व एसएमएस यात कोरडेपण असते. त्यातून भावनिक संवाद होत नाही. औपचारिकतेच्या पलीकडे जाऊन संवाद साधणारी दुर्मिळ पत्रे आपल्याला ऊर्जा देतात. अशी उत्तरे लिहिलेल्या व्यक्तिमत्त्वांमध्ये मला सुसंस्कृतपणाचा मोठा भाव दिसतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com