सोन्याचे डूल

सुरेश पंदारे
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

आपण कर्तव्य करीत असतो. समोरचाही त्याच्या ऐपतीनं कर्तव्य निभावत असतो. मात्र, त्यात भावना होरपळतात.

आपण कर्तव्य करीत असतो. समोरचाही त्याच्या ऐपतीनं कर्तव्य निभावत असतो. मात्र, त्यात भावना होरपळतात.

बॅंकेत होतो. कर्ज थकले की कर्जदारांवर केसेस कराव्या लागत. गोंधवणीमध्ये तीन प्रकरणे होती. पहिल्या घरी गेलो. सकाळचे कोवळे ऊन त्या झोपडीवजा घरात पडल्यामुळे घरातील वस्तू स्पष्ट दिसत होत्या. नुकताच आवरून तयार झालेला साठीचा हणमंता पुढे आला. त्याच्या बायकोला त्याने चहा ठेवायला सांगितला. चहा घेऊन त्याची बायको बाहेर आली. जुनीच पण स्वच्छ धुतलेली नऊवारी साडी, हातातल्या काचेच्या रंगीबेरंगी बांगड्या आणि कपाळावर भले टपोरे कुंकू. एवढ्यात माझे लक्ष तिच्या साध्या मंगळसूत्राकडे गेले. कानात दोन नक्षीदार डूल म्हणजे कर्णफुले खूपच उठून दिसत होती. चहात दूध खूपच कमी होते. ती म्हणालीही, 'शेळीने आज एकच ग्लास दूध दिले बघा. पाहुणे आल्यावर कसे काय करावे?'' बेलिफाने नोटिशीतील रक्कम सांगितली. 'अहो एवढं पैसं कुठं जमतात व्हय? दमादमानं भरू की.'' मी "ठीक आहे' म्हटल्यावर हणमंताला धीर आला. त्यानं हात जोडून विनवणी केली, 'दीड तास थांबा, काहीतरी तजबीज करतो.''

आम्ही दुसऱ्या वस्तीवर जीपने निघालो. तिथे शेतावरच्या पिकाची नोंद घेऊन न्यायालयात तशी पुरशीस द्यायची होती. म्हणजे येणाऱ्या पिकाच्या उत्पन्नातून काहीतरी वसुली होऊ शकते असे वकिलाचे म्हणणे होते. पाटलांनी कागद लिहून दिला. दुसऱ्या वस्तीवर कोणीच नव्हते. मजुरीसाठी घरातले सगळेच दुसऱ्याच्या शेतावर गेले होते. परत हणमंताकडे आलो. त्याची बायको थोडी खिन्न दिसत होती. तेवढ्यात धापा टाकीत, घाम पुसत हणमंता सायकलवरून उतरला. 'हे घ्या. पुरे दीड हजार रुपये आहेत.''

'सायकलवरून एवढ्या घाईत कुठे गेला होता?''
'श्रीरामपूरला.'' मी म्हटले, 'अरे, आम्ही पुन्हा आलो असतो. पुढची तारीख घेतली असती.''
'आसं कसं! सावकाराला रिकाम्या हातानं दारातून कसं पाठवायचं. हिनंच मला श्रीरामपूरला पाठवलं.'' तिचा एकच दागिना होता. कानातले डूल. आता कानात काहीच नव्हते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suresh pandare write article in muktapeeth