आठवांची नक्षी

उत्तम फराकटे
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

आमच्या घराच्या गच्चीवर, एका हॅंगिंग पॉटमध्ये ४ सप्टेंबरला बुलबुल पक्ष्याने घरटं बांधून तीन अंडी घातली. (या तारखा फोटोच्या डिटेल्सवरून काढलेल्या!) त्या अगोदर दोन दिवस दोन बुलबुल पक्ष्यांची ते घरटं बांधण्याची धावपळ बघून आम्हा सर्वांची उत्सुकता चाळवली होती आणि मग रोज त्या घरट्याकडे आमचं लक्ष जाऊ लागलं. अगदीच छोटं, नारळाच्या करवंटीएवढं; पण त्या दोघांनी काड्या, काड्या जमवून गोलाकार असं सुबक घरटं विणलं होतं. कुठून कुठून चोचीतून काड्या घेऊन यायचे आणि केवळ चोचींनी विणायचे.

आमच्या घराच्या गच्चीवर, एका हॅंगिंग पॉटमध्ये ४ सप्टेंबरला बुलबुल पक्ष्याने घरटं बांधून तीन अंडी घातली. (या तारखा फोटोच्या डिटेल्सवरून काढलेल्या!) त्या अगोदर दोन दिवस दोन बुलबुल पक्ष्यांची ते घरटं बांधण्याची धावपळ बघून आम्हा सर्वांची उत्सुकता चाळवली होती आणि मग रोज त्या घरट्याकडे आमचं लक्ष जाऊ लागलं. अगदीच छोटं, नारळाच्या करवंटीएवढं; पण त्या दोघांनी काड्या, काड्या जमवून गोलाकार असं सुबक घरटं विणलं होतं. कुठून कुठून चोचीतून काड्या घेऊन यायचे आणि केवळ चोचींनी विणायचे. हा उद्योग नेमका किती दिवस सुरू होता सांगता येणार नाही; पण त्यांची ये-जा पाहून लक्ष वेधलं गेलं. मी घरी सांगितलं, हे दोन बुलबुल पक्षी बहुतेक इथं अंडी घालण्याच्या तयारीला लागलेत. आजूबाजूला ते पक्षी नसलेले पाहून हळूच फोटो पण काढले. कुणीही टेरेसवर दिसलं की, अगदी अर्ध्या मिनिटाच्या आत दोघे धावून यायचे. घरटं बांधताना पण खूप काळजीपूर्वक बांधलं होतं. मातीतला ओलावा पिलांना लागणार नाही, असं एका कडेला बांधलंय. कुठून यांना इतक्‍या बारीक सारीक गोष्टी समजतात कोण जाणे!

रोज दिवसरात्र दोघांचा खडा पहारा असायचाच. स्वतःचं खाद्य शोधायला पण आळीपाळीने जायचे. आम्ही सर्वजण रोज अपडेट घ्यायचो. आपल्या बाळांसाठी बांधलेलं घरटं वरून पूर्ण उघडं असलं तरी आईच्या पंखांची पखरण त्यावर होती. पक्षी असली तरी आईच ती! राखाडी लालसर रंगांच्या छोट्या छोट्या अंड्यांमधून आता पिलं कधी बाहेर येणार याकडं आम्हा सर्वांचं लक्ष लागलं आणि टेरेसवर सर्वांची, वेळ मिळेल तशी हजेरी वाढली. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्या दोन पक्ष्यांवर आणि अंड्यांवर आमच्यापैकी कोणाची ना कोणाची तरी नजर खिळली होती. मध्यंतरी चार दिवस मी बाहेरगावी गेल्यावरदेखील फोनवर माहिती घ्यायचो. खरं तर आपल्या टेरेसवर एका बुलबुलच्या जोडीची पुढची पिढी जन्माला येऊ घातलीय आणि त्यासाठी चाललेला त्या दोन चिमण्या जीवांचा आटापिटा बघून आम्ही थक्क झालो होतो. एक-दोन नाही, तर तीन अंडी. दिवस-रात्र पंखाखाली ऊब द्यायचीच त्यांना. ना डॉक्‍टर, ना दवाखाना, ना इंजेक्‍शन, ना लस! सारं काही नैसर्गिक! माणूस मात्र निसर्गापासून दूर दूर चाललाय. 

एके दिवशी सकाळी सकाळीच इवल्या इवल्या तीन पिलांचा टिवटिवाट ऐकू आला. शपथ, त्यांच्या आई-बाबाएवढाच आनंद आम्हालाही झाला. अगदी पारदर्शक पिलं! कसा खाऊ भरवणार, धो धो पाऊस, वारा... जगणार की...? आम्हालाच टेन्शन. त्यांना काही नाही. दोघे मस्त बारीक किडे, अळ्या आणून भरवायचे. सुरुवातीला पिलांचे डोळे मिटलेले असत. ते पक्षी खाऊ घेऊन आले की, लाल चोची उघडून तोंड वर करायचे. हे त्यांना कसं कळतं? दोन दिवस बारकाईने निरीक्षण केल्यावर समजलं की, आई-बाबा खाऊ घेऊन आले की, विशिष्ट आवाज काढतात. आम्ही शिट्या वाजविल्यामुळे खाण्याच्या अपेक्षेने चोची वर केलेला फोटो म्हणजे कळस आहे कळस! मात्र हे सर्व जपूनच, दोन वेळा ते पक्षी आवाज करत अंगावर आले राव! पक्षी काय आपल्या चिमण्यांचे जीवापाड राखण करणारे आई-बाबाच की!

गेल्या आठवड्यात एके सकाळी तिन्ही पिलं उडून गेली. ४ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर या अवघ्या २०, २२ दिवसांत त्या तीन पिलांना स्वतः उडण्याचं बळ देणारे ते दोन पक्षी समोरच्या तारेवर बसून मोठ्याने टिवटिवत होते. त्या पिलांनी भरारी मारावी म्हणून एक-दोन दिवस त्यांना काहीही आणून भरवले नाही. आपल्या अवती भवती घडणाऱ्या माणसाच्या पिलांच्या घटना आठवल्या. मन सुन्न झाले. काय करत नाहीत माणसं आपल्या मुलांसाठी; पण स्वतःच्या पिलांनी स्वतः भरारी मारावी म्हणून मन कठोर करून ती दोघं समोरच्या तारेवर बसून होती. एक पिल्लू तर उडण्याच्या नादात फरशीवर पडलं. वाटलं, आता काय उठतंय. ते खाली पडलं तरी ती दोघं जवळदेखील आली नाहीत. आयुष्यातल्या मोठ्या पाठाची शिकवण चालू हेती. अखेर तेही उडून गेल्यावर त्यांचा कर्कश आवाज उगाचच मृदू झाल्यासारखा वाटला.

ते रिकामं घरटं आता बघवत नाही. नोकरी, व्यवसाय, शिक्षणाच्या निमित्तानं अशी पिलं उडतात... आणि काडी काडी वेचून बांधलेल्या घरट्यात आई-बाबा वाट बघत राहतात. खिन्न अवस्थेत एक ओळ सुचली...
पिल्लू उडाले आकाशी, होऊनीया पक्षी... 
आई, बाबाच्या वाटेवर उरली... 
आठवांची नक्षी, उरली आठवांची नक्षी!!

Web Title: Uttam Pharakate Write Article In Muktapeeth